गौरी पटवर्धन
नवीन रेसिपीज…वजन… गॉसिपिंग… आमच्या मनातलं ओळखा...
बायकांवर केव्हाही, अगदी जाता जाता कोणीही सहज जे विनोद करतं, त्यात या विषयांचा नंबर सगळ्यात वर असतो. त्यातही “आमच्या मनातलं ओळखा” हा विषय यामध्ये सगळ्यात वर असतो. बायका सतत कशा रुसतात, आपल्या मनातलं समोरच्याने, त्यातही नवऱ्याने ओळखावं असा हट्ट धरतात, असं समोरच्याच्या मनातलं ओळखणं कसं अशक्य आहे, पुरुष कसं कधीच असं मूर्खासारखं वागत नाहीत या विषयांवरचे ज्योक्स सतत समाजमाध्यमांवर फिरत असतात. आणि तो ट्रॅप असा आहे की त्यात भले भले फसतात. एरवी स्त्री - पुरुष समानतेवर ज्यांचा विश्वास आहे त्यांनाही हे नॅरेटिव्ह पटतं इतकं ते फुलप्रूफ वाटतं.
पण ते खरंच तसं आहे का?
बायका ज्यावेळी आमच्या मनातलं ओळखा असं म्हणतात किंवा तशी अपेक्षा करतात त्यावेळी त्यांच्या मनात नेमकं काय असतं?
ते समजणं इतकं अशक्यप्राय आहे का?
बायका मनातलं ओळखा असं म्हणतात त्याचं एखादं उदाहरण बघू. तिचे आईवडील दोन दिवसासाठी तिच्याकडे येणार असतात. तिची अपेक्षा असते की नवऱ्याने जमलं तर त्यातला एखादा दिवस सुट्टी टाकावी, किंवा निदान हाफ डे तरी घ्यावा. तेही शक्य नसेल तर निदान लौकर घरी यावं. आणि अगदीच किमान अपेक्षा सांगायची तर निदान नेमकं त्याच दिवशी मित्रांबरोबर रात्री ‘बसायचा’ प्लॅन करू नये. पण अनेक नवरे मंडळींना ही अपेक्षा समजत नाही. बायको ती अपेक्षा त्या वेळी स्पष्ट बोलून दाखवत नाही. नंतर केव्हातरी झालेल्या भांडणात ती तो मुद्दा मांडते. तेव्हा तो चिडून म्हणतो,
“मग तेव्हाच सांगायचंस ना? मी आलो असतो लवकर.”
ती म्हणते,
“सांगायला कशाला पाहिजे? तुझं तुला कळत नाही का?”
तो म्हणतो,
“मला कसं कळणार तुझ्या मनात काय चालू आहे ते? मला वाटलं की तुला तुझ्या आईवडिलांबरोबर एकटीला जास्त वेळ घालवायला मिळावा म्हणून मी मुद्दाम बाहेर गेलो.”
त्याने त्याचा हेतू स्पष्ट केल्यावर त्या भांडणाचा डेड एन्ड येतो. आणि मग पुढे फक्त त्यातले आरोप प्रत्यारोप उरतात.
पण मुद्दा असा आहे की तिची अपेक्षा काय असेल हे समजणं खरंच इतकं अशक्य आहे का? आणि त्याची बायकोकडून अशी कधीच काही अपेक्षा नसते का?
अगदी हेच उदाहरण जर घेतलं, की नवऱ्याचे आईवडील चार दिवसांसाठी रहायला आले आहेत, तर नवऱ्याची बायकोकडून काय अपेक्षा असेल? तिने सुट्टी घ्यावी, त्यांची सेवा करावी, त्यांना चार पदार्थ करून खाऊ घालावेत, त्यांच्याबरोबर बाहेर / गावातल्या इतर नातेवाईकांकडे जावं. त्याची अशी अपेक्षा असेल, का तिने होता होईल तो बाहेर रहावं, जमलं तर रात्री उशिरापर्यंत मैत्रिणीच्या घरी जावं म्हणजे आपल्याला आपल्या आईवडिलांबरोबर एकट्याने वेळ घालवायला मिळेल असं त्याला वाटेल?
दुसरा पर्याय मांडला तरी हसू येईल इतकी ती अतिशयोक्ती वाटते. पण मग नवऱ्याने एक्झॅक्टली तेच केलेलं असतं आणि ते मात्र नॉर्मल समजलं जातं. असं का? तो कधी त्याची अपेक्षा बोलून दाखवतो का? की बाई तू आता शक्यतो घरी थांब, माझ्या आईवडिलांना वेळ दे वगैरे वगैरे? नाही.
तो का बोलून दाखवत नाही? कारण सगळं आपोआप त्याच्या अपेक्षेप्रमाणे घडतं.
मग बायकांना का कायम, मनातलं ओळख म्हंटलं की लगेच दोष दिले जातात?
विचार करुन पहा..