Join us  

ड्रेस मटेरिअल घेऊन ड्रेस शिवून घेण्याचे ४ भन्नाट फायदे! रेडिमेडच्या जमान्यात मिळवा ‘पर्सनलाइज्ड’ लूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2022 5:37 PM

रेडिमेड कपडे आपण चटकन घेतो, पटकन घालतो. पण ड्रेस शिवून घेतला तर तो खास आपल्यासाठी बनलेला, स्पेशल ड्रेस ठरतो, पाहा त्याचे फायदे..

ठळक मुद्देड्रेस शिवून घेण्यात एक वेगळीच मज्जा असते. ड्रेस मटेरिअल घेऊन त्याचं ड्रेस शिवण्याचे खूप सारे फायदे आहेत. 

ऐश्वर्या पेवाल

आपण सगळेच हल्ली रेडिमेड ड्रेस घेणंच सोयीचं समजतो. आता तर ऑनलाइनही घेतो. पटकन विकत घेतला, आपल्याला हव्या त्यादिवशी घातला, इतकं सोपं वाटतं. मात्र  तुम्हाला माहित आहे का की रेडिमेड ड्रेसपेक्षा ड्रेस मटेरिअल घेऊन ते शिवून वापरणं जास्त फायद्याचं ठरतं. जमाना रेडिमेड कपड्यांचा असला तरी आपल्या मनासारखे कपडे शिवून घेणं हे काही आऊट ऑफ फॅशन जाणार नाही. हे मान्य की आता रेडिमेड ड्रेसच काय, आता तर रेडिमेड ब्लाऊज, घागरे, इतकंच नाही तर साडीसुद्धा मार्केट मध्ये मिळते. सहावारी साडी असो किंवा नववारी, ती सुद्धा रेडिमेड उपलब्ध आहेत. मात्र कितीही रेडिमेड कपडे विकत घेतले तरीही कापड घेऊन त्याचा हवा तसा ड्रेस शिवून घेण्यात एक वेगळीच मज्जा असते. ड्रेस मटेरिअल घेऊन त्याचं ड्रेस शिवण्याचे खूप सारे फायदे आहेत. 

ड्रेस शिवून घेण्याचे फायदे

१. आवडीनुसार स्टायलिंग करता येते

 ड्रेसचा गळा कसा असावा, ड्रेसचे हात थ्री-फोर्थ ठेवायचे की ड्रेस स्लिव्हजलेस लेस शिवायचा हे तुम्ही ठरवू शकता. ड्रेस पंजाबी स्टाईलने शिवायचा की चुडीदार हेही तुम्ही ड्रेस मटेरिअलनुसार ठरवू शकता. आपण रेडीमेड ड्रेस घेतो तेव्हा बऱ्याचदा त्याची ओढणी आवडत नाही तर कधी सलवार. आणि मग आपण काय करतो तर एक्सट्रा पैसे खर्च करून आपण त्या रेडीमेड ड्रेस वर वेगळं काहीतरी लूक क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो. हे फार खर्चिक असून वेळसुद्धा यामध्ये खूप लागतो. यापेक्षा तुम्हाला हवे तसे ड्रेस मटेरिअल घेऊन तुम्ही तुमच्या आवडीचं स्टायलिंग करू शकता.

२. फिटिंगची काळजी नसते 

रेडिमेड ड्रेस घेताना फिटिंगची खूप काळजी असते. आपल्याला एखादा ड्रेस आवडतो पण त्यामध्ये आपली साइज उपलब्ध नसते. आणि यामुळे किती तरी वेळा मूड ऑफ होतो. एक ड्रेस मनापासून आवडला आणि त्यात साइज मिळाली नाही तर ज्याठिकाणी तो ड्रेस घालून जायचं असतं तिथे जायची इच्छाच होत नाही. त्यात अल्टर करुन घेण्याचा एक वेगळाच प्रश्न. आता नवीन कोऱ्या ड्रेस वर टेलर व्यवस्थित अल्टर करेल ना? अल्टर केल्यावर ड्रेसचं पॅटर्न तर खराब नाही ना होणार? असे कितीतरी प्रश्नं आपल्यला त्रास देत असतात. पण जर तुम्ही ड्रेस मटेरिअल घेऊन तो तुमच्या आवडीनुसार शिवून घेतला तर अशी वेळच तुमच्यावर येणारच नाही. आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला खूप कम्फर्टेबल वाटेल. ना फिटिंगची चिंता ना ड्रेस अल्टर करायची काही गरज. अगदी सोयीस्कर.

 

३. ड्रेसची ओढणी, सलवार इतर कपड्यांसोबत मिसमॅच करता येतात

ड्रेस मटेरिअल घेऊन ते शिवून घेतलं तर त्या ड्रेसची सलवार आणि ओढणी, दुपट्टा तुम्ही इतर कपड्यांसोबत मिसमॅच करून वापरू शकता. म्हणजे एकाच कपड्याचा वापर करून तुम्ही वेगवेगळे लूक क्रिएट करू शकता. जर तुम्ही पटियाला स्टाईल मध्ये सलवार शिवून घेत असाल तर मग एखादा छान खणाचा कुर्ता किंवा कॉटनचा नी-लेंथ कुर्ता घालून मस्त ट्रेंडी लूक मिळवू शकता. आपल्या सगळ्यांकडे प्लेन - साधा ड्रेस, कुर्ता, लॉंग गाऊन असतात. त्यासोबत तुम्ही ओढणी घेऊन चांगलं मिसमॅच करून जरा हटके लूक नक्कीच क्रिएट करू शकता. तर चुडीदार/सलवार वर तुम्ही लॉन्ग कुर्ता घालू शकता. रेग्युलर वापराकरता हे उत्तम ऑप्शन ठरू शकतात.

४. जास्त टिकतो..

रेडिमेड ड्रेस घेतला की तो किती काळ टिकेल याची गॅरंटी दुकानदारसुद्धा देत नाही. पण ड्रेस मटेरिअल नीट शिवून घेतला कि तो जास्त काळ टिकतो. जास्त वेळा तो ड्रेस धुतला तरी तो फाटेल अशी चिंता राहत नाही. तुमचं वजन कमी - जास्त होत राहिलं तरी तुम्ही तो ड्रेस अल्टर करून किंवा शिलाई उसवून वापरू शकता. तुम्ही पण मस्त ड्रेस मटेरिअल खरेदी करा आणि छान शिवून घेऊन ट्रेंडी ‘पर्सनलाइज्ड’ लूक मिळवा.

 

टॅग्स :गोळीबारफॅशनस्टायलिंग टिप्स