१४ फेब्रुवारी हा दिवस सगळ्या जगभरात अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. आपल्या जोडीदारावरचे प्रेम व्यक्त करण्याच्या या दिवशी या खास व्यक्तीसाठी काही ना काही प्लॅन केले जातात. तरुणांमध्ये या दिवसाची विशेष क्रेझ असल्याचे पाहायला मिळते. आपल्या आवडीच्या व्यक्तीला प्रपोज करण्याचा, नात्याची मान्यता देण्याचा आणि आयुष्यभर सोबत राहण्याच्या आणाभाका घेण्याचा हा दिवस स्पेशल असावा असे प्रत्येकालाच वाटते. यासाठी मग एकमेकांना गिफ्ट ,फुलं , चॉकलेट दिले जाते. इतकेच नाही तर काही हौशी लोक या दिवशी आपल्या पार्टनरसाठी खास डेट प्लॅन करतात. प्रेम व्यक्त करण्यासाठी हे सगळे करणे ठिकच आहे. पण या दिवसाचे औचित्य साधून आपल्या आवडीच्या व्यक्तीसाठी आपण आणखी काही गोष्टी आवर्जून करु शकतो. ज्यामुळे आपला पार्टनर नक्कीच खूश होईल. पाहूयात या गोष्टी कोणत्या (Valentines Day Special surprises or gift ideas for partner) ...
१. खास पदार्थ बनवा
आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी आपण स्वत:च्या हाताने काही खास बनवले तर त्या व्यक्तीसाठी ती नक्कीच स्पेशल ट्रिट होऊ शकते. आपण तयार केलेल्या पदार्थामध्ये आपले प्रेम उतरलेले असते म्हणतात त्यामुळे जोडीदाराच्या आवडीचा कोणताही एखादा छान पदार्थ तयार केला तर तो नक्कीच खूश होईल. सोबत राहात असाल तर हे करणे सोपे आहे. पण राहत नसाल तरीही हा पदार्थ तयार करुन तुम्ही डब्यातून नेऊ शकता. अगदीच शक्य नसेल तर ऑनलाईन ऑर्डरही करु शकता.
२. लाँग ड्राईव्ह
आपण सगळेच रोजच्या कामांमध्ये आणि व्यापात इतके बिझी असतो की आपल्याकडे विकेंडशिवाय वेळच नसतो. विकेंडलाही आराम, आठवड्याची कामे, कार्यक्रम असं काही ना काही असतं त्यामुळे आपण जोडीदाराला म्हणावा तसा वेळ देऊ शकतोच असं नाही. त्यामुळे व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने जोडीदाराला एखाद्या लाँग ड्राईव्हला आवर्जून घेऊन जा. त्यामुळे तुम्हाला एकमेकांसोबत छान भरपूर वेळ मिळण्यास मदत होईल.
३. चांगल्या गोष्टींचे कौतुक करा
नात्यात असलेली प्रत्येक व्यक्ती बरेचदा आपल्या जोडीदाराविषयी तक्रारी करत असतो. पण या दिवसाच्या निमित्ताने आपण एकमेकांच्या चांगल्या गोष्टींविषयी बोलायचे असे ठरवा. आणि जोडीदारामध्ये काय चांगले आहे हे त्यांना आवर्जून सांगा. यामुळे नात्यातील नकारात्मकता निघून जाईल आणि नातं बहरण्यास काही प्रमाणात तरी मदत होईल. बोलणं शक्य नसेल तर एकमेकांना छानसे पत्र लिहा आणि आपल्या भावना व्यक्त करा.