Lokmat Sakhi >Relationship > मला नाही बाई येत पैशाचे व्यवहार, असं अजूनही का सांगतात बायका? नेमकं कशाला घाबरतात?

मला नाही बाई येत पैशाचे व्यवहार, असं अजूनही का सांगतात बायका? नेमकं कशाला घाबरतात?

पैशाचे व्यवहार केले आणि आपलं काही चुकलं तर... या भितीने आर्थिक व्यवहारच न करणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2023 05:02 PM2023-04-22T17:02:31+5:302023-04-22T17:15:20+5:30

पैशाचे व्यवहार केले आणि आपलं काही चुकलं तर... या भितीने आर्थिक व्यवहारच न करणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे कारण..

Why do women still say that I don't want to deal with finance? scared of money matters? | मला नाही बाई येत पैशाचे व्यवहार, असं अजूनही का सांगतात बायका? नेमकं कशाला घाबरतात?

मला नाही बाई येत पैशाचे व्यवहार, असं अजूनही का सांगतात बायका? नेमकं कशाला घाबरतात?

Highlightsआयुष्य 'ओझं' वाटावं इतकं एकमेकांवर अवलंबून राहू नका..!

डॉ. अंजली मुळके 

नेहमीसारखा आजही मोबाईल कुणकुणला. अन्-नोन नंबर होता, पेशंटचा असावा म्हणून उचलला. एक लेडी पेशंट होती. तिने तिचे त्रास आणि इतिवृत्त कथन केले. त्यानुसार मी तिला सल्ला दिला आणि औषधोपचार ऑनलाईन सांगून दिले. (कोरोना काळातली ही गोष्ट.) तिने फी विचारली, मी तिला फी सांगून गूगल पेचा ऑप्शन दिला. ती म्हणाली, "माझ्या मिस्टरांना सांगते पे करायला. ते पे करतील. माझ्याकडे गूगल पे किंवा फोन पे काहीही नाही.."
अन् विचारात पडले..! अक्षरशः पोटात गोळा आला तिचा आणि तिच्यासारख्या सुशिक्षित स्त्रियांचा विचार करून..! कारण मला तिने तिची स्टोरी सांगितली होती--
तिचे मिस्टर कोविड पॉझिटिव्ह होऊन १५ दिवस होऊन गेले होते.. क्रिटिकल असतानाही बेड मिळत नव्हता. कसेतरी सरकारी दवाखान्यात ऍडमिट झाले..
आयसीयू, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि पुढचं सगळं काही महाभारत. आणि इकडे ती दीड वर्षाच्या चिमुकलीला घेऊन स्वतःची, मुलीची एकटीच 'काळजी करत' काळजी घेत होती. घरची ती आता एकटीच अचानक "कर्ती" झाली होती..!


 

साधी फी पे करण्यासाठीही तिने तिच्या बेडवर कोविडशी झुंजत असलेल्या नवऱ्याला फोन करून सांगितलं. त्यानेही लगबगीने ती पे केली..!
आजही भारतीय महिला सुशिक्षित असूनही जवळपास पूर्णपणे कोणा ना कोणा व्यक्तीवर तरी अवलंबून आहेत. मग ती व्यक्ती वडील असतील किंवा भाऊ किंवा बऱ्याच ठिकाणी नवरा.. किंवा पुढे मुलगा वगैरे.. महामारीचं निमित्त असो वा इतर कोणती कौटुंबिक कलहाची कारणं असो किंवा नैसर्गिक आघात असो अथवा सामाजिक समस्या अचानकपणे जेंव्हा घरच्या कर्त्या पुरुषावर संकट कोसळते, तेंव्हा बायका कोलमडून पडतात. त्यावेळी त्यांचा गोंधळ उडतो.
कित्येकदा कौटुंबिक कलहातून देखील अनेकदा स्त्रियांना एकटं राहण्याची वेळ येते किंवा आणली जाते, अशावेळी किंवा घरचा कर्ता पुरुष मृत्यू वा इतर कारणाने तिला एकटं सोडून निघून गेला, अशावेळी, त्या स्त्रीसमोर उरतो तो अंधार..!
हे एकच नाही, अशी कित्येक उदाहरणं मी पाहते आहे.
कित्येक भारतीय स्त्रिया सुशिक्षित, उच्चशिक्षित असूनही, कित्येक जणी कितीतरी लहान सहान गोष्टींवर आपल्या नवऱ्यावर अथवा त्या कर्त्या पुरुष व्यक्तींवर पूर्णपणे विसंबून असतात अचानक हे सर्व अंगावर पडलं की मग सुरू होतो तो घाबरलेल्या जीवाचा धडधडता, संभ्रम अवस्थेतला एकला प्रवास..!
आर्थिक, कौटुंबिक आणीबाणी अचानक येऊन धडक देते.. दिशाहीनता येते. रस्ते कळत नाहीत.. आणि मग कसल्याही प्रकारचा व्यवहार न हाताळलेल्या स्त्रियांना अगदी लहानशा गोष्टीसाठीही मदतीसाठी नातेवाईक, शेजारी अशा कोणा ना कोणासमोर हात पसरावे लागतात..!
त्यातूनही अनेकजणी शिकतात, उभ्या राहतात. पण म्हणूनच स्त्रियांनी आपलं शिक्षण हे केवळ लग्नाचं चांगलं स्थळ मिळण्यापूरतं मर्यादित न ठेवता, त्याचा व्यवहारात उपयोग करावा..!  स्वयंपूर्ण व्हावं. सर्व व्यवहार नेहमी चोखपणे हाताळायला शिकावेत. ज्या व्यावहारिक कामांना, 'पुरुषी कामं' म्हणून आपण सपशेल लेबल लावून टाकलं आहे, ती कामं कधी कधी आपल्या खांद्यावर घ्यायलाही शिकावं. अशी कामं गरज पडल्यास सहज हातावेगळी करता यायला हवी.. आणि त्यांची सवय होईल इतक्यांदा ती करावीत.
आणि पुरुषांनादेखील सुचावावं वाटतं की, बाहेरच्या व्यवहारात आपण जसं निपुण असता, तसं, घरकामात देखील किमान मूलभूत निपुणता स्वतः मध्ये आणणं गरजेचं आहे. घरातील करती स्त्री जर आजारी पडली किंवा अचानक काही झालं, तर घरच्या कामांचा भार आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या अंगावर पडल्या, तर त्यांना हाताळता येणं आपलीदेखील तेवढीच जबाबदारी असते. घरकाम हा काही केवळ स्त्रियांच्या मक्तेदारीचा विषय नसून, ते एक बेसिक स्कील आहे, जे लिंग पक्षपाताचा विषय नसून, ती एक मूलभूत गरज आहे, हे ध्यानात घ्यावं..!
संसारात स्त्री पुरुष सोबत असताना एकमेकांना पूरक ठरतात.. ठरावेत..!
पण काही कारणाने एकाची साथ सुटली, त्यावेळी आयुष्य 'ओझं' वाटावं इतकं एकमेकांवर अवलंबून राहू नका..!
वाईट वेळ येवो अथवा न येवो..
पण कोणत्याही क्षणी स्वतः खंबीरपणे उभं राहता आलं पाहिजे..
म्हणून, आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक स्वयंपूर्ण व्हा.. स्वावलंबी व्हा..
सर्व स्तरावरील व्यवहार हाताळा, शिका.. आत्मनिर्भर व्हा..!
(लेखिका डॉक्टर आहेत.)

Web Title: Why do women still say that I don't want to deal with finance? scared of money matters?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.