आपण प्रेमात पडतो. तेव्हा दोन्ही बाजूनं हो झालं की ते नातं साऱ्या जगाला ओरडून सांगावं असं वाटतं. पण कधीकधी नाही सांगता येत, कधी घरच्यांची भीती वाटते. पण चोरुन भेटणंही फार काळ शक्य नसतं. त्यामुळे निदान जवळचे मित्रमैत्रिणी किंवा सहकारी यांना तरी माहितीच असतं की कुछ तो गडबड है. पण समजा तुमच्या पार्टनरने तुम्हाला सांगितलं की आपण प्रेमात आहोत हे कुणालाच कळू द्यायचं नाही. सोशल मीडियातही ओळख दाखवायची नाही. (Pocketing dating trend know all about it)
आपण लपवून ठेवायचं आपलं नातं. कधीतरी सोय, चारदोन महिने म्हणून हे करणं काही फार गडबड नाही. पण रिलेशन सुरु होतं, ते सेक्सपर्यंतही जातं पण जोडीदार म्हणतो की वर्ष-दोन वर्ष हे असंच चालू ठेवायचं तर ते योग्य आहे का? त्याला म्हणतात पॉकेट रिलेशनशिप. म्हणजे तुम्ही नातं लपवून पाकिटात घालून ठेवता, ओळख दाखवत नाही जगजाहीर. पण हे असं फार दिवस केलं तर तुम्ही फसवले, वारपले जाण्याची शक्यता असते.
नातं सगळ्यांपासून लपवून ठेवणं हा हल्ली डेटींगचा ट्रेंड आहे, ज्याचे अनेक तोटे आहेत. या नात्यात तुम्हाला नंतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे या प्रकारच्या नातेसंबंधाची माहिती वेळीच ठेवावी. पॉकेट रिलेशनशिपची लक्षणं कोणती आणि ते कसे टाळायचे, काय धोक्याचे हे माहिती करुन घेणं गरजेचं आहे. जेव्हा तुमचा पार्टनर तुमच्या नात्याकडे लक्ष देत नाही किंवा सगळ्यांपासून नातं लपवत राहतो तेव्हा त्याला पॉकेट रिलेशनशिप म्हणतात. आपलं नातं असं पाकिटात तर नाही, तपासून पहा.
1) नातं सोशल मीडियावर लपवणं जसे की तुमचा पार्टनर तुमच्या सोशल मीडिया पोस्टपासून लपवून ठेवतो. तुमच्या कोणत्याही पोस्टवर कमेंट केली जात नाही किंवा कुणालाही त्याबद्दल किंचितही कल्पना दिली नाही.
२) डेटवर तो तुम्हाला अशा ठिकाणी नेतो जिथे तुम्हाला कोणीही ओळखत नसेल. अनेकदा नातेवाईकांना भेटण्याबाबत टाळाटाळ केली जाते.
३) जे लोक पॉकेट डेटींग करत आहेत ते सहसा त्यांच्या मित्रांशी तुमची ओळख करून देण्यासाठी टाळाटाळ करतात किंवा त्यांच्या मित्रांना तुमच्याबद्दल सांगत नाहीत.
४) एकमेकांसह भविष्यातील कोणत्याही योजनेबाबत चर्चा करत नाही. रिलेशनशिपमध्ये, तुमचा पार्टनर लग्नाच्या मुद्द्यावर एकतर गोलगोल उत्तर देतो किंवा त्याकडे दुर्लक्ष करतो.
५) असा जोडीदार फक्त त्याच्या मर्जीनुसार तुम्हाला भेटण्याबद्दल बोलेल किंवा तो तुम्हाला तेव्हाच भेटेल जेव्हा हवं असतं. अशा नात्यात रहायचं की नाही विचार करा, कारण वापरुन फेकून दिलं जाण्याची, आमचं तसं काही नव्हतंच असं म्हणण्याची शक्यता या नात्यात जास्त असते.