नवरा बायकोचं नातं म्हणजे ‘एक दुजे के लिए’ हे ऐकायला किती रोमॅण्टिक वाटतं ना. पण कधी तर नवीन नवीन लग्न झालं असेल तर त्या दोघांचं विश्व ती दोघंच असतात. पण जसा काळ जातो तसं दोघांपैकी एकाला किंबहुना दोघांनाही स्वत:साठीची ‘स्पेस’ अर्थात अवकाश, वेळ, स्वत:साठीचं जग हवं असं वाटू लागतं. समुपदेशक म्हणतात की नवरा बायकोला आपल्याला स्पेस हवी आहे असं वाटणं यात काही स्वार्थ आहे किंवा चूक आहे असं नाही . उलट ती त्या नात्याची, ते नातं आणखी घटट करण्याची , त्या दोन व्यक्तींची वैयक्तिक आनंदासाठीची गरज असते. ती पूर्ण होणं आवश्यक आहे. नाहीतर प्रेमाच्या नात्यातही गुदमरायला होतं. 'का माझ्याभोवती घुटमळते?' असं नवरा बायकोला ऐकवतो तर, ' लग्न झाल्यापासून मला माझ्यासाठी वेळच मिळत नाही,' अशी चिडचिड बायको नवर्यामागे करते. समुपदेशक म्हणतात नवरा बायकोच्या नात्यात एकमेकांनी एकमेकांना स्पेस दिली घेतली नाही तर नात्यात कडवटपणा येतो, तोचतोचपणा येतो. वाद विवाद भांडणं होतात. वाद विकोपालाही जाऊ शकतात. केवळ नात्यामधे मला माझी स्पेस नाही म्हणून घटस्फोटाचे अर्जदेखील दाखल होतात.
Image: Google
विवाह समुपदेशक नवरा बायकोच्या नात्यात नात्याला जितकं महत्त्व आहे तितकंच एक व्यक्ती म्हणून त्या दोघांचंही वैयक्तिक विश्व, वैयक्तिक आवडी निवडी जपल्या जाण्यालाही महत्त्व आहे. नाहीतर नातंच वैयक्तिक वाढ खुंटली जाण्याचं कारण बनतं. स्पेस हा शब्द माहित नाही असं नाही. पण त्या शब्दाचा नेमका अर्थ, त्याची व्यापकता, त्याच्या सीमारेषा याबाबत गोंधळ उडून त्याचा परिणाम एकमेकांना एकमेकांशी बांधून ठेवण्यात होतो. तेच नकोसं झालं की नवरा बायकोच्या नात्यात कडवटपणा येतो. म्हणून समुपदेशक म्हणतात नात्यातल्या पर्सनल स्पेसची गरज ओळखा, ती गरज पूर्ण करण्याकडे लक्ष द्या आणि त्याचे होणारे सकारात्मक परिणाम अनुभवा.
नवरा बायकोच्या नात्यात पर्सनल स्पेस?
नात्यात पर्सनल स्पेस जपणं, जोडीदाराच्या पर्सनल स्पेसचा आदर करणं महत्त्वाचं. काही वेळ स्वत:साठी काढून स्वत:च्या आवडीनिवडी जपणं, जोडीदाराला त्याच्या आवडीनिवडी जपता येण्यासाठी आपण तसं मोकळं वागणं हे स्पेस या शब्दाच्या अर्थाला अभिप्रेत आहे. यामुळे दोघांनाही वैयक्तिक आनंद मिळतो. ही पर्सनल स्पेस जपताना आपला आनंद आणि नातं या दोघांमधे संतुलन ठेवणं आवश्यक आहे. स्पेसमधे स्वत:कडे लक्ष देणं म्हणजे नात्याकडे दुर्लक्ष करणं नव्हे. म्हणजे सतत आपल्याच आवडी निवडीचा विचार करत त्यासाठी वेळ काढत जोडीदाराकडे, जोडीदाराच्या गरजेकडे दुर्लक्ष करणं नव्हे.
