- डॉ. अंजली मुळके
एक वेगळीच हतबलता जाणवत आहे. काय बोलावं? काय आणि कसं व्यक्त व्हावं?
निसर्गाने स्त्रियांना प्रजननाचं अमूल्य वरदान दिलेलं आहे. ज्यातूनच मनुष्यजात जन्माला आली आहे.
तरीही ‘तिच्याच’ शरीरावर, मनावर, भावनांवर, तिच्या स्वातंत्र्यावर पुरुषांनी पिढ्यानपिढ्या रक्तबंबाळ होईपर्यंत ओरखडे ओढले.
आजवर असंख्य अमानुष अत्याचार झाले, पण त्यावर काहीच उपाय सापडू नये? अत्याचार झाल्यावर कुठल्याच यंत्रणा ‘तिच्या’साठी ठोस पाऊलं उचलू शकत नाहीत?
कित्येक अत्याचारांच्या घटना, तर चुटकी सरशी दाबल्या जातात. कोर्टापर्यंत येतात त्यांना तारीख पे तारीख मिळत जातात आणि वर्षानुवर्षे न्यायाची प्रतीक्षा करून कित्येक पीडिता अन्यायाचं ओझं उरी कपाळी घेऊन कायमचं या जगातून अलविदा होतात. फारच बभ्रा झालाच एखाद्या अशा घटनेचा, तर तिच्या नातेवाइकांच्या पुढ्यात चार पैसे फेकले जातात.
स्वातंत्र्यानंतर ७८ वर्षांनी देखील मुलगी तिच्या कामाच्या ठिकाणी देखील सुरक्षित राहू शकत नसेल, तर या स्वातंत्र्याला खरंच स्वातंत्र्य म्हणायचं का?बाकी समाजाचंही तेच ‘सामाजिक भान’, ‘कर्तव्य’ वगैरे गोष्टी त्यांना रिकामटेकड्याच वाटतात.
बातमी ऐकली, तर कानावर हात ठेवू किंवा हवं तर तेवढ्यापुरते चार शब्द सोशल मीडियात ठेवू, एखादा फोटो स्टेटस किंवा डीपीवर ठेवून निषेध तेवढा व्यक्त करू. पण, बाकी काय? कोपर्डी, खैरलांजी, मणिपूरवर त्या-त्या जातीधर्माचे, त्या-त्या राज्याचे लोक बोलतील, गुजरात, श्रीनगर, उन्नाव, हाथरस घटनेशी काय देणं घेणं, इतरांचा काय संबंध, असाच एकूण सूर.
पिडीता कुठल्या सामाजिक घटकाची होती, त्या घटकातील लोक त्याविरुद्ध मेणबत्ती मोर्चे काढतील. ती आमच्या व्यवसायाची नव्हती, आमच्या क्षेत्राशी संबंधित नव्हती, मग आम्ही आमचे निषेधाचे शब्द कुठेही वाया का घालवायचे? आमच्या घरी नाही ना, मग आम्ही कशाला बोलायचं? विरोध करत, न्याय वगैरे मागण्याची आम्हाला गरजच काय, असंच एकूण वागणं.
पण ध्यानात असू द्या, जफर गोरखपुरी म्हणतात...
आग तेरी हैं ना मेरी, आग को मत दे हवा,
राख मेरा घर हुवा, तो तेरा घर देखेगा कौन.
आज घडलं, उद्या विसरलं. पुन्हा घडलं, पुन्हा विसरलं. हा आमचा समाज.
समोर अत्याचार होत असला, तरी त्यात पडण्यापेक्षा, त्याचा व्हिडीओ काढत लाइक्स मिळवणारी पिढी आम्ही निर्माण केली आहे.
एवढंच काय, आमच्या घरातल्या देखील स्त्रियांना भावना, मन असतं, याची जाणीव आम्ही कधी ठेवली नाही.
जन्माला येण्यापासून ते मरेपर्यंत घरातलीच स्त्री तिच्या अस्तित्त्वासाठी झगडत आहे.
शारीरिकच नाही, तर मानसिक, भावनिक, आर्थिक, सामाजिक सर्वच प्रकारे अत्याचार महिलांवर होतात.
पण, लक्षात असू द्या, जोपर्यंत तुम्ही इतरांच्या मुलींना सुरक्षा देणार नाही, तोपर्यंत तुमच्या मुली सुरक्षित राहणार नाहीत!
आज मोठ्या कष्टाने, विरोध झुगारून मुली सुशिक्षित व्हायला लागल्या आहेत. मात्र, अशा वारंवार होणाऱ्या घटनांच्या धास्तीने मुलींना शिक्षणासाठी पालक कोणत्या भरवशावर पाठवतील? मुलींच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि वैयक्तिक विकासावर परिणाम होणार नाही का? परिणामी देशाच्या विकासावर परिणाम होणार नाही का?
कसं जपायचं महिलांनी स्वत:चं अस्तित्त्व? की पुन्हा गुलाम होऊन पुरुषसत्ताक जोखडात बांधून घेऊन जगायचं? हे जर बदलायचं असेल, तर महिलांनी स्वतःलाच बदलायला हवं. पोलादी बनून घाव झेलायला नाही, तर घालायला शिकायला हवं!
राहत इंदौरी म्हणतात तसं...
ना हमसफ़र, ना किसी हमनशींसे निकलेगा,
हमारे पाॅंव का काटा हमी से निकलेगा !