Join us  

विषारी छळकुट्या नात्यात लोक का राहतात? छळ आणि घुसमट होत असूनही नात्यातून बाहेर का पडत नाहीत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2022 4:57 PM

जवळची कुणी व्यक्ती प्रचंड छळते, त्रास देते तरी त्या व्यक्तीसोबतच राहण्याचे काय कारण? त्यातून बाहेर कसे पडायचे?

ठळक मुद्देकुठल्या क्षणी नात्यातील हे विष आपला किंवा आपल्या प्रिय व्यक्तीचा घात करेल, हे सांगता येत नाही.

- डॉ. हमीद दाभोलकर

श्वास कोंडण्यातून होणाऱ्या घुसमटीचा अनुभव, घुसमटवणारा अनुभव आपल्यातील अनेकांनी घेतलेला असतो. अनेकदा मानसिक पातळीवरही जवळच्या नात्यात असा अनुभव येतो. हे नाते मित्र-मैत्रिणी, नवरा-बायको, लिव्ह एन रिलेशन, सासू-सुनेचे किंवा कामाच्या ठिकाणच्या सहकाऱ्यासोबतचे देखील असू शकते. आपण आहे त्या ठिकाणाहून पळून जावे, असे वाटायला लागते. मनात राग, द्वेष, चिंता, भीती, अस्वस्थता, संशय अशा अनेकरंगी भावनांचा एक मोठा गुंता तयार होतो. आजूबाजूला मोकळी हवा असून देखील ‘आपला श्वास कोंडला’ आहे असे वाटायला लागते!

हे तात्पुरते घडले असेल तर उत्तमच; पण अशा नात्याच्या गुंत्यात अडकून पडल्यावर मात्र एक वेगळेच आव्हान समोर असते. श्रद्धा वालकर आणि आफताब पूनावाला यांच्या नात्यात घडलेले क्रौर्य किंवा बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात स्वत:ला आणि आपल्या सहअध्यायी मुलीला पेटवून देण्याचा प्रसंग हे आपण नुकतेच अनुभवले आहे. ही नात्यातील घुसमट आणि नकारात्मकता योग्य प्रकारे हाताळली नाही तर किती टोकाला जावू शकते, यांचे हे प्रसंग निर्देशक आहेत. यातील कुठलाही प्रसंग आपल्या कुटुंबाच्या देखील वाट्याला कधीही येऊ शकेल, अशी परिस्थिती आहे म्हणून या विषयी आपल्याला माहिती घेणे आवश्यक आहे. आजच्या तरुणाईच्या शब्दात यांना ‘टॉक्सिक रिलेशनशिप’ म्हणतात! अगदी शब्दश: भाषांतर करायचे झालं तर ही नाती विषारी झालेली असतात! कुठल्या क्षणी नात्यातील हे विष आपला किंवा आपल्या प्रिय व्यक्तीचा घात करेल, हे सांगता येत नाही.

(Image : google)

टॉक्सिक/घुसमटवणारी नाती कशी ओळखायची?

टॉक्सिक नात्यात अडकलेल्या व्यक्तीला सातत्याने एक भावना छळते. आपण एका चक्रव्यूहात अडकलो आणि आणि बाहेर जाण्याचा रस्ता दिसेनासा झाला आहे, अशी भावना मनाला सतावत राहते. नात्यांमध्ये सातत्याने घालून पडून बोलणे अपमान यांना सामोरे जायला लागते. जवळच्या नात्यात अपेक्षित असलेला समजूतदार; पण भावनिक आधार अशा गोष्टी यांचा भाव या नात्यांच्यामध्ये दिसून येतो . समोरच्या व्यक्तीला देखील काही भावना आहेत आणि त्याचा आपण विचार करून वागायला पाहिजे, ही सदृढ नात्यासाठी आवश्यक असलेली गोष्ट घुसमटवणाऱ्या नात्यांमध्ये नसते. किंवा जरी असली तरी तिचा वापर केवळ दिखावा करण्यासाठी केला जातो. सतत नकारार्थी तुलना-स्पर्धा यांनी जीव नकोसा व्हावा, असे हे नाते असते. आज या मधील अनेक गोष्टींची तरुण मुला-मुलींच्या संदर्भात चर्चा होत असली तरी आपल्या समाजात लग्नानंतर जाळून मारलेल्या महिला, सातत्याने टोकाचा सासूरवास सोसणाऱ्या महिला यांनादेखील अशा गोष्टींना सामोरे जावे लागत आलेले आहे. पती-पत्नी किंवा मित्र-मैत्रीण यांच्या नात्यातील संशयाची भावना आणि खास करून चारित्र्याच्या संशयाची भावना आणि दारूचे व्यसन हे मानसिक आजार देखील परिस्थिती गंभीर बनण्यास कारणीभूत ठरताना दिसतात. यामधून मग बाधित व्यक्ती टोकाचे मानसिक ताणतणाव, निराशा किंवा चिंतेचे मानसिक आजार यांना बळी पडू शकते. ज्यांच्यामुळे नाते टॉक्सिक होते अशा व्यक्तीला मानसिक उपचाराची गरज असते. बहुतांश लोकांना टोकाचे तीव्र व्यक्तिमत्त्व दोष असतात. अशा व्यक्तिमत्त्व दोष असलेल्या लोकांमध्ये स्वत:कडे तटस्थपणे बघण्याची क्षमता खूप कमी असते. त्यामुळे सहजासहजी ते मानसोपचार घेण्यास तयार होत नाहीत.

