केतकी घनवटकर
ट्रिपचे प्लॅनिंग होते, जागा ठरते, आपण कोणत्या हॉटेलमध्ये राहणार, कोणती ठिकाणे पाहणार याविषयी चर्चा होते. त्यामुळे किती दिवसांची ट्रिप आहे आणि आपण काय काय करणार आहोत याची आपल्याला पुरेशी कल्पना आलेली असते. अशातच ट्रिपचा आदला दिवस उजाडतो, तरीही बॅगेत नेमके काय आणि कसे भरायचे हे काही आपल्याला समजत नाही. आपल्याला ट्रिपला कुठे जायचे आहे, त्याठिकाणी हवामान कसे आहे, सोबत कोण असणार आहे याबाबत पुरेशी माहिती असूनही ऐनवेळी बॅग कशी भरायची यावरुन धांदल उडालेले लोक आपल्या आजुबाजूला असतात. बऱ्याचदा आपणही त्यातलेच एक असतो. प्रवासात लागणारे कपडे, आवश्यक दैनंदिन वापराच्या वस्तू, महत्त्वाची कागदपत्रे, खाण्याचे पदार्थ, औषधे, सौंदर्यप्रसाधने, हेडफोन्स व इतर इलेक्र्टॉनिक उपकरणे या साधारणपणे प्रवासात लागणाऱ्या गोष्टी. साधारणपणे ठरलेल्या ठिकाणी जाण्यासाठी एक बॅग आणि आपल्याला हाताशी लागेल अशा सामानाची एक बॅग तसेच आपल्या गळ्यातील एखादी लहानशी पर्स असे बॅगसचे वर्गीकरण आपण करतो. आपल्याला हाताशी लागणाऱ्या सामानाची फारशी शोधाशोध करावी लागणार नाही यासाठी काय करायला हवं. कपडे कशापद्धतीने पॅक करायला हवेत, ओझे होणार नाही या हिशोबाने सोबत काय आणि किती वस्तू घ्यायला हव्यात याविषयी काही सोप्या टिप्स...
1. वेगळ्या आणि हटके रंगाच्या बॅगस वापरा
तुमची सूटकेस, हातातील बॅग किंवा अगदी गळ्यातील पर्स यांचा रंग थोडा वेगळआ आणि हटके असूद्या. जेणेकरुन सोबत जास्त लोक असताना विमानतळावर, रेल्वेस्टेशनवर किंवा बऱ्याच बॅगांमध्ये आपली बॅग उठून आणि वेगळी दिसू शकेल. तुमच्याकडे आधीच सूटकेस असेल आणि ती ओळखता येत नसेल, तर त्यावर रंगीबेरंगी रिबन बांधा. याशिवाय हल्ली बाजारात बरेच आकर्षक बॅग टॅग्स विकत मिळतात, तसे टॅग्स आपल्या बॅगेसाठी वापरा. यामुळे बॅग शोधण्यात तुमचा वेळ तर वाया जाणार नाहीच पण तुमची एनर्जीही वाचेल.
2. मौल्यवान वस्तूंचे पॅकिंग
शक्यतो मौल्यवान वस्तू ट्रिपमध्ये कॅरी करणे टाळा. पण कॅमेरा, एखादा दागिना, कॅश असे काही सोबत ठेवायचे असेल तर ते अतिशय काळजीने लक्षात राहील अशा ठिकाणी तुमच्या मोठ्या बॅगमध्ये ठेवा. ज्या बॅगला तुम्ही लॉक केलेले असेल. शक्यतो पैसे दोन ते तीन ठिकाणी विभागून ठेवा. म्हणजे ऐनवेळी काही अडचण आलीच तर तुमच्या दुसऱ्या बॅगेतून तुम्हाला पैसे सहज मिळू शकतील. कॅमेरा, त्याच्या लेन्स, टॅबलेट किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक साधने कपड्यांमध्ये गुंडाळून ठेवा. जेणेकरुन बॅग चुकून आपटली गेली तरीही त्याला काही होणार नाही.
