डॉ. महेश भिरुड( एम.डी. मानसोपचार तज्ज्ञ)
विवाहाचा हेतू फक्त घर परिवाराची सुरुवात करणे नव्हे तर लोकांना एका खास नात्यात आणून कुटुंबांना एकत्र बांधणे होय. दांपत्यामधील योग्य सुसंवाद, सुखदु:खातील भागीदारी, समजूतदारपणा, एकमेकांबद्दल असलेले प्रेम आणि विश्वास-वचनबद्धता यशस्वी व सुखी वैवाहिक जीवनाची गुरुकिल्ली आहे. एकत्वाची भावना, मैत्री, सहकार्य, साहचर्य देखील आवश्यक आहे ज्याशिवाय वैवाहिक संबंध अपूर्ण आहे. मात्र उलट परिस्थितीत या गुणांचा अभाव वैवाहिक मतभेदांना जन्म देतात. आणि महिलांमधे मानसिक आरोग्य समस्या उद्भवण्यास कारणीभूत ठरणारे वैवाहिक मतभेद, परिणामी होणारे कौटुंबिक अत्याचार हा एक ज्वलंत विषय आहे. वाढते वैवाहिक मतभेद, कुटुंब विस्कळीत झाल्याने येणारे भावनिक असंतुलन आणि तिचा व्यक्तीवर होणारा वैयक्तिक दुष्परिणाम ही एक चिंतेची बाब आहे.
असे कशाने होते?
१. वैवाहिक तणाव निर्माण होण्यास सुसंवादाचा अभाव हे एक अग्रगण्य कारण दिसून येते. सुसंवादाची कमतरता पती/पत्नी मधे आपसी स्नेह, काळजी, सहानुभूती आणि समजुतीचा अभाव किंवा एक दुसऱ्यावर अविश्वास प्रदर्शित करु शकते. त्यामुळे किरकोळ मतभेद होऊन वादविवादही निर्माण होतात.
२. जोडीदारांपैकी एखाद्या मधे स्वत:बद्दल असलेली गौण, न्युन आणि असुरक्षिततेची भावना, तसेच एखाद्याचा अतिसंवेदनशील किंवा दोषारोप करणारा स्वभाव वैवाहिक अशांतता उत्पन्न करतात.
३. विवाहित जोडप्यातील लैंगिक संबंधांबाबतीत काही असमाधान किंवा अपेक्षाही ताणाचे कारण असते. समागमाची पुनरावृती, दर्जा, त्याबद्दलची आवड, आपसी आनंद आणि समाधान, आणि विवाहबाह्य संबंध यासारख्या विविध बाबी लैंगिक असंतोष निर्माण करतात. पती-पत्नीमध्ये नाखुषी आणि असमाधान निर्माण करून वैवाहिक बेबनाव उद्भवू शकतात.
४. एकमेकांना पुरेसा वेळ न देणे, आवडी निवडी विभिन्न असणे, आर्थिक नियोजन व आर्थिक परिस्थिती बद्दल शांत व योग्यरितीने चर्चा न करणे, जोडीदारापेक्षा मित्रमंडळींना जास्त आदर देणे, जोडीदाराला न आवडणारी सवय न सोडणे अशीही कारणं आहे.
५. वैवाहिक मतभेद कौटुंबिक हिंसेकडेही वळतात. मारझोड, मानसिक शारीरिक त्रासही दिला जातो.
नात्यात ताण आणि मारझोड होते तेव्हा..
१. कौटुंबिक हिंसेला महिला अगदी जन्मापासून वृद्धावस्थेत पर्यंत कुठल्याही वयात बळी पडू शकतात. महिलांवरील अत्याचार हे शारिरीक, मानसिक, लैंगिक, आर्थिक, इ. स्वरूपाचे असू शकतात. हुंडाबळी, पती व नातलगांकडून मिळणारी क्रूर वागणूक, आत्महत्येस प्रवृत्त करणे, आर्थिक पिळवणूक, शारीरिक मारहाण, खून, फसवणूक, सती जाण्यास भाग पाडणे, भ्रूणहत्या, दुर्लक्षित ठेवणे, गरोदरपणातील अत्याचार, घराण्याच्या मानमर्यादेसाठी आप्तजणांकडून होणारे खून, इ. अत्याचार समाजात दिसून येतात. गेल्या काही वर्षांमध्ये महिलांवरील कौटुंबिक अत्याचाराच्या गुन्ह्यांच्या नोंदणीत बरीच वाढ झालेली दिसते.
२. घरगुती हिंसा महिलांच्या मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम घडवून आणतात त्यामुळे कार्यकुशलता, जीवनाची गुणवत्ता, जनमानसात मिसळण्याची कुवत खालावते, हे पडसाद त्या महिलेच्या संततीवर, कुटुंबावर आणि समाजावर पडतात. त्यामुळे देशाची गुणवत्ता ढासळते.
३. अत्याचार विशिष्ट महिला, समूह, समाज, धर्म वा देशापुरता मर्यादित नसतो तर तो महिलांप्रती असलेल्या न्यून भावात रुतलेला असतो. अत्याचाराचे खून व आत्महत्या सारखे जीवघेणे परिणाम होऊ शकतात. दीर्घकालीन शारीरिक वा मानसिक जखमा, अयोजित गर्भधारणा, गर्भपात, लैंगिक आजार, संसर्गजन्य गुप्तरोग हे त्रास होऊ शकतात.
४. मानसिकरित्या अशी पीडित महिला खचून जाते तिला नैराष्य, निद्रानाश, भीती रोग, संरक्षण चिंता, खाण्यापिण्याची वासनाच नाहीशी होणे, भावनिक समस्या, मनोकायिक डोकेदुखी - पाठदुखी - पोटदुखी इत्यादी मनोविकार जडू शकतात. त्यांचा रोजगार बुडतो आणि त्या स्वतःच्या मुलांची व्यवस्थित काळजी घेण्यास असमर्थ ठरतात.
५. महिलांवर अत्याचार होणाऱ्या घरात वाढलेली मुले भावनिक व वर्तणूक समस्यांनी पछाडले जातात. त्यांच्या भावी आयुष्यात देखील अशी हिंसा करण्याची वा ओढवून घेण्याची शक्यता वाढते.
उपाय काय?
महिलांना अत्याचारापासून बचाव करण्यासाठी काही युक्त्या योजना हस्तक्षेप उपयुक्त ठरू शकतात. विकृत मनस्थिती बाबत जनजागृती याच मोहिमेचा भाग होय. सर्वप्रथम स्त्रियांनीच आपली मानसिकता, दृष्टिकोन बदलून कुटुंबातील पिढीला अत्याचाराविरुद्ध धडे दिले पाहिजे. प्रत्येक आईने अगदी लहानपणापासून मुलांना स्त्रियांबद्दल आदराची शिकवणूक देणे गरजेचे आहे. जगात स्त्रीचे महत्त्व, लिंगभेद समानता समजवायला हवे. तसेच काही उपक्रम प्राथमिक शाळांतून राबवले पाहिजे यांची सफलता म्हणजे अत्याचार करणारे पुरुष तयार होणार नाहीत.
drmgbhirud@gmail.com,
0253-2317785