Marriage Spies: भारतात लग्नाला दोन व्यक्तींमधील नातं नाही तर दोन परिवारांचं नातं म्हटलं जातं. हे एक असं नातं असतं ज्यात दोन व्यक्ती आयुष्यभर सुखात-दुखात एकमेकांचा साथ देण्याची शपथ घेतात. लग्न ठरवताना कुणीतरी ओळखीची व्यक्ती स्थळ आणतात, त्यानंतर पाहण्याचा कार्यक्रम आणि नंतर पसंती व फायनल केलं जातं. ओळखीच्या व्यक्तीनेच स्थळ आणलेलं असल्यानं परिवाराची माहिती सहज मिळत होती. अजूनही बरेच लोक अशीच माहिती मिळवतात. पण तुम्हाला विश्वास बसणार नाही आजकाल लग्नात होणाऱ्या फसवणुकीमुळे लोक लग्नाआधी परिवाराचं बॅकग्राउंड चेक करण्यासाठी मॅरेज स्पाय म्हणजे डिटेक्टिव नेमतात. आजकाल हा मॅरेज स्पायचा ट्रेण्ड खूप वाढला आहे. महत्वाची बाब म्हणजे भारतातही हा ट्रेण्ड बघायला मिळतो.
लग्नाआधी समोरच्या परिवाराबाबत माहिती मिळवण्यासाठी आजकाल मॅट्रिमोनिअल डिटेक्टिव हायर केले जात आहेत. हे डिटेक्टिव लग्नाआधी मुलगा किंवा मुलीचं वागणं, अफेअर्स, बिझनेस, नोकरी, परिवार, नातेवाईक, परिवाराचा इतिहास आणि इतरही अनेक माहिती आपल्या क्लाएंटला पुरवतात. जेणेकरून आई-वडिलांच्या मनात कोणताही संशय राहू नये.
मॅरेज डिटेक्टिव
लग्न म्हटलं की, अनेक गोष्टींची बुकिंग, खरेदी करावी लागते. पण आजकाल आई-वडील ही सगळी कामं सोडून आधी मॅरेज डिटेक्टिव बुक करण्यावर भर देत आहेत. दिल्ली आणि इतर मोठ्या शहरांमध्ये मॅरेज डिटेक्टिव म्हणजे मॅरेज स्पायचा बिझनेस चांगलाच फोफावला आहे. दिल्लीतील असच एक मॅरेज स्पाय ब्युरो चालवणाऱ्या मालकानं सांगितलं की, लोकांना आपला होणारा जावई किंवा सूनेबाबत लग्नाआधी सगळं जाणून घ्यायचं आहे. कारण लग्न मोडण्याचा दोष त्यांना आपल्या जवळच्या लोकांना द्यायचा नाही.
ते म्हणाले की, एक क्लाएंट त्यांच्याकडे आली आणि म्हणाली की, त्यांचा लग्नाचा अनुभव वाईट होता आणि नंतर लग्न फेल झालं. पण जेव्हा तिच्या मुलीनं म्हटलं की, तिला बॉयफ्रेन्डसोबत लग्न करायचं आहे, तेव्हा जराही उशीर न करता त्या मॅरेज स्पायकडे आल्या. त्यांना फक्त हे जाणून घ्यायचं होतं की, ज्या मुलासोबत त्यांची मुलगी संसार थाटणार आहे त्याचं बॅकग्राउंड कसं आहे.
कशी असते कामाची पद्धत?
एखाद्या डिटेक्टिवसारखं मॅरेज स्पायचं काम वधू किंवा वर पक्षाची सगळी माहिती काढणं असतं. म्हणजे जर एखाद्या मुलाची माहिती काढण्याचं काम आलं तर स्पाय त्यावर काम करेल. मुलगा काय काम करतो, कुठे काम करतो, त्याला खरंच किती पगार आहे, त्याचं अफेअर आहे का, कौटुंबिक वाद, परिवाराची माहिती गोळा केली जाते. अनेकदा हेही चेक केलं जातं की, संभावित जोडीदार गे किंवा लेस्बियन तर नाही ना. मॅरेज स्पाय कंपन्यांचं नेटवर्क चांगलं वाढलं आहे. प्रत्येक गाव आणि नगरांमध्ये त्यांचे कॉन्टॅक्ट असतात. दिल्लीत बसलेल्या क्लाएंटला या नेटवर्कच्या माध्यमातून माहिती मिळवून दिली जाते. आधी हेच काम शेजारी किंवा नातेवाईक करत होते.
आतापर्यंतच्या केसेस पाहता मॅरेस स्पाय जेंडर, अफेअर, आधीचं लग्न आणि पगार इत्यादी माहिती मिळवतात. एक केस अशी होती की, ज्यात एका मुलानं त्याला ७० हजार डॉलर पगार असल्याचं सांगितलं होतं. मात्र, स्पायनं माहिती काढली तर त्याचा पगार केवळ ७ हजार डॉलर इतका होता. अशात एक परिवार फसणुकीपासून बचावला.