3. पॅक लाइट
तुम्ही ८ ते १० दिवसांच्या ट्रिपसाठी जात असाल तर तुम्हाला खरोखर काय आवश्यकआहे याचा पॅकींग करताना नीट विचार करा. त्याप्रमाणे आवश्यक तितक्याच वस्तू सोबत घ्या. फाफटपसारा घेणे टाळा. त्यामुळे तुमची जागा वाचेल आणि तुम्हाला जास्तीचे वजनही उचलावे लागणार नाही. तुमच्या सहलीच्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतील अशा कोणत्याही वस्तू सोबत घेणे टाळा. शक्य तितके हलके कपडे, हलक्या वस्तू घ्या. म्हणजे तुम्हाला ट्रिप जास्तीत जास्त एन्जॉय करता येईल.
4. लहान पॅकेट्स घ्या.
आपल्याला ट्रिपमध्ये चांगले दिसायचे असते त्यामुळे दैनंदिन वापराच्या वस्तूंबरोबरच आपण बरीच सौंदर्यप्रसाधनेही घेतो. मात्र यामध्ये आपल्याकडे लहान पॅक उपलब्ध नसल्यास आपण घरातील वापरत्या वस्तू घेतो. पण या मोठ्या पॅकमुळे बॅगमधील जागा तर अडतेच पण वजनही जास्त होते. त्यामुळे मॉइश्चरायझर, शाम्पू, कंडीशनर, हेअर जेल, टूथपेस्ट, पावडर, परफ्यूम यांसारख्या शक्य त्या गोष्टी लहान आकारातील घ्या. लहान पॅकेट्स नियमित आकाराच्या बाटल्यांपेक्षा खूपच कमी जागा व्यापतात.
5. सॅनिटायझर आणि ब्लँकेट
सध्या कोरोनाच्या परिस्थितीत तुमच्याकडे सॅनिटायझर, ब्लँकेट असणे आवश्यक आहे. विमानात किंवा रेल्वेमध्ये तुमच्या समोरील ट्रे टेबल्स नियमितपणे साफ होत असेलच असे नाही म्हणून सॅनिटायझर नेहेमी बरोबर ठेवा. तुम्ही सहज कॅरी करु शकता असे पातळ ब्लॅंकेट आणि उशी अवश्य जवळ ठेवा. प्रवासात, तुम्ही ज्या हॉटेलमध्ये राहणार आहे त्याठिकाणी आणि अडीअडचणीलाही हे दोन्हीही तुम्हाला उपयोगी येते. तुमच्याकडे पातळ ट्रॅव्हल ब्लँकेट आणि फोल्डींगची उशी नसेल तर ती अवश्य खरेदी करा, त्याचा कायम उपयोग होतो.
6. पद्धतशीरपणे पॅक करा
सगळं सामान सुटकेस, लहान बॅग यामध्ये योग्य पद्धतीने भरा. दोन्ही बॅग भरताना प्रत्येक गोष्ट बॅगेभोवती नीट दिसेल अशी मांडून ठेवा. मोबाइलमध्ये To Do List बनवा. त्याप्रमाणे सगळे सामान पॅक केले आहे की नाही याची खात्री करून घ्या. अशाप्रकारे पॅक केल्याने तुमच्या बॅगेत नेमके किती सामान बसेल याचा तुम्हाला अंदाज येईल आणि ती बॅग व्यवस्थित पॅक करता येईल.
7. नैसर्गिक रंगाचे कपडे बरोबर घ्या
कोणत्याही ठिकाणी ट्रिपला जाताना नैसर्गिक रंगाचे कपडे बरोबर घ्या. म्हणजे मिक्स अँड मॅच करून हे कपडे घालता येतील, त्याच बरोबर व्यक्तिमत्व उठावदार दिसेल आणि कमी कपडे लागतील असे बघा. सहलीच्या प्रत्येक दिवसासाठी काय घालणार याचे साधारण प्लॅनिंग डोक्यात पक्के असूद्या. तुम्हाला हवामानासाठी किंवा इतर कोणत्याही कारणास्तव तुमचा पोशाख अॅडजस्ट करायचा असेल तर गोष्टी बदलणे सोपे होते बदलणे सोपे होते.