Join us  

'त्याच्या'कडून 'तिला' नक्की काय हवं असतं? बायकांच्या पुरुषांकडून काय अपेक्षा असतात, त्यांना कळत का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2023 7:05 AM

त्यानं आयुष्यात यावं, जगण्याची वेगळी रीत दाखवून द्यावी. डोळ्यांच्या खिडक्यांची साफसफाई करून दिवाळीचं लायटिंग लावल्याचा लख्ख फील द्यावाआणि एकटं पाडणाऱ्या रात्रींमध्ये सौम्य आकाशकंदिलासारखा प्रकाशही द्यावा.

ठळक मुद्दे लग्नानंतर काही काळाने नवरा-बायको या दोघांच्याही डोळ्या-गालाचा आणि लाजण्याचा काही संबंध उरत नाही. त्यामुळे ‘ब्लश करणारा नवरा’ अशी दिवास्वप्नं बघू नयेत.

रेणुका खोतघरातल्या भिंतींच्या रंगापासून पुस्तक, सिनेमा, खाद्यपदार्थ, माणसांचा निवडलेला गोतावळा यातली स्वत:ची स्पेस जपणारा आणि तशाच वेगळ्या भिंतींची चौकट असलेली तिचीही स्पेस आहे, हे सहज स्वीकारणारा पुरुष बायकांना हवा असतो. ‘कुठे जाऊया जेवायला’, असं विचारल्यावर आपला चॉइस हट्टाने सांगणारा तो हवा असतो. नेहमी ‘तुम्ही म्हणाल तसं, तुमचा चॉइस असेल तिथे जाऊ खाऊ, तुमच्या चॉइसचा सिनेमा पाहू’ असं सतत सांभाळण्याचं दुकान उघडून बसलेला तो, कंटाळा आणतो. रडणाऱ्या स्त्रीसमोर निरुत्तर होऊन बसणारा नव्हे, तर ‘तुला त्रास होतोय मला समजतंय' असं सांगणारा आणिकधीतरी कणखरपणाचा मुखवटा बाजूला ठेवून मनातले सल, अपराधीपण, वेदना व्यक्त करणारा पुरुष तिला हवा असतो... तिच्या सरत्या काळोख्या रात्रीकडे पाठ फिरवून न झोपता तिला दोन मिनिटं कवेत घेऊन झोपणारा आणि कधी तरी माझेही पाय लटपटतात हे सांगून खांद्यावर डोकं टेकून मन मोकळं करणारा पुरुष हवा असतो...तिने न सांगताही फक्त तिचा चेहरा पाहून ‘तुला काय होतंय?’हे विचारणारा तो हवा असतो!त्यानं सरप्राइज पॅकेज म्हणून आयुष्यात यावं आणि जगण्याची वेगळी रीत दाखवून द्यावी. डोळ्यांच्या खिडक्यांची साफसफाई करून त्यांना दिवाळीचं लायटिंग लावल्याचा लख्ख फीलही द्यावा आणि त्याच खिडकीत एकटं पाडून टाकणाऱ्या रात्रींमध्ये सौम्य आकाशकंदिलासारखा प्रकाशही द्यावा. हा प्रकाश मूकपणे पाठीवरून हात फिरवणारा बाप देतो.

(Image :google)

