डॉ. श्रुती पानसे
वास्तविक भारतीय माणसांना काही गोष्टी नव्याने सांगायला नकोत! उदा. टीमवर्क, दुसयाला आदर देणं, दुसऱ्याचं मत ऐकून घेणं. आणि बायकांना तर नाहीच नाही, त्यांना तर जमवून घेणं शिकवलेलं असतं. आपल्याकडे एखाद्याच्या घरच्या कार्याला मदत करण्यासाठी खूपखूप माणसं जमा होतात. गावाकडे तर हा एकोपा जास्त दिसतो. शहरात तो कमी असला तरी ‘काही मदत लागली तर सांगा’ असं म्हटलं जातं. मदत केलीही जाते. त्यामुळेच ‘हाऊ टू बिल्ड टीमवर्क’ अशा प्रकारची वर्कशॉप्स घ्यावी लागत नाहीत. कारण टीमवर्क म्हणजे काय हे आपल्याला माहीत आहे. मात्र तरीही नव्याने आलेल्या या विदेशी संकल्पना आपण माहीत करून घ्यायला हव्यात. कारण अशा विषयांवर सेमिनार्स होतात. तिथे शोधनिबंधांचं सादरीकरण केलं जातं. त्यामुळे बिल्डिंग टीमवर्क, सोशल इंटेलिजन्स, इमोशनल इंटेलिजन्स वगैरे विषयांची तोंडओळख असली पाहिजे. कारण, अर्थातच ही सारी समूहजीवनासाठी आवश्यक असणारी मूल्यं आहेत.
(Image : Google)
सोशल इंटेलिजन्स म्हणजे काय?
समाजातल्या माणसांशी चांगले संबंध ठेवण्याची बुद्धिमत्ता. ही सामाजिक बुद्धिमत्ता असं सांगते की, कोणतीही वस्तू आपल्याला पैशांमुळे खरेदी करता येते. पैसे नसतील तर वस्तू खरेदी करता येणार नाहीत. मात्र त्याही पेक्षा महत्त्वाचं आहे, समाजातल्या विविध लोकांशी असलेले चांगले संबंध. जर आपल्या खूप चांगल्या ओळ्खी असतील तर ती एक प्रकारची उत्पादनक्षमताच असते, असं म्हणता येईल. कारण ही क्षमता वाढते ती आपल्या वेगवेगळ्या लोकांशी असलेल्या ओळखी, जवळचे किंवा लांबचे नातेवाईक, शेजारी, आपले मित्रमैत्रिणी, कमी आधिक ओळखीची, वेगवेगळ्या स्तरातली माणसं ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. लहानपणापासून आत्तापर्यंतचा विचार केला तर आपले वेगवेगळे ग्रुप्स जमलेले असतात. आपल्या ओळखीचे लोक आणि नातेवाईक यांचेही ग्रुप्स असतात. हल्लीच्या भाषेत याला ‘सोशल नेटवर्क’ असंही म्हणतात. ही सर्व माणसं आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची असतात. म्हणूनच बरेच जण इंटरनेटवर ऑनलाईन मित्र शोधतात. मात्र माणसांशी खरंखुरं बोलणं, स्पर्श यांची भरपाई इतर कशातूनही होऊ शकत नाही.
ज्या वस्तू हौसेनं विकत घेतल्या आहेत, त्यांचा खरं तर फारसा आणि खराखुरा उपयोग नसतोच. आपण जर एखाद्या अडचणीत सापडलो, तर कितीही महाग असल्या तरी या वस्तू मदत करायला येणार नाहीत तर, विविध लोकांशी असलेले चांगले संबंध, एकमेकांबद्दल वाटणारी सहानुभूती, घरची माणसं, शेजारी, ऑफीसातले किंवा शिक्षक, प्राध्यापक या सर्वांशी असलेले प्रेमाचे, जिव्हाळ्याचे संबंध यांचाच खरा उपयोग होतो. विशेषत: जेव्हा एखादं आर्थिक संकट कोसळतं, अचानक कोणाला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागतं, तेव्हा माणसंच उपयोगाला येतात.
ही जी माणसं आहेत त्यालाच नव्या, आधुनिक जगात ‘सोशल कॅपिटल’ असं म्हणतात. या तंत्राधुनिक जगाने जिव्हाळ्याच्या माणसांनाही कॅपिटल उर्फ भांडवलाच्या कप्प्यात टाकलं आहे. या युगात या नवनव्या गोष्टी आधुनिक संकल्पना म्हणून समजून घ्यायला हव्यात.
- जसे इतर लोक आपल्या नेटवर्कमध्ये असावेत असं वाटतं, तसं आपणही इतरांसाठी या नेटवर्कचाच भाग आहोत, हे लक्षात घ्या. तुम्हाला शक्य आहे ती मदत इतरांना कराच.
(लेखिका मेंदू अभ्यास तज्ज्ञ आणि करिअर कौन्सिलर आहेत.)