निकिता पाटील“Embracing Diversity, Strengthening Families अशी यंदाच्या जागतिक कुटुंब दिनाची थीम आहे. समाजातल्या विविधतेविषयी आपण बोलतोच; पण, कुटुंबातल्या विविधतेचा स्वीकार तरी आपण कितपत करतो? सगळी माणसं, त्यांचे स्वभाव, वागणे, जगण्याची ध्येयं आणि दिशा, स्वप्नं आणि सहनशर्लता हे सारं वेगळंच असणार!
आणि ते सारं वेगळं असूनही आपण एक कुटुंब आहोत, आपण कुटुंब म्हणून कायम एकमेकांच्या सोबत आहोत आणि प्रसंगी त्यापायी नमतं
घेत कुटुंबाचा विचार करतो आहोत हे जास्त महत्त्वाचं असतं.नव्या जगात व्यक्तीकेंद्री आणि स्वकेंद्री जगण्याचे काही प्रश्न आहेतच. आपल्यापलीकडे कुटुंबाचा आणि आपल्या माणसांचाही विचार अनेक जण करीत नाहीत, असे आरोप, टीका वारंवार होतेही.मात्र, सरसकटीकरणातून हा प्रश्न सुटेल असं नाही. कुटुंबाची एक ताकद असते; आणि प्रेमानं जोडलेली नाती केवळ रक्ताचीच असतात असंही नाही. काही मायेचीही असतात.
(Image : google)
त्या नात्यांतून एकमेकांच्या सुख-दु:खातच नाही, तर एकमेकांच्या रोजच्या जगण्यात परस्पर मतांचा आदर करणं ही फार मोठी गोष्ट असते.आपली मतं कुटुंबातील इतर सदस्यांना पटत नाहीत; पण, म्हणून आपल्या नात्यावर त्याचा परिणाम होत नाही इथपर्यंतचा समंजस स्वीकार आणि प्रत्येकाला आपलं जगणं घडवण्याचा अवकाश आणि संधी मिळणं म्हणजे ‘कुटुंबाची साथ’!ती साथ आपण जपू.. त्यातूनच सुदृढ आणि निकोप समाज घडत राहील!