(Image : google)

लोक घुसमट करणाऱ्या नात्यात का राहतात?

असा एक स्वाभाविक प्रश्न आपल्याला पडू शकतो. या मागे अनेक कारणे असतात. समाजात आपल्याला पुरेसा आधार देणारे कोणीच नाही, अशी बाहेरची परिस्थिती असते आणि स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा आत्मविश्वास नसतो अशा वेळी ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशा मानसिकतेमधून त्या नात्यात राहण्याचा निर्णय घेतला जातो. या नात्यात अडकून राहणाऱ्या व्यक्तीच्या देखील काही भावनिक/शारीरिक आर्थिक गरजा ह्या नात्यामधून पूर्ण होत असतात. अशा नात्यात होणारी शारीरिक अथवा मानसिक हिंसा एक रेषीय नसते. प्रेम-हिंसा-परत प्रेम असे चक्र असते. त्यामुळे मध्येमध्ये येणाऱ्या या प्रेमाच्या नात्यामुळे एका ठाम निर्णयावर येणे बाधित व्यक्तीला अवघड जाते.

(Image : google)

नातं छळत असेल तर काय कराल?

१. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे प्रसंग आणि नाती कधीना कधी येत असतात. बहुतांश वेळा त्यांचे स्वरूप तात्पुरते असते. आपली स्वत:ची क्षमता, आपल्याला आधार देणारे नातेसंबंध, मित्र-मैत्रिणी यांच्या जोरावर आपण त्या मधून तरून जातो.२. मात्र अशा नात्यामध्ये आपण अडकून पडलो आहोत, अशी भावना सातत्याने होत असेल आणि त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असेल तर मोकळ्या मानाने मानसिक आरोग्य तज्ज्ञाची मदत घ्यावी. समाज काय म्हणेल, याची अजिबात चिंता करू नये.

३. बंद पडलेली गाडी जितक्या सहजी आपण ढकलत गॅरेजमध्ये नेऊन दुरुस्त करून आणतो तितक्याच सहजपणाने आपल्याला नात्यांच्या मेकॅनिककडे जायला काय हरकत आहे?४. शारीरिक बळाचा वापर, न सुटणारे व्यसन, किंवा परत परत सुचवून मदत घेण्यास नकार देणे, टोकाची हिंसा, आत्महत्येची धमकी, जीवाची भीती निर्माण होईल असे वर्तन हे अशा नात्यांच्या मधील रेड फ्लॅग आहेत. या गोष्टी जर घडत असतील तर त्या विषयी कायदेशीर पोलिसांची मदत घेणे हा मार्ग देखील आवश्यक असतो.

५. अशा नात्यांच्या मधून ‘एक घाव दोन तुकडे’ असे बाहेर पडणे अनेक लोकांना जमत नाही म्हणून आपल्या जवळच्या नात्यात अशी बाधित व्यक्ती असेल तर त्यांना जेव्हा गरज लागेल तेव्हा आधार देण्यासाठी आपण आहोत, ही भावना आपण सातत्याने देणे आवश्यक असते.६. नाते जुळवणे आणि त्यामधून बाहेर पडणे याचे देखील आता एक शास्त्रीय आकलन उपलब्ध आहे. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनापासून आपण मुलांना आणि पालकांना याचे धडे देणे काळाची गरज झाली आहे.

 

(लेखक मनोविकारतज्ज्ञ आहेत.)

टॅग्स :रिलेशनशिप