Join us  

लग्नाआधीच हे का विचारलं नाही? असं भांडण टाळायचं तर लग्नापूर्वी विचारा हे 4 प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2021 1:35 PM

लग्नानंतर संसाराची आर्थिक घडी नीट बसण्यासाठी लग्नाआधीच वधु वरांनी सर्व विषयांसोबतच आर्थिक बाबींवर बोलणं आताच्या काळात आवश्यक झालं आहे. पण आर्थिक विषयावर बोलायचं म्हणजे नेमकं काय?

ठळक मुद्दे दोघेही नोकरी करणारे असतील तर थेट एकमेकांना पगार , आर्थिक मिळकत विचारण्याऐवजी एकमेकांच्या खर्चाशी निगडित आवडी निवडी विचाराव्यात.भविष्यातल्या आर्थिक नियोजनाबद्दल बोलल्यामुळे एकमेकांना आपलं वैयक्तिक आणि एकत्रित आर्थिक नियोजन करायलाही मदत होते.लग्नाआधीच आर्थिक बाबींवर स्पष्टपणे बोलल्यामुळे लग्नानंतर आहे त्या मिळकतीत दोघेही एकमेकांच्या आवडी निवडी जपण्याचा प्रयत्न करतात.

लग्न ठरल्यापासून लग्न होईपर्यंतचा जो मधला काळ असतो तो वध-ुवरासाठी खूप महत्त्वाचा असतो. या काळात वधू वर आणि त्यांचे घरचे लग्नाच्या तयारीत गुंतलेले असतात. वस्तूंची, कपड्यांची, दागदागिन्यांच्या खरेदीला महत्त्व दिलं जातं. दरम्यान वधू वर एकमेकांना भेटतात आणि बोलतातही. त्यांच्या या बोलण्यामधे त्यांच्या भावी आयुष्याचे मुद्दे असतात, लग्नानंतर फिरण्याचं प्लॅनिंग असतं. या सर्व विषयांवर बोलणं हे योग्यच. पण विवाह समुपदेशक यांच्या मते वधु वरांमधे एका महत्त्वाच्या विषयावर बोलणं होणं , चर्चा होणं आवश्यक आहे. हा विषय म्हणजे पैसा. आर्थिक बाब.

आर्थिक नियोजन, खर्चाच्या सवयी, आवडी निवडी, लग्नानंतर खर्चाचं नियोजन, बचतीचं नियोजन हे आर्थि विषय बोलले जाणं दोघांमधलं नातं घट्ट होण्यासाठी, संसाराच्या बाबतीत पुढचं दृश्य स्वच्छ होण्यासाठी खूप आवश्यक आहे. लग्नाआधीच वधु वरांमधे आर्थिक बाबतीत स्पष्टता असेल तर पुढे नात्यामधे अडचणी निर्माण होत नाही. विवाहसमुपदेशक त्यांच्याकडे आलेल्या केसेसचा दाखला देत सांगतात की नवरा बायकोच्या नात्यात प्रेम, भावना या गोष्टींना महत्त्व असतं हे खरं . पण एका टप्प्यानंतर जगण्यासाठी, गरजा पूर्ण करण्यासाठी पैसाच महत्त्वाचा ठरतो. अनेक जोडप्यांमधे केवळ आर्थिक गोष्टींमुळे वादविवाद होतात आणि ते कधी कधी इतके टोक गाठतात की घटस्फोटापर्यंत जातात. हे टाळण्यासाठी, लग्नानंतर आर्थिक बाबतीतही दोघांमधे सुसंवाद, सांमजस्य निर्माण होण्यासाठी, लग्नानंतर संसाराची आर्थिक घडी नीट बसण्यासाठी लग्नाआधीच वधु वरांनी सर्व विषयांसोबतच आर्थिक बाबींवर बोलणं आताच्या काळात आवश्यक झालं आहे. पण आर्थिक विषयावर बोलायचं म्हणजे नेमकं काय याबाबतही विवाह समुपदेशक मार्गदर्शन करतात.

Image: Google

कसा करावा मनी टॉक?