सगळं ओक्के आहे ना, असा मेसेज पाठवणारा मित्रही देतो. अंगावर पांघरूण घालून दिवा मालवून शेजारी शांतपणे झोपणारा नवराही देतो.रिलेशनशिपमध्ये नसल्याचं सुख काय? तर ‘काय करतेस, कुणासोबत कुठे आहेस, जेवलीस का? असले मेसेजव्हॉट्सअपला कुणी पाठवत नाही, सच अ रिलीफ...’ असं एकीकडे म्हणणारी स्त्री ‘हे सगळं आयुष्यातून एकदमच बाद झालंय गं.. गेले, गेले ते दिवस!’- अशी खंतही चाळिशी-पंचेचाळिशीत जवळच्या मैत्रिणीसमोर व्यक्त करत असते. प्रेमळ पुरुषाची साथ वयाच्या कोणत्याही टप्प्यावर हवीच असते. तिच्या अपेक्षा खूप आहेत असं म्हणत तिच्याकडून हक्काने घेतलेल्या क्षणांचं, तिने पेललेल्या ओझ्याचं आपल्या लेखी शून्य महत्त्व आहे, असं त्याने कोरडेपणाने म्हणू नये. तिला खूप हर्ट होतं. तिच्यापासून जरूर लांब जावं, पण झिडकारून जाऊ नये. तुला सोडून मी कधीच जाणार नाही, असे वायदेही करू नयेत. कारण हेच खरं आहे की सगळीच तहान एका विहिरीवर भागत नाही. पुरुष परफेक्ट नसतात, कुणीच परफेक्ट नसतं!तशीच तीही एक परफेक्टली डॅमेज्ड पीस आहे. आपण सगळेच आतून ब्रोकन असतो, ही जाणीव त्याला असावी.बस्स अजून काय हवं आम्हाला पुरुषाकडून?***

(Image :google)

आयुष्यातल्या अनेक टप्प्यांवर आनंदाने सहमती देणारा आणि घेणारा पुरुष हवा वाटतो. त्यालाही तशीच स्त्री अपेक्षित असते. प्रियकराचा नवरा होणं आणि नवऱ्याचा मित्र होणं ही प्रक्रियाही आपसमजुतीने सहमतीने हळूहळू होते. छान वाटतं; पण कधीकधी नवऱ्याचा इतका मित्र होतो ना की त्यानेही कंटाळा येतो. ‘तू माझा नवराही आहेस अरे, गाजव की कधी हक्क. थोडा पझेसिव्ह हो,. मी तुला हवीये, हे प्रियकर असताना अधिकाराने एखाद्या भिंतीपाशी, इमारतीच्या गच्चीवर, फोनवर गाजवत होतास तसा व्यक्त हो की जरा’- याची जोरदार चिमटा काढून आठवण करावी वाटते, तर प्रियकरपणाचा कळस गाठणाऱ्या पुरुषाला कधीकधी ‘आवरा’ असं म्हणायचीही वेळ नाइलाजाने येते.इराण्याच्या टेबलवर ताटकळत बसलेला तो केवढा देखणा आणि हवाहवासा वाटला होता, बस्स ! – या आठवणीच्या देठाला फुलाच्या घोसासारखं लगडून लोंबत राहावं वाटतं. दुकानांच्या पाटीवर, भेळपुरीच्या गाडीवर ‘रेणुकादेवी प्रसन्न’ असं लिहिलेलं पाहून आपल्या आठवणीने तडफडून भसाभसा फोनमागून फोन करत सुटणारा तो आठवला की पायाला सूक्ष्म कंप सुटतो. तो आयुष्यातून निघून जातो; पण त्याने दिलेल्या असंख्य उतावळ्या उत्कट अनुभवांमुळे आपण किती खास आहोत असं वाटलं होतं. ही भावना देणाऱ्या त्या सोडून गेलेल्या प्रियकराच्याही कायम ऋणात राहावं वाटतं.प्रेमात पडलेल्या पुरुषाइतकं प्रेक्षणीय स्थळ जगात दुसरं कुठेही नसावं. पुरुष लाजतात तेव्हा अत्यंत देखणे दिसतात.बहुतकरून असे पुरुष अविवाहित असतात. लग्नानंतर काही काळाने नवरा-बायको या दोघांच्याही डोळ्या-गालाचा आणि लाजण्याचा काही संबंध उरत नाही. त्यामुळे ‘ब्लश करणारा नवरा’ अशी दिवास्वप्नं बघू नयेत.

(लोकमत समूहातर्फे प्रकाशित "दीपोत्सव" या दिवाळी अंकातील "पुरुष' या विशेष लेखमालिकेतील प्रदीर्घ लेखातील संपादित अंश. अंक सर्वत्र उपलब्ध)

टॅग्स :पती- जोडीदारमहिलारिलेशनशिप