Join us  

Women's Life : रिसर्च सांगतात, विवाहित स्त्रियांचे पॉर्न पाहण्याचे प्रमाण वाढले! मात्र हा दावा खरा की खोटा?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2021 7:20 PM

Women's Life : अलिकडेच समोर आलेल्या रिसर्चनुसार विवाहित स्त्रियांमध्ये पॉर्न (Married Women) पाहण्याचं प्रमाण अधिक आहे.

ठळक मुद्देलग्नाआधी आणि नंतर लैंगिकतेबद्दलचे वर्तन आणि दृष्टिकोन कसे बदलतात हे पाहण्यासाठी संशोधकांच्या एका गटाने शंभर विवाहित पुरुष आणि स्त्रियांची मुलाखत घेतली. आधीच्या तुलनेत सध्या आधुनिक साधनांची उपलब्धता जास्त असल्याने पॉर्न पाहण्याचं प्रमाण वाढलंय पण ते फक्त महिलांमध्येच नाही, तर पुरूषांसह आता लहान मुलंही पॉर्न पाहायला लागली आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला पॉनोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली. पॉर्न फिल्म बनवणं आणि त्या प्रसिद्ध करणं या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली असून त्यानंतर सोशल मीडियावर पॉर्नसंबंधी वेगवेगळी माहिती, रिसर्च तुफान व्हायरल झाले. अलिकडेच समोर आलेल्या रिसर्चनुसार विवाहित स्त्रियांमध्ये पॉर्न (Married Women) पाहण्याचं प्रमाण अधिक आहे.

लग्नाआधी आणि नंतर लैंगिकतेबद्दलचे वर्तन आणि दृष्टिकोन कसे बदलतात हे पाहण्यासाठी संशोधकांच्या एका गटाने शंभर विवाहित पुरुष आणि स्त्रियांची मुलाखत घेतली. यूरोपियन फेडरेशन ऑफ सेक्सोलॉजी (European Federation of Sexology) यांनी केलेल्या एका रिसर्चमधून विवाहित स्त्रियांमध्ये पॉर्न पाहण्याचं प्रमाण अधिक असल्याचा हा खुलासा झाला आहे. त्याउलट लग्न झाल्यानंतर पुरुषांमध्ये मात्र पॉर्न पाहण्याचं प्रमाण कमी झाल्याचंही या अभ्यासात समोर आलं आहे.

या सर्वेक्षणात 9 टक्के महिलांनी लग्नाआधी पॉर्न पाहत असल्याचं सांगितलं. तर 28 टक्के महिलांनी लग्नानंतर पॉर्न पाहत असल्याची माहिती दिली. पुरुषांमध्ये हे प्रमाण अगदी उलट असल्याचं सर्व्हेतून समोर आलं. लग्नाआधी 23 टक्के पुरुष, तर लग्नानंतर 14 टक्के पुरुष पॉर्न पाहत असल्याचं सांगितलं. या रिसर्चमधून समोर आलेल्या माहितीनुसार  रोजच्या जीवनातील ताणतणाव कमी करण्यासाठी महिला पॉर्न पाहात असाव्यात. सेक्स लाईफ फँटसीची इच्छा हे देखील 6.9 टक्के महिलांमध्ये पॉर्न पाहण्याचं कारण आहे. लग्नानंतर अनेकदा पुरुषांकडून सेक्स लाईफकडे दुर्लक्ष होतं, पार्टनरवर फारसा इन्टरेस्ट नसतो. त्यामुळेच स्त्रिया लग्नानंतर पॉर्न पाहत असल्याचंही समोर आलं आहे.

या दाव्यात कितपत तथ्य आहे?

लैगिंक विकार तज्ज्ञ डॉ. राजन भोसले यांनी सांगितले की, ''लैंगिक विषयांबाबत किंवा पॉर्न पाहण्याबाबत युरोपिन देशातील स्त्रिया आणि भारतीय स्त्रिया यांची तुलना केली जाऊ शकत नाही. त्यामुळे हा रिसर्च सर्व व्यापक असू शकत नाही. आधीच्या तुलनेत सध्या आधुनिक साधनांची उपलब्धता जास्त असल्याने पॉर्न पाहण्याचं प्रमाण वाढलंय पण ते फक्त महिलांमध्येच नाही, तर पुरूषांसह आता लहान मुलंही पॉर्न पाहायला लागली आहेत. आजकाल सगळेच आपापल्या मोबाईलवर आपल्या आवडीनुसार पॉर्न पाहतात. त्यामुळे फक्त विवाहित स्त्रियांमध्येच पॉर्न पाहण्याचं प्रमाण वाढलंय असं गृहित धरणं योग्य ठरणार नाही.''

पुढे भोसले सांगतात की, ''अनेकदा वॉट्सअॅप ग्रुप्सवर मित्र मैत्रिणींकडून  लिंक्स, व्हिडीओज पाठवले जातात. त्यामुळे इच्छा नसतानाही असे व्हिडीओ वारंवार समोर येत असतात. स्वतःहून सर्च केलेलं नसतानाही सतत सोशल मीडियावर असे सहजासहजी व्हिडीओज दिसतात. सध्या लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत पॉर्न कोणाच्याही पाहण्यात  येऊ शकते. त्यामुळे सरसकट वैवाहिक महिलांमध्ये पॉर्न पाहण्याचं वाढलंय असा अंदाज बांधता येणार नाही.''

पॉर्नमधील गोष्टी कितपत वास्तविक असतात?

पॉर्नच्या बघण्याच्या सवयीबाबत डॉ. राजन भोसले सांगतात , ''पॉर्नच्या माध्यमातून जे काही पाहिलं जातं ते कृत्रिम आणि अतिरंजित असतं. पॉर्नमध्ये काम करणारे पोर्नस्टार त्यांच्या वैयक्तिक जीवनातही अशा प्रकारचा सेक्स करत नाही. उदा. सिनेमात अनेकदा एक हिरो ८ ते १० अनेक गुंडाना मारताना दाखवला जातो. प्रत्यक्षात मात्र एक व्यक्ती एवढ्या लोकांचा एकट्यानं सामना करू शकत नाही. करमणुकीसाठी ही कलाकृती तयार केली जाते. त्याचप्रमाणे पॉर्नसुद्धा करमणुकीसाठी तयार करण्यात येत असून ते आभासी आहेत. त्यात वास्तवदर्शी असे काहीच नाही. हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे, स्वतःकडून किंवा जोडीदाराकडून त्याप्रकारच्या अपेक्षा करू नयेत. मुख्य म्हणजे पॉर्न व्हिडीओमध्ये अनेकदा जे संबंध दाखवले जातात. ते प्रत्यक्षात घडत नसून तसं भासवलं जातं.  हावभाव, हालचाली, प्रचंड प्रमाणात उत्तेजना  कृत्रिम असतात. कारण त्यांना व्हिडीओ तयार करण्यासाठी अशा प्रकारच्या सूचना दिल्या जात असतात. एकाचवेळी ३, ४ कॅमेरे लावले जातात. प्रत्यक्षातील संबंध अर्धा मिनिट असेल तरी वेगवेगळ्या अँगलनं तो बराच वेळ सुरू असल्याचं दाखवलं जातं.'' 

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिपलैंगिक जीवन