Image: Google
नवरा जेव्हा बायकोला मला थोडी स्पेस दे असं म्हणतो तेव्हा अनेक बायकांना असुरक्षित वाटतं. आपला नवरा आपल्यासोबत आनंदी नाहीये असा अर्थ काढला जातो किंवा बायको जेव्हा स्वत:ची स्पेस जपण्याचा प्रयत्न करते तेव्हा नवर्याला संशय वाटू शकतो किंवा बायको स्वार्थी वाटू शकते. पण समुपदेशक म्हणतात की नवरा स्वत:साठी स्पेस मागतोय तर त्यात बायकोला असुरक्षित वाटण्याचं काहीच कारण नाही. किंवा नवर्यानं बायकोला स्वार्थी म्हणणं, संशय घेणं चूक आहे. स्पेसकडे वैयक्तिक आनंदाची , करिअरमधे पुढे जाण्याची संधी म्हणून बघावं. नवरा त्याची स्पेस जपत असेल तर बायकोनेही आपली स्पेस शोधायला आणि जपायला हवी यामुळे मनातला असुरक्षितपणा दूर होतो असं समुपदेशक म्हणतात.
स्पेसचं टेन्शन आलं तर
समुपदेशक म्हणतात की नवरा बायको आपआपली स्पेस जपता तेव्हा काही गैरसमज होण्याची, मनं दुखावले जाण्याची शक्यता असते. पण ते मनात न ठेवता लगेच जोडीदारासोबत बोलायला हवं. वेळीच या गोष्टी बोलल्या गेल्या तर मनातील गैरसमज मोठे होत नाही. दोघं एकमेकांशी मोकळेपणानं स्पेस संदर्भातील समस्यांवर बोललीत तर मधला मार्ग निघू शकतो. असं अनेकदा होतं की ,नवरा आपली वैयक्तिक स्पेस जपू शकतो, पण बायकोला घरातल्या आणि नोकरीच्या जबाबदार्यांमुळे स्वस्त:ची स्पेस जपणं शक्य होत नाही. तिची घुसमट होत असते. तिला मदतीची गरज वाटते. पण ती कशी आणि कोणाकडे मागावी हे सूचत नाही. अशा परिस्थितीत ही अडचण जर बायकोनं नवर्याजवळ बोलून दाखवली तर तिची आवड जपण्यासाठी काहीतरी मधला मार्ग निघू शकतो.
Image: Google
स्पेस दिली घेतली तर..
1. लग्नाच्या नात्यात नवरा बायकोनं आपआपली स्पेस जपली, एकमेकांच्या स्पेसचा आदर ठेवला तर दोघांनाही स्वत:सोबत राहाण्याठीचा वेळ मिळेल. या वेळामधे आपल्याला आपल्यातल्या कमतरता ओळखता येतात, काय चुका होतात ते कळतं. या चुका दुरुस्त करण्यासाठी मार्ग शोधण्याचे प्रयत्न या स्पेसमधे करता येतात. नवीन कौशल्यं शिकण्यास वेळ मिळतो. मागे पडलेले छंद जोपासण्यास वेळ मिळतो. यातून मन आनंदी होतं, कामात, जगण्यात, नात्यात उत्साह वाटतो.
2. लग्नानंतर असं दोघांच्याही बाबतीत होतं की नातेवाईक, मित्र मैत्रिणी यांना वेळच देता येत नाही. पण स्पेसमुळे आपली इतर नाती, मैत्री जपता येते. त्यांच्यासोबत हसत खेळत वेळ घालवता येतो. यामुळेही ऊर्जा आणि आनंद मिळतो.
3. नवरा बायकोनं एकमेकांना स्पेस दिली, आपआपली स्पेस जपली तर नात्यात समजूतदारपणा येतो , एकमेकांच्या आवडी निवडींचा आदर वाटायला लागतो. नात्यात मोकळेपणा येऊन नातं आणखी घट्ट होतं.स्पेस म्हणजे अंतर नाही तर लग्नाच्या नात्यात स्वत:ला स्वत:च्या जवळ नेऊन आनंदी करण्याचा मार्ग आहे. स्मुपदेशक म्हणतात हा वैयक्तिक अवकाश नवरा बायकोत काही कारणांनी अंतर असेल तर ते दूर करण्यास मदत करतो.