आजच्या डिजिटल युगात घरातील किराणा सामना पासून ते गोळ्या-औषधे सर्व ऑनलाईन पद्धतीने खरेदी करु शकतो. स्मार्टफोन, इंटरनेटमुळे खरेदी करणे सोपे झाले आहे. घरबसल्या एका क्लिकवर आपण हजारो रुपयांची खरेदी करतो.ऑनलाईन शॉपिंगमध्ये मोठ्या ऑफर, कमी किमती असल्याने अनेकजण ऑनलाईन खरेदीला प्राधान्य देतात. सध्याची परिस्थिती पाहिली तर ऑनलाईन शॉपिंगमुळे बऱ्याच लोकांसाठी खरेदी खूप सोपी झाली आहे. त्यातल्या त्यात तर कपडे आणि मेकअपच्या साधनांसाठी ऑनलाईन शॉपिंगसाठीचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत.
मेकअपची अनेक साधने किंवा वस्तू बऱ्याच महिला ऑनलाईन पद्धतीनेच खरेदी करतात. परंतु मेकअप ही गोष्ट आपल्या चेहेऱ्याशी संबंधित असल्याकारणाने हे ब्युटी प्रॉडक्ट्स ऑनलाईन खरेदी करताना काही गोष्टींची खबरदारी घ्यावीच लागते. ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये सर्वात महत्वाची असते ती लिपस्टिक. आपल्यापैकी बऱ्याचजणी ऑनलाईन लिपस्टिक खरेदी करतात. परंतु ऑनलाईन खरेदी जलद आणि सोयीस्कर असली तरी यामध्ये फसवणूक होण्याचा धोका असतो. त्यामुळे खरेदी करताना पुरेपूर काळजी घेत काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत(Things To Consider While Purchasing Online Lipstick).
ऑनलाईन लिप्स्टिकची खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा...
१. साईज आणि वजनाकडे लक्ष ठेवा - ऑनलाईन शॉपिंग करताना विशिष्टय प्रॉडक्ट्सची साईज आणि वजन नमूद केलेले असते. यावरून आपण ते प्रॉडक्ट् किती लहान, मोठे किंवा वजनाला किती आहे याचा अंदाज लावू शकतो. उदाहरणार्थ :- काही वेळा लिपस्टिक सारख्या ब्युटी प्रॉडक्ट्ची खरेदी करताना ऑनलाईन वेबसाईटवर ४ से. मी अशी नमूद केली जाते आणि घरी प्रॉडक्ट् आल्यावर ती फक्त २ से. मी इतकीच असते. त्यामुळे ऑनलाईन लिप्स्टिकची खरेदी करताना त्याची साईज व वजनाकडे बारकाईने लक्ष द्यावे.
२. एक्स्पायरी डेट चेक करा - ऑनलाईन लिपस्टिक खरेदी करताना त्याचे प्रॉडक्ट डिटेल्स अवश्य वाचून मगच प्रॉडक्ट ऑर्डर करा. प्रॉडक्ट डिटेल्स मध्ये त्या लिप्स्टिकची एक्स्पायरी डेट दिली असेल ती आधी वाचून मगच लिप्स्टिक ऑर्डर करावी.
३. प्रॉडक्ट कोड लक्षात ठेवा - प्रत्येक लिपस्टिक शेडचा एक वेगळा कोड नंबर असतो. आपण ऑनलाईन शॉपिंग करताना आपल्या आवडीच्या लिपस्टिक शेडचा प्रॉडक्ट कोड लक्षात ठेवावा. आपण मागवलेला लिपस्टिक शेड घरी आल्यावर प्रॉडक्ट कोड तोच आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. आपल्या आवडत्या लिपस्टिकचा शेड ऑर्डर केल्यानंतर त्याचा प्रॉडक्ट कोड एका ठिकाणी व्यवस्थित लिहून ठेवावा.
४. योग्य वेबसाईटची निवड - ऑनलाईन शॉपिंग करण्यासाठी इंटरनेटवर लाखों - करोडो वेबसाइट्स उपलब्ध आहेत. परंतु मेकअपचे प्रॉडक्ट ऑर्डर करताना वेबसाईट खात्रीलायक आहे की नाही ते आधी तपासा. कारण मेकअप प्रॉडक्टसचा थेट आपल्या चेहऱ्याशी संबंध येणार असल्याकारणाने चांगल्या नावाजलेल्या किंवा परिचित, विश्वसनीय वेबसाईटवरूनच ऑनलाईन शॉपिंग करा.
५. रिव्ह्यू वाचा - तुमची आवडती लिपस्टिक शेड ऑर्डर करण्याआधी त्याबद्दलचा इतर लोकांनी नमूद केलेला रिव्ह्यू वाचायला विसरू नका. रिव्ह्यू वाचल्याने प्रॉडक्टची क्वालिटी, दर्जा, व इतर गोष्टींबद्दल माहिती कळते. आपण ऑर्डर केलेले प्रॉडक्ट आधी इतर लोकांनी वापरून पाहिल्याने त्याबद्दलचे त्यांचे मत आपल्याला समजते.
६. लिपस्टिक कलर - आपण जो लिपस्टिक शेड ऑर्डर केला आहे नेमका तोच लिपस्टिक शेड डिलिव्हरीमध्ये आला आहे की नाही याची काळजी घ्यावी.
७. ब्रँड - आपण ज्या ब्रँडची लिपस्टिक ऑर्डर केली आहे, डिलिव्हरीमध्ये देखील तोच लिपस्टिकचा ब्रँड मिळाला आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. अन्यथा आपण डिलिव्हरी नाकारू शकता. तसेच तुमची ऑनलाईन लेखी तक्रार त्या वेबसाईटवर नोंदवू शकता.