ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव (actress Seema Deo) यांचं नुकतंच निधन झालं. ज्येष्ठ अभिनेते रमेश देव (Ramesh Deo) आणि सीमा देव हे मराठी सिनेसृष्टीतील एक आदर्श दाम्पत्य. अभिनेता अजिंक्य आणि दिग्दर्शक अभिनय ही त्यांची दोन मुले. अभिनय यांच्या पत्नी स्मिता देव (Smita Doe) यांची एक पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली असून यामध्ये स्मिता यांनी त्यांच्या सासूविषयी म्हणजेच सीमा देव यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. स्मिता देव या लेखिका असून शेफ म्हणूनही त्या प्रसिद्ध आहेत. सीमा देव यांच्या विषयी त्यांनी शेअर केलेली पोस्ट अतिशय भावनिक (Viral emotional post of Smita Doe about her mother in law actress Seema Deo) असून ती सासू नाही, तर माझी आईच होती.... असं म्हणत त्यांनी त्यांच्या भावनांना वाट करून दिली आहे.
या पोस्टमध्ये स्मिता देव म्हणतात की आमचे लग्न होण्याआधी त्यांना मी खूप आधुनिक विचारांची वाटत होते. पण लग्न झाल्यानंतर लवकरच त्यांचा हा गैरसमज दूर झाला आणि आमच्या दोघींमध्ये खूप छान बॉण्ड तयार झाला. अगदी भाजी घेण्यापासून ते साडी घेण्यापर्यंत अनेक गोष्टी आम्ही एकत्र खरेदी केल्या. बऱ्याचदा मी कामावरून थकून घरी यायचे. त्यावेळी त्या त्यांच्या आवडीच्या मालिका बघत बसलेल्या असायच्या. अशावेळी मी त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून पडायचे. त्यावेळी दिवसभराचा सगळा, ताण- थकवा दूर पळून गेल्यासारखं व्हायचं.
त्यांच्यासोबत दुपारचं जेवण, त्यानंतरच्या आमच्या गप्पा हे सगळं काही खूप खूप खास होतं. ती फक्त आमच्यासाठीच चांगली आई किंवा सासू नव्हती. तर आमच्या सगळ्याच कुटुंबाचा भक्कम आधार होती ती. तिच्या भाच्या आणि भाचे यांची आवडती होती ती. आमचे धाकटे काका तर वहिनी आम्हाला आईसारख्याच आहेत, असं आजही म्हणतात. आयुष्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये मात्र त्यांना स्वतःलाच ओळखणे कठीण झाले होते.. घरातून बाहेर पडताना प्रत्येक वेळी मनात त्यांची काळजी असायची. पण आता ती या सगळ्या त्रासातून सुटली. तिला आता तरी तिची शांत जागा मिळाली असेल, अशी आशा आहे. शेवटी इतकंच सांगेल की माझ्या सासूसारखी सासू प्रत्येक मुलीला मिळावी...
Click to Read Smita Deo's Post