हल्ली मोबाइल, लॅपटॉप आणि इंटरनेट यांमुळे असंख्य गोष्टी सोप्या झाल्या. बिल भरणे असो किंवा ऑनलाइन बँकींग असो आपण आता सगळे अगदी घरबसल्या एका क्लिकवर करतो. त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षात बाजारात जाऊन खरेदी करण्याचे प्रमाण घटले. कोरोनाच्या काळात तर हे प्रकर्षाने जाणवले. घरबसल्या एका क्लिकवर आपल्याला हवी ती वस्तू मिळत असताना बाजारात गर्दीत फिरुन वेळ घालवून खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी झाली. वेळेच्या मर्यादा, घरगुती अडचणी, आरोग्याच्या तक्रारी किंवा अन्य काही कारणांनी ऑनलाइन खरेदी गेल्या काही वर्षात वेगाने वाढली आहे (3 Tips to Remember While Online Shopping of Cloths).
ऑनलाइन खरेदीची सुविधा असलेल्या कंपन्याही ग्राहकांना हवी असलेली सेवा अतिशय कमीत कमी किमतीत, त्रासात उपलब्ध करुन देत असल्यान ही खरेदी सोपी झाली आहे. दिवाळी अगदी १० दिवसांवर आलेली असताना आपल्याला बाजारात जायला वेळ नसेल तर आपण ऑनलाइनच खरेदी करणे पसंत करतो. पण प्रत्यक्ष खरेदी आणि ऑनलाइन खरेदी यामध्ये फरक असतोच, त्यामुळे ऑनलाइन खरेदी करताना काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे.
१. कापडाबाबत खात्री करा
दुकानात जाऊन आपण खरेदी करतो तेव्हा आपण कापडाला हात लावून कापड कसे आहे ते पाहू शकतो. पण ऑनलाइन पाहताना आपल्याला कापडाचा पोत लक्षात येत नाही. अशावेळी कोणत्याही कपड्याच्या खाली त्याच्या कापडाचा पोत काय आहे याबद्दल सविस्तर माहिती दिलेली असते. ती नीट वाचून मगच कपडे खरेदी करायला हवेत. अन्यथा आपल्याला ते कापड दिसताना वेगळे दिसले आणि प्रत्यक्ष ऑर्डर आल्यानंतर वेगळेच कापड आहे असे होणार नाही.
२. साईज चार्ट पाहणे महत्त्वाचे
दुकानात किंवा मॉलमध्ये आपण कपडे घ्यायला जातो तेव्हा आपण ते कपडे ट्राय करुन पाहतो. मात्र ऑनलाइन खरेदी करताना असे करणे शक्य नसते. बहुतांश वेबसाइटवर आपल्या मापानुसार साइज चार्ट दिलेले असतात. त्यात आपली उंची, कंबरेचे, छातीचे माप यांचा अंदाज घेऊन योग्य त्या मापाची खरेदी करायला हवी. अनेकदा कपडे तयार करणाऱ्या प्रत्येक कंपनीचे साइज कमी अधिक फरकाने वेगवेगळे असतात. त्यामुळे नेमका त्या कंपनीचा साइज चार्ट पाहून मगच खरेदी करायला हवी. त्यामुळे आलेला कपडा लहान झाला किंवा मोठा झाला म्हणून बदलत बसावा लागत नाही.
३. रिटर्न पॉलिसी
दुकानातून खरेदी केलेली वस्तू आपल्याला आवडली नाही किंवा बसली नाही तर पावती दाखवून आपण ती बदलून आणू शकतो. हिच सोय ऑनलाइनही असते, मात्र प्रत्येक वस्तूची रिटर्न पॉलिसी वेगवेगळी असते. तुम्ही जी वस्तू खरेदी करत आहात तिची रिटर्न पॉलिसी कशी आहे, ती वस्तू बदलून मिळण्याची सोय आहे का, हे आधी तपासून पाहायला हवे. त्यामुळे मग घरी आलेली वस्तू पुन्हा पाठविण्याची सोय असेल तर वस्तू रिटर्न करता येते. ऑनलाइन खरेदी करताना ज्या वस्तूला रिटर्न पॉलिसी नाही, त्या वस्तू शक्यतो घेणे टाळावे.