सेक्स ही आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट. ही ज्याप्रमाणे शरीराची गरज असते तशीच ती भावना आणि मनाचीही गरज असते. मनावरील ताण कमी करण्यासाठी, मानसिक शांततेसाठी आणि आतून आनंदी वाटण्यासाठी सेक्स महत्त्वाचे काम करतो. सेक्स ही एक सुखद भावना असून आपला ज्या व्यक्तीवर विश्वास असतो, प्रेम असते त्या व्यक्तीसोबत ही क्रिया अधिक खुलून येते. मुख्य क्रियेबरोबरच सेक्समध्ये फोरप्ले महत्त्वाचा असतो. फोरप्लेमुळे शरीराला मुख्य क्रियेसाठी तयार केले जाते. त्याचप्रमाणे सेक्सनंतरही काही गोष्टींची आवर्जून काळजी घेणे महत्त्वाचे असते. पण याबाबत आपल्याकडे पुरेसे उघडपणे बोलले जात नसल्याने आपल्याला त्याची माहिती नसते. आफ्टरप्ले हा शब्दच आपल्याकडे प्रचलित नाही. अनेक बायका तक्रार करतात की सेक्शुअल ॲक्टनंतर पती लगेच झोपून जातात. अनेकींना त्याचा अत्यंत रागही येतो. वादही होतात. मात्र हे आफ्टरप्ले नक्की असतं काय? प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. युवराज जडेजा याबाबत काही महत्त्वाच्या गोष्टीं सांगतात.
आफ्टरप्ले म्हणजे काय?
सेक्स केल्याने आपल्या शरीरात काही हार्मोन्सची निर्मिती होते. ऑक्सिटोसिन, डोफामाइन, प्रोलॅक्टीन अशी रसायने स्त्रवतात. हे हॉर्मोन्स पूर्वस्थितीला येण्यासाठी सेक्स झाल्यावर काही गोष्टी करणे आवश्यक असते. सेक्समध्ये आपण तो सुखाचा क्षण तर अनुभवतोच पण त्यापलिकडे जाऊन जोडीदारसोबत होणारी आपली जवळीक आपले नाते घट्ट करण्यास मदत करणारी असते. त्यामुळे या क्रियेनंतर आपण काही गोष्टी एकत्रित केल्यास आनंद आणि समाधान वाढण्यास मदत होते.
काय करावे?
सेक्स झाल्यावर आपल्या जोडीदाराला मिठी मारणे, काही काळ त्याच्या कुशीत राहणे गरजेचे असते. इतकेच नाही तर आता झालेली क्रिया आपल्याला कशी आनंद देणारी होती याविषयी बोलायलाही हरकत नाही. एकत्र काहीतरी खाणे किंवा एखादा टीव्ही शो पाहणे, सेक्सनंतर एकत्रित आंघोळ करणे यामुळे तुमची सेक्सची क्रिया आणखी परिपूर्ण आणि आनंददायी होऊ शकते. आता यामध्ये प्रत्येक कपलच्या आवडीनुसार फरक असू शकतो. पण आपल्या जोडीदाराची आवड लक्षात घेऊन यातील काही गोष्टी आवर्जून करायला हव्यात ज्यामुळे तुम्हाला नक्कीच जास्त आनंद मिळू शकतो.
हे का महत्त्वाचं?
आपल्या शरीराचा उपभोग घेतला आणि त्यानंतर आपल्याला बाजूला केले असे काही वेळा जोडीदाराला वाटू शकते. किंवा आपण इच्छा नसताना समोरच्याच्या मनाचा विचार करुन हो म्हणालो असंही वाटू शकतं. ही अशी भावना मनात निर्माण झाली नात्यातले काच वाढू शकतात. त्यामुळे सेक्सनंतर एकमेकांना आदराने वागवणे आणि एकमेकांच्या सोबत काही काळ घालवणे आवश्यक असते. नातं अधिक घट्ट व्हायला त्यानं मदत होते.