व्हॅलेंटाईन्स डे Valentines Day जवळ आला की आपल्या आवडत्या व्यक्तीला काय गिफ्ट द्यायचं असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना नेहमी पडतो. आता तर हा दिवस अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपलाय आणि आपण अजून काय द्यायचं याचा विचारही केला नसेल तर आम्ही त्यासाठी तुम्हाला थोडी मदत करु शकतो. आपलं गिफ्ट Valentines Gift काहीतरी हटके आणि स्पेशल असावं अशी आपली इच्छा असते. पण आपल्याला आवडणारी व्यक्ती आधीपासून आपल्या ओळखीची असेल किंवा अगदी बरेच वर्ष आपण एकमेकांना डेट करत असू तर दरवेळी वेगळं काय देणार? वाढदिवस, दिवाळी, नवीन वर्ष यांसारख्या निमित्ताने आपण आधीच काही ना काही देत असतो. मग आता व्हॅलेंटाईन्सला द्यायला काही पर्याय उरलेच नाहीत असं आपल्याला वाटतं. पण असं काही नाही बरंका, असे कित्येक ऑप्शन्स असतात ज्यांचा आपण गिफ्ट म्हणून विचारच केलेला नसतो. चला तर मह पाहूयात आपल्या खास व्यक्तीला खास दिवसासाठी काय काय गिफ्ट देता येऊ शकतं...
१. पिलो
सध्या बाजारात बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या पिलो उपलब्ध आहेत. यामध्ये अगदी वेगवेगळ्या कार्टूनपासून ते हार्ट शेपपर्यंत बरेच प्रकार पाहायला मिळतात. इतकेच नाही तर ज्यांना गिफ्ट देत आहोत त्या व्यक्तीचा किंवा त्या व्यक्तीसोबत आपला फोटो असलेल्या कस्टमाईज पिलोही मिळतात. यामध्ये वेगवेगळे आकर्षक रंग, मटेरीयल मिळत असल्याने समोरच्या व्यक्तीला काय आवडेल याचा विचार करुन आपण या पिलो नक्की गिफ्ट देऊ शकतो. आपण त्या व्यक्तीसोबत नसताना ती पिलो आपली कमी भासू देणार नाही. डोकं ठेवायला किंवा पाठीला टेकायलाच नाही तर जवळ घेऊन झोपायलाही ही पिलो अतिशय मस्त वाटू शकते.
२. डायरी आणि पेन
आपल्या आवडत्या व्यक्तीची साधारण आवड आपल्याला माहित असते. आताच्या काळात मोबाईल, लॅपटॉप यांसारख्या गोष्टींमुळे प्रत्यक्ष लिखाण काहीसे मागे पडले असले तरी समोरच्या व्यक्तीने व्यक्त व्हावे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तिला किंवा त्याला एखादी छानशी डायरी नक्की भेट देऊ शकता. यामध्ये अतिशय छान प्रकारच्या लॉक असणाऱ्या, डिझायनर अशा वेगवेगळ्या डायऱ्या उपलब्ध असतात. यामुळे समोरच्या व्यक्तीला नियमितपणे डायरी लिहायची किंवा आणखी काही कामाशी निगडीत महत्त्वाच्या गोष्टी लिहीण्याची सवय़ही लागू शकते. त्यामुळे तुम्ही समोरच्याच्या भावनांची कदर करताय असा त्याचा अर्थ होऊ शकेल.
३. पाण्याची बाटली
उत्तम आरोग्यासाठी भरपूर पाणी पिणे ही सध्या अतिशय गरजेची गोष्ट झाली आहे. सध्या आपल्यातील बरेच जण वर्क फ्रॉम होम आहेत, पण कामाचा वाढता ताण आणि त्यामुळे आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष ही अगदीच सामान्य गोष्ट आहे. ठराविक वेळाने आवश्यक तितके पाणी प्यायले तर पोटाच्या तक्रारी दूर होण्यास मदत होते आणि आरोग्याच्या इतरही समस्या सुटतात. अशावेळी आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला एखादी छानशी बाटली दिली तर त्याचा नक्कीच छान उपयोग होतो. यामध्ये तांब्याच्या बाटलीपासून ते स्टीलची, काचेची वेगवेगळ्या आकारातील रंगातील बाटल्यांचे पर्याय उपलब्ध असतात. अगदी व्यायामाला जाण्यापासून ते बाहेर फिरायला जाण्यापर्यंत अशी बाटली आपण आवर्जून वापरु शकतो.