ऐश्वर्या पेवाल
खरं तर उन्हाळा म्हंटल तर आपल्यला सगळ्यांना सारखं काहीतरी गार प्यायची गरज भासते. किंवा तर साधं- सरळ म्हणायचं झालं तर फ्रिज मधलं गारेगार पाणी प्यायल्याशिवाय जमतंच नाही. पण तरी माठातल्या गारेगार पाण्याची मजा नाही. नुसता माठच कशाला सध्या सर्वच मातीच्या भांड्यांचा आरोग्यदायी वापर सुरु झाला आहे. ऑनलाइनही मातीची भांडी मिळतात. मात्र मुंबईत सायन-कुंभारवाड्यात गेलो तर मातीच्या भांड्यांचे असंख्य प्रकार पहायला मिळतात. अगदी ३ रुपयांपासून वस्तू तिथं मिळतात.
तुम्ही सोशल मीडियावर किती तरी व्हिडिओ पाहिले असतील ना, वेगवेगळ्या रेसिपीचे, मटका मिसळ किंवा कुल्हड़ वाली चाय, इतकंच काय तर मटका बिर्याणी. असे अनेक प्रकार तुम्ही नक्कीच बघितले असतील आणि तुम्हाला ते ट्राय सुद्धा करायची इच्छा असेलच ना? पण तुम्हाला वाटत असेल की ही मातीची भांडी खूप महाग मिळत असतील, ते टिकत नसतील, ते वापरणं अवघड आहे, वगैरे वगैरे. हा खरं तर तुमचा गैरसमज आहे. तुम्हाला हे जाणून नक्कीच आश्चर्य वाटेल की मातीची भांडी ही जास्त स्वस्त आणि टिकाऊ असतात, शिवाय इतर धातूंच्या भांड्यांपेक्षा यात शिजवलेलं अन्न हे जास्त पौष्टिक असतं. आता पुन्हा मार्केट मध्ये मातीच्या भांड्यांची डिमांड वाढली.
(Image : google)
ही मातीची भांडी जर विकत घ्याची असतील तर साधारण तुम्हाला ३ रुपयांपासून ते ४०० रुपये मोजावे लागतात. चक्क ३ रुपयाला चहाचा कप आणि ३०० रुपयाला मोठी कढई