दिवाळी आली की आपण आपल्यासाठी आणि मुलांसाठी कपड्यांची आवर्जून खरेदी करतो. दिवाळी म्हटल्यावर एकदम साधे कपडे न घेता थोडे डीझायनर किंवा स्टायलिश कपडे घेतले जातात. दिवाळीसोबतच घरात एखादे लग्न असेल तर त्यासाठीही हे कपडे उपयोगी येतील यादृष्टीने आपण हे कपडे खरेदी करतो. पण मुलं मात्र आपण घेतलेले हे महागडे कपडे घालायला नकार देतात. आपण जबरदस्तीने त्यांना हे कपडे घातले तर ते रडारडी करुन घर डोक्यावर घेतात. मग यामध्ये कधी त्यांना बाह्या असलेले कपडे नको असतात तर कधी कॉलरच नको असते. कधी कपड्यांची शिवण त्यांना टोचणारी असते तर कधी कधी कपडे ढगळे होतात म्हणून ते आकांतांडव करत असतात (3 Important Tips for buying Perfect Festive Dress for childrens for Diwali Festival).
अशावेळी आपण सुरुवातीला थोडे पेशन्स ठेवतो आणि मुलांना समजावण्याचा प्रयत्न करतो. पण मुलं खूपच जास्त नखरे करायला लागली आणि इतक्या आवडीने, हौशेने घेतलेले कपडे घालतच नसतील तर आपलाही मूड जातो. तुमच्याही बाबतीत असं होत असेल तर मुलांची कपड्यांची खरेदी करताना काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. पाहूयात मुलांची कपडे खरेदी करताना लक्षात ठेवायला हव्यात अशा ४ गोष्टी कोणत्या...
१. कापड
मुलांना कपडे घेताना ते कापड सुती, सिल्क असे मऊ प्रकारातील असेल असे पाहा. तसे नसेल तर किमान वरच्या जाडसर कपड्याला आतून व्यवस्थित अस्तर असेल याची काळजी घ्या. हे कपडे धुतल्यावर मऊ पडत असल्याने ते अंगाला टोचत नाहीत आणि इरीटेटही होत नाहीत. त्यामुळे मुलं अगदी सहज हे कपडे घालण्यास तयार होतात. जास्त जाड कापड असेल तर त्याची शिवणही आतून टोचण्याची शक्यता असते.
२. साईज
मुलांना कपडे घेताना ते चांगले दिसावेत हे जरी खरे असले तरी आपण खूप महागाचे कपडे घेत असल्याने ते किमान ४ वेळा तरी वापरता यायला हवेत. त्यादृष्टीने त्यांच्या मापापेक्षा एक साईज मोठा घ्या. सुरुवातीला एकदा हा ड्रेस कदाचित त्यांना थोडा मोठा दिसेल पण धुतल्यानंतर किंवा पुढच्या वेळी घातल्यास हा ड्रेस त्यांना बरोबर बसेल. मुलांची उंची सतत वाढत असल्याने त्यांना वाढत्या मापाचे कपडे घेणे केव्हाही जास्त चांगले. खूपही मोठा साईज घेऊ नका नाहीतर दिवाळीत लावलेले दिवे, फटाके यांच्यावर घोळदार कपडे पडून अपघात होण्याची शक्यता असते.
३. डीझायनर कपडे
डिझायनर कपडे दिसायला चांगले दिसत असले तरी मुलांच्या कम्फर्टच्या दृष्टीने हे कपडे अजिबात चांगले नसतात. त्याला असणारे वर्क, टिकल्या, लेस मुलांना टोचण्याची शक्यता असल्याने काही वेळाने मुले इरीटेट होतात. हे वर्क हाताला, मानेला, काखेत टोचले गेले तर मुलांना खाज येते, रॅश येते त्यामुळे मुलं सगळ्यांमध्ये उठून दिसण्यापेक्षा त्यांची सोय जास्त महत्त्वाची असायला हवी हे कपडे घेताना लक्षात ठेवा.