Join us  

1 कप कॉफी तुमच्या खिशाला मोठा खड्डा पाडू शकते! खबरदार, शॉपिंगला जाताना कॉफी प्याल तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2022 4:43 PM

खरेदीला जाताना काय प्यावं, काय पिऊ नये याबाबत विचार करायलाच हवा, कारण...

ठळक मुद्देकॅफीनचा आपल्याला वाटतो त्यापेक्षा शरीरावर जास्त परिणाम होतो, त्यामुळे खरेदीला जाताना हे लक्षात ठेवाकॉफी घेतलेल्या लोकांनी कॉफी न घेतलेल्या लोकांपेक्षा जास्त वस्तू घेऊन भरपूर पैसे खर्च केल्याचे दिसले.

खरेदी म्हणजे महिलांसाठी एक अतिशय आनंदाचे आणि महत्त्वाचे काम. खरेदी करायची असं नुसतं म्हटलं तरी अनेकींना आतल्या आत गुदगुल्या व्हायला लागतात. मग ही खरेदी करण्यासाठी यादी तयार करणे, कोणत्या ठिकाणहून खरेदी करायची त्यासाठी साधारण विचार करुन ठेवणे, पिशव्या घेणे अशी सर्वा प्रथमिक तयारी केली जाते. प्रत्यक्ष खरेदीचा दिवस जसा जवळ येतो तशी आपली एक्सायटमेंट आणखीनच वाढलेली असते. अनेकदा आपण खरेदीला गेल्यावर विनाकारण नको असलेल्या वस्तूही घेऊन येतो. खरेदीची इतकी एक्सायटमेंट असते की काय घेऊ आणि काय नको असे अनेकदा आपल्याा होऊन जाते. मग घरी आल्यावर किंवा काही दिवसांनी आपल्याला अमुक एका गोष्टीची गरजच नव्हती तरी आपण ती घेतली असं आपल्याला होऊन जातं. पण एकदा वस्तू घेतली की ती वापरण्याशिवाय पर्याय नसल्याने आपण अगदीच वाया जायला नको म्हणून ती गोष्ट वापरतो. 

(Image : Google)

आता दिवसभर खरेदीला बाहेर पडायचे म्हणजे व्यवस्थित खाऊन-पिऊन बाहेर पडणे केव्हाही चांगले. म्हणजे बराच वेळ चालणे झाले, बाहेर काही कामांनिमित्त जास्त वेळ गेला तर आपण बराच काळ निवांत फिरत खरेदी करु शकतो. हे जरी खरे असले तरी खरेदीला जाताना कॉफी पिणे आजिबात चांगले नाही. दुपारनंतर खरेदीला बाहेर पडत असू तर आपण चहा किंवा कॉफी घेऊन बाहेर पडतो. तसेच काही वेळा हँग आऊट करण्यासाठी खरेदी करता करता एखादी कॉफी घेतो. पण असे करणे आपल्या फायद्याचे नाही, आता यामागे काय कारण असावे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार, कॉफी प्यायल्यावर आपल्याला जास्त एनर्जी येते आणि आपण इंपल्सिव्ह खरेदी करतो. म्हणजेच नीट विचार न करता आपण भावनाप्रधान होतो आणि खरेदी करतो. त्यामुळे खरेदीला जाताना पोटभर खायला हरकत नाही पण कॉफी अजिबात घेऊ नये असे म्हटले जाते. 

(Image : Google)

जर्नल ऑफ मार्केटींगमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, कॅफीनचा आपल्याला वाटतो त्यापेक्षा शरीरावर जास्त परिणाम होतो. फ्रान्समध्ये एका स्टोअरच्या बाहेर खरेदीला येणाऱ्या लोकांसाठी मोफत कॉफी ठेवण्यात आली होती. ज्यांनी कॉफी प्यायली त्या लोकांनी उत्साहाच्या भरात जास्त खरेदी केली. कॉफीमुळे त्यांना तरतरी आली आणि त्यांनी ठरलेल्यापेक्षा जास्त खरेदी करुन जास्त पैसे खर्च केले. यासाठी सुरुवातीला फ्रान्समध्ये तर नंतर स्पेनमध्ये आणि पुन्हा एकदा फ्रान्समध्ये संशोधन करण्यात आले. या तिन्ही ठिकाणी कॉफी घेतलेल्या लोकांनी कॉफी न घेतलेल्या लोकांपेक्षा जास्त वस्तू घेऊन भरपूर पैसे खर्च केल्याचे दिसले. त्यामुळे तुम्हाला खरेदीला जायचे असेल तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. 

टॅग्स :खरेदी