पावसाळा म्हणजे खरेदीची आवड असणाऱ्यांसाठी उत्तम काळ. या काळात विविध दुकाने, मॉल आणि अगदी ऑनलाइनही भरघोस सेल असल्याने विशेषत: महिला वर्ग या काळात मनसोक्त शॉपिंग करतात. शॉपिंग आणि महिला हे अनोखे प्रकरण असून कधीही, कुठेही कोणत्याही वेळेला त्या शॉपिंगसाठी तयार असतात. मग त्या घरातल्या वस्तू असतो, मेकअपचे सामान असो किंवा कपडे असो. शॉपिंग म्हटले की आतून खूश होणाऱ्या महिला आपण आजुबाजूला नेहमीच पाहतो. त्यातही मान्सून सेल म्हटल्यावर विचारायलाच नको. विविध शॉपिंग साइटसवर कपड्यांवर भरघोस डिस्काऊंट असल्याने ऑनलाइन खरेदीची ही संधी महिला अजिबात सोडत नाहीत. गेल्या काही वर्षात ऑनलाइन शॉपिंग करण्याचे प्रमाण वेगाने वाढले आहे (How To Take Care While Online Shopping). वेळ, पैसे वाचवण्याच्या दृष्टीने अशा ऑनलाइन सेलमध्ये खरेदी नक्कीच करा पण ती करताना आपली फसवणूक होणार नाही ना याकडे लक्ष असू द्या. पाहूयात ऑलनाइन कपडे खरेदी करताना लक्षात ठेवण्याच्या काही महत्त्वाच्या गोष्टी (4 Tips to Remember While Online Shopping of Cloths)...
१. वेबसाइट तपासून घ्या
फ्लिपकार्ट (Flipkart), अॅमेझॉन (Amazon), मिंत्रा (Myntra) यांसरख्या नामांकित कंपनीच्या वेबसाइट असतील तर ठिक आहे. अन्यथा कोणत्याही माहित नसलेल्या किंवा लोकल वेबसाइटवरुन कपडे खरेदी करणे टाळा. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्याला कपडे मिळाले आणि ते आपल्याला बसत नसतील, आवडले नाहीत किंवा काहीही अडचण असेल तर ते बदलून देण्याची प्रत्येक कंपनीची काही एक पॉलिसी असते. पण लोकल किंवा माहित नसलेली वेबसाइट असेल तर हे एकदा घेतलेले कपडे आपल्याला बदलून मिळतीलच असे नाही. त्यामुळे ते कपडे योग्य नसतील तर ते वापरता तर येत नाहीतच पण पैसेही वाया जाण्याची शक्यता असते. त्यामुळे कपडे खरेदी करताना ते माहिती असलेल्या आणि चांगल्या नामांकित वेबसाइटवरुनच खरेदी करायला हवेत.
२. कापड तपासून घ्यावे
दुकानात जाऊन आपण खरेदी करतो तेव्हा आपण कापडाला हात लावून कापड कसे आहे ते पाहू शकतो. पण ऑनलाइन पाहताना आपल्याला कापडाचा पोत लक्षात येत नाही. अशावेळी कोणत्याही कपड्याच्या खाली त्याच्या कापडाचा पोत काय आहे याबद्दल सविस्तर माहिती दिलेली असते. ती नीट वाचून मगच कपडे खरेदी करायला हवेत. अन्यथा आपल्याला ते कापड दिसताना वेगळे दिसले आणि प्रत्यक्ष ऑर्डर आल्यानंतर वेगळेच कापड होते असे होणार नाही.
३. रिटर्न पॉलिसी नीट वाचा
काही वेळा तांत्रिक कारणांमुळे आपण ऑर्डर केलेले कपडे आपल्यापर्यंत पोहोचण्यास वेळ लागू शकतो. कपडे आपल्याला मिळाले की ते लगेच उघडून ट्राय करायला हवेत. त्याचा साइज, रंग, पोत किंवा काही डिफेक्ट असल्यास कपडे बदलावे लागण्याची शक्यता असते. आपल्याला पार्सल उशीरा मिळाले किंवा मिळूनही आपण उशीरा उघडून पाहिले आणि तर रिटर्न पॉलिसी कमी दिवसांची असेल तर हे कपडे बदलता येत नाहीत. त्यामुळे शक्यतो रिटर्न पॉलिसी किमान ७ ते १० दिवसांची असेल अशाच हिशोबाने कपडे ऑर्डर करावेत.
४. साईज चार्ट पाहणे महत्त्वाचे
दुकानात किंवा मॉलमध्ये आपण कपडे घ्यायला जातो तेव्हा आपण ते कपडे ट्राय करुन पाहतो. मात्र ऑनलाइन खरेदी करताना असे करणे शक्य नसते. अशावेळी अनेकदा वेबसाइटवर आपल्या मापानुसार काही साइज चार्ट दिलेले असतात. त्यात आपली उंची, कंबरेचे, छातीचे माप यांचा अंदाज घेऊन योग्य त्या मापाची खरेदी करायला हवी. अनेकदा कपडे तयार करणाऱ्या प्रत्येक कंपनीचे साइज कमी अधिक फरकाने वेगवेगळे असतात. त्यामुळे नेमका त्या कंपनीचा साइज चार्ट पाहून मगच खरेदी करायला हवी. त्यामुळे आलेला कपडा लहान झाला किंवा मोठा झाला म्हणून बदलत बसावा लागत नाही.