शारीरिक संबंध ही एक अतिशय सुंदर अनुभूती आहे. सेक्स केल्यावर मिळणारं समाधान हे शब्दांत मांडता येण्यापलिकडचे आहे. आपल्याकडे सेक्स या गोष्टीकडे अनेकदा केवळ शारीरिक गरज म्हणून पाहिले जाते. पण सेक्स ही केवळ शारीरिक गरज नसून ती मानसिक आणि भावनिक गरजा पू्र्ण करणारी गोष्ट असते हे लक्षात घ्यायला हवे. ज्या व्यक्तीवर आपण मनापासून प्रेम करतो तिच्याशीच आपण पूर्ण एकरुपतेने मानसिक संबंध प्रस्थापित करु शकतो, अन्यथा तो केवळ शारीरिक व्यवहार होतो. सेक्स करताना आणि त्यानंतर आपण भावनिक झालेलो असतो त्यामुळे आपल्या हार्मोन्समध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत असतात. आनंद देणारे, समाधान देणारे हार्मोन्स आपल्या शरीरात सेक्सनंतर स्त्रवतात. मात्र अनेकदा सेक्सनंतर महिलांना रडू येतं, आनंद वाटण्याऐवजी मूड जातो.
हे असं का होतं?
प्रसिद्ध अभिनेत्री लीझा मंगलदास यांनी नुकतीच एक पोस्ट केली आहे. सेक्स संदर्भात सकारात्मक आणि जीवनाशी निगडीत लेखन करण्यासाठी त्या प्रसिध्द आहेत. अतिशय मोकळेपणानं त्या सेक्ससंदर्भात अनेक विषय आपल्या इन्स्टाग्राम, युट्यूब आणि फेसबुक अकाऊंटवर पोस्ट करत असतात. नुकतीच त्यांनी ‘सेक्सनंतर येणारे रडू’ याविषयी एक पोस्ट इन्स्टाग्रामवर केली आहे. त्या पोस्टला भरपूर प्रतिसादही मिळाला.
ही पोस्ट काय म्हणते?
आपल्याला किंवा आपल्या जोडीदाराला सेक्स केल्यानंतर रडायला आले तर तुम्ही त्या भावना समजून घ्या. त्याला भावनिक आधार द्या. सेक्सनंतर रडू येण्याची चार कारणं असू शकतात. आनंद, समाधान, सेक्समध्ये होणारा शारीरिक त्रास किंवा सेक्सबद्दल मनात असलेली अनाठायी भिती. अनेक जणांना सेक्स झाल्यानंतर खूप रडू येते. आता सेक्स हे काही रडण्याचे कारण आहे का असा प्रश्न अनेकांना पडेल. तर त्याचे उत्तर हो असेच आहे. रडणे ही एक तीव्र भावना असून सेक्स केल्यानंतर त्यातून मिळालेल्या आनंदामुळे आपल्याला रडायला येऊ शकते. याला आपण आनंदाश्रूही म्हणून शकतो. यालाच पोस्ट कोइटल ट्रायस्टेस असेही म्हणतात. (ट्रायस्टेसचा फ्रेंच भाषेत अर्थ नैराश्य) या समस्येला पोस्ट कोइटल डिस्फोरिया असे म्हटले जाते. या समस्येमध्ये रडणे हे चांगल्या अर्थाचे असू शकते. रडल्यामुळे आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवण्यास मदत होते आणि आपला तणाव नकळत कमी होतो. ज्याप्रमाणे ताण घालवण्यासाठी सेक्स करणे हा एक उत्तम उपाय मानला जातो. त्याचप्रमाणे ताण कमी करण्यासाठी सेक्सनंतर रडायला आले तर त्याची मदतच होते. सेक्स हा आपल्या भावनांशी निगडीत असल्याने अशाप्रकारे रडू येणे अगदी सामान्य गोष्ट आहे.
रडणे आणि त्याचा अर्थ
सेक्सनंतर रडू येणं ही बाब सामान्य असली तरी त्यासंदर्भात बोललं पाहिजे. तसं कुणाला होत असेल तर त्यातून गैरसमज न वाढवून घेता, त्यातलं शास्त्रीय सत्य आणि संवेदनशिलतेने जोडीदाराचा विचार करणं जास्त गरजेचं आहे.