Join us  

आता एवढंच कुठं उरवता, घासभर तर आहे खाऊन टाका! - असा बायकोचा धाक, म्हणून सुटतेय नवऱ्याची ढेरी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 7:26 PM

नवऱ्यांची ढेरी सुटण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचं कारण म्हणजे जेवताना बायकोचा असलेला धाक.. 

ठळक मुद्देनवऱ्यांची ढेरी सुटण्यामागे बायकांचा अतिआग्रह आणि उरलेलं सगळं संपवून टाकण्याचा हट्ट हे एक कारण असू शकतं.

विशेषत: रात्रीच्या जेवणाच्या वेळी बहुतांश घरात एकसारखे चित्र दिसून येते. जेवणाच्या टेबलवर सगळे कुटूंब जेवत असते. जेवणं होऊन डब्यात अगदी अर्धीच पोळी किंवा पराठा, थोडासाच भात किंवा मग अर्धी वाटी वरण किंवा भाजी असं अगदी थोडसंच काहीतरी उरलेलं असतं. हे उरलेलं अन्न दुसऱ्या दिवशी सकाळी खाणं आरोग्यासाठी चांगलं नसतं आणि टाकून देणं पण जिवावर येतं. 

 

मग यासाठीचा उत्तम पर्याय म्हणजे नवऱ्याला खाण्याचा आग्रह करणे. हा बहुतेक बायकांचा आवडीचा छंद. "हे एवढंच तर राहिलंय आता कुठे टाकून द्यायचं.... "असं म्हणत रात्री घरात उरलेलं सगळं अलगदपणे नवऱ्याच्या ताटाकडे ढकलून दिलं जातं. नवरा नाही- नाही, नको- नको म्हणत असताना बऱ्याचदा त्याला पोटाच्यावर खाऊ घातलं जातं. अर्थात बऱ्याच बायकाही उरलेलं संपवायला हातभार लावतात. पण काही अशाही असतात की मला बाई जाणारच नाही, असं म्हणत चटकन बाजूला होऊन जातात. पण नवऱ्यांची मात्र पंचाईत होते. बायको आग्रहाने घ्या- घ्या म्हणत असताना फार नाही म्हणणे देखील जमत नाही. त्यामुळे मग पोटावर अत्याचार सुरू होतो.

 

आहारतज्ज्ञ सांगतात..नवऱ्यांची ढेरी सुटण्यामागे बायकांचा अतिआग्रह आणि उरलेलं सगळं संपवून टाकण्याचा हट्ट हे एक कारण असू शकतं. रात्रीच्या वेळी कमी आहार घेतला पाहिजे. त्यामुळे पचन व्यवस्थित होते. पण बऱ्याचदा रात्रीच खूप जास्त खाल्ले जाते. त्यामुळे मग योग्य पद्धतीने पचन होत नाही आणि अतिरिक्त चरबी साठत जाते. रात्रीच्या वेळी पोटाच्या वर जेवणापेक्षा पोटात थोडी भुक शिल्लक राहील, अशा पद्धतीने जेवण करावे.

 

पोट सुटण्याची अन्य कारणे- मसालेदार पदार्थांचे अतिसेवन- व्यायामाचा अभाव- साखर अतिजास्त प्रमाणात खाणे- बैठे काम खूप जास्त असणे- खूप घाईघाईने आणि व्यवस्थित न चावता जेवणे- जेवल्यानंतर लगेचच झोपणे- भुक लागलेली नसतानाही जेवणे- अपचनाचा त्रास असणे

 

टॅग्स :रिलेशनशिपआरोग्यअन्न