अभिनेता आर. माधवन आणि सुरविन चावला यांची ‘डिकपल्ड’ ही वेब सिरीज १७ डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. लग्नानंतर अनेक वर्षांनी ब्रेकअप करण्याच्या टप्प्यावर उभ्या असलेल्या एका जोडप्याची ही गोष्ट असून दोन्हीही ताकदीचे कलाकार वेब सिरीजमधील जोडप्याची भूमिका साकारत आहेत. या वेबसिरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी त्यावर अतिशय चांगल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. प्रेक्षकांमध्ये या वेब सिरीजबाबत उत्सुकता असल्याचे म्हटले जात होते.
यामध्ये जोडप्याला लग्नानंतर तब्बल २२ वर्षांनी एकमेकांपासून वेगळे व्हायचे असते. त्यांच्या नात्याचे पदर उलगडताना दिग्दर्शकाने नातेसंबंध आणि त्यातील बारकावे टिपण्याचा प्रयत्न केला आहे. या गोष्टीविषयी बोलताना अभिनेता आर. माधवन म्हणतो, “हल्ली जोडपी अगदी सहज एकमेकांपासून वेगळे होण्याचा विचार करतात. मात्र त्यामध्ये प्राधान्यक्रमांची वाट लागते. नात्यामध्ये काय महत्त्वाचे आहे हे दोन्ही बाजुंनी लक्षात घेणे गरजेचे आहे. अशाप्रकारे नात्याची वाट लागण्याचे कारण म्हणजे खूप जास्त ताण आणि डिस्ट्रॅक्शन हे आहे. कॉर्पोरेट ट्रेंडमुळे लोक स्वत:ला अपूर्ण समजतात, मात्र हे योग्य नाही. आपण आपल्या पालकांचे नाते पाहिल्यास आपल्याला समजेल की तेव्हा नाते अजिबात अवघड नव्हते. ”
इंग्रजीमध्ये असणाऱ्या या वेबसिरीजचा ट्रेलर आल्यानंतर अनेक प्रेक्षकांनी हा शो इंग्रजीमध्ये असल्यावरुन माधवनला प्रश्न विचारले, की हा शो हिंदी, तमिळ किंवा इतर भारतीय भाषांमध्ये का काढला नाही. त्यावर तो म्हणाला, या सिरीजचा लेखक इंग्रजी आहे, त्यामुळे तो इंग्रजीतूनच विचार करतो, मग वेगळ्या कोणत्या भाषेत हा चित्रपट काढल्यास त्यातील मजा निघून जाईल. तर या वेब सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत असणारी सुरविन चावला म्हणाली, लोकांना आयुष्यात इतका ताण असताना लोकांना नात्यांमध्ये अडचणी काढायला वेळच कसा मिळतो. पण या वेब सिरीजचा एक भाग असल्याने आपला नात्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला असेही ती सांगते. मनु जोसेफ यांनी या वेब सिरीजची निर्मिती केली असून हार्दीक मेहता यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे.