जुन्या फॅशन काही वर्षांनी पुन्हा येतात आणि तरुणींमध्ये त्या भरपूर भाव खातात. तिच ती फॅशन करुन कंटाळा येणाऱ्यांसाठी सतत नवीन काय आणायचे असा प्रश्न तयार होतो आणि मग या जुन्या फॅशन थोड्या नवीन किंवा हटके स्वरुपात आपल्यासमोर येतात. खणाचे ब्लाऊज, खणाच्या साड्या, क्रॉप टॉप, फुग्याच्या बाह्यांचे कपडे, यांसारख्या कित्येक वर्ष जुन्या फॅशन परत एकदा इन होतात आणि मग पाहावे तो त्याच प्रकारच्या कपड्यांमध्ये दिसायला लागतो. फ्लेअर जीन्स म्हणजेच मोठ्या बॉटम असलेल्या जीन्स आता पुन्हा एकदा फॅशनमध्ये आल्या आहेत. हल्ली बऱ्याच बॉलिवूड अभिनेत्रीही अशाप्रकारच्या जीन्स वापरत असल्याचे गेल्या काही दिवसांत दिसून आले आहे. मागील काही काळ नॅरो बॉटम जीन्स किंवा अँकल लेन्थ जीन्सची फॅशन होती. गेल्या काही दिवसांपासून मात्र फ्लेअर जीन्स बाजारात भाव खाताना दिसत आहे. गुडघ्यापर्यंत आपल्या मापात असलेली फीट बसणारी जीन्स खालच्या बाजूला एकदम मोठी असते. पायापाशी तर तिचा बॉटम बराच मोठा असल्याने तिला फ्लेअर जीन्स असे म्हटले जाते.
७० च्या दशकात या फॅशनला बेल बॉटम म्हटले जायचे. त्याच जीन्सच्या पॅटर्नला आता फ्लेअर असे काहीसे हटके नाव देण्यात आले आहे. ही जीन्स मोठी असल्याने यावर तुम्ही एखादा लहान टॉप किंवा क्रॉप टॉप, स्लिव्हलेस टॉप घातला तरी मस्त दिसतो. उंची असणाऱ्या लोकांना या प्रकारची जीन्स जास्त खुलून दिसते. यामध्ये तुम्ही आहात त्यापेक्षाही जास्त उंच दिसता. जीन्समध्ये लो वेस्ट, हाय वेस्ट आणि मिडल वेस्ट असे प्रकार पाहायला मिळतात. पण फ्लेअर जीन्स ही साधारणपणे हाय वेस्टमध्ये असल्याचे पाहायला मिळते. या जीनवर कमी उंचीचा टॉप घातला की त्याचे बटण किंवा आपण त्यावर लावलेला बेल्ट दिसेल अशी त्याची फॅशन असते. या फ्लेअर जीन्समध्ये जीन्सच्या मोठ्या असलेल्या बॉटमला एखादी फुलांची एम्ब्रॉडरी केलेली डीझाईन जीन्सचा लूक आणखी खुलवते.
तर मंकी वॉश, रिप्ड जीन्स, फेडेड जीन्स किंवा आणखी जीन्सच्या वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये ही जीन्स पाहायला मिळते. फ्लोरल प्रिंट असलेल्या फ्लेअर जीन्सलाही सध्या मोठी मागणी आहे. साधारणपणे कोणत्याही कपड्याला किंवा जीन्सला खालून टिप असते. पण हल्ली बॉटमचे कापड ओपन धाग्यांचे असण्याची फॅशन आहे. हे लोंबणारे धागे चांगले दिसतात अनेकांचे म्हणणे असते. फ्लेअर जीन्समध्येही अशाप्रकारची फॅशन पाहायला मिळते. जीन्सप्रमाणेच फॉर्मल पँटमध्येही हा फ्लेअर प्रकार पाहायला मिळतो. बॉटम मोठा असल्याने यावर वेगवेगळ्या प्रकारचे हाय हिल्स घालता येतात. हाय हिल्सचे बूट, सँडल घातल्याने आपली पर्सनॅलिटी आणखी उठावदार दिसण्यास मदत होते. त्यामुळे तुम्हालाही काहीतरी नवीन आणि हटके फॅशन ट्राय करायची असेल तर ही फ्लेअर जीन्स तुम्ही नक्की ट्राय करु शकता.