1. नुकतंच लग्न ठरलंय आणि लगेच एकमेकांशी थेट पैशाबद्दल बोलायला सुरुवात करावी हे अवघड आहे. ही गोष्ट ओळख जशी फुलत जाते तशी बोलणं सोपं होतं. या विषयावर बोलताना एकमेकांचा गैरसमज होणार नाही, मनं दुखावली जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी. दोघेही नोकरी करणारे असतील तर थेट एकमेकांना पगार , आर्थिक मिळकत विचारण्याऐवजी एकमेकांच्या खर्चाशी निगडित आवडी निवडी विचाराव्यात. म्हणजे कशावर खर्च करायला आवडतो, कशावर नाही. या एका प्रश्नातूनही एकमेकांच्या खर्चाच्या सवयींबाबत चांगली माहिती मिळू शकते.

2. मनी टॉक करताना वधु वरांनी एकमेकांना आपल्या भविष्यातल्या नियोजनाबद्दल बोलावं. लग्नानंतर पाच वर्षांनी आपण स्वत:ला आर्थिकदृष्ट्या, करिअरच्या बाबतीत कुठे पाहतोय याबद्दल बोलल्यास लग्नाआधीच दोघांचं मिळून आर्थिक ध्येय निश्चित व्हायला मदत होते. हे आपल्याला मिळून करायचंय ही भावना दोघांमधे निर्माण झाल्यानं नातं समंजस आणि घट्ट होण्यास मदत होते. भविष्यातल्या आर्थिक नियोजनाबद्दल बोलल्यामुळे एकमेकांना आपलं वैयक्तिक आणि एकत्रित आर्थिक नियोजन करायलाही मदत होते.

Image: Google

3. आथिक बाबतीत लग्नाआधी वधु-वरांनी एकमेकांशी बोलण्याचा फायदा म्हणजे एकमेकांच्या खर्चाच्या, पैशांच्या निगडित आवडी निवडी कळतात. यापुढचं आर्थिक बोलणं करण्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची ठरते. यापुढच्या टप्प्यात बोलताना आपण किती कमावतो आणि आपला लग्नानंतरच खर्च कशावर आणि किती होणार आहे याचं नियोजन दोघांना करता येतं. ही बाब बोलताना कोणाचा पगार कमी आणि कोणाचा जास्त हा मुद्दा नाही. लग्नानंतर संसाराची आर्थिक बाजू दोघांना मिळून सांभाळायची असल्यानं मिळकत आणि खर्च यांच्या नियोजनावर बोलण्यात मोकळेपणा येतो. यामुळे लग्नानंतर प्रत्यक्ष संसाराला भिडल्यावर दोघांमधे माझं तुझं होण्याची शक्यता मावळते.

Image: Google

4. आर्थिक बाब ही तांत्रिक वाटते. नात्यात पैसा नको असं म्हटलं जातं. पण लग्न ठरल्यानंतर वधु वरांनी मात्र आर्थिक बाबतीत स्पष्टपणे बोललं तर पुढे संसार करताना गोंधळ उडत नाही. एकमेकांच्या आवडी निवडी जपण्याचा दोघांकडूनही प्रयत्न होतो. वधू वर दोघांचेही स्वभाव आणि आवडी निवडी सारख्या नसतात. समजा दोघांपैकी एकाला खर्चाची आवड आहे, फिरण्याची आवड आहे तर एकाला बचतीची आवड आहे तर यामधे समतोल कसा साधायचा यावर हसत खेळत बोलायला लग्नाआधी चांगली संधी मिळते. त्यामुळे आपली आर्थिक मिळकत किती असणार आहे, त्यातला किती भाग आवश्यक त्या खर्चासाठी लागणार आहे, किती पैसे आपण बचत करणार आहोत, किती पैसे आणीबाणीच्या खर्चासाठी ठेवून आपल्या दोघांच्या आवडी निवडी जपण्यासाठी किती पैसे उरणार आहेत, हे पैसे एकमेकांना आनंद मिळेल अशा पध्दतीने कसे खर्च करु यावर वधु वर एकमेकांशी बोलले तर नात्याची सुरुवात करतानाच दोघांना एकमेकांचा अंदाज आलेला असतो, विचार कळलेले असतात.

नवरा बायकोच्या नात्यात प्रेम आणि समजुतदारपणा या दोन्ही गोष्टींना सारखंच महत्त्व असतं. त्याची सुरुवात लग्नाआधी मनीटॉकने चांगली होवू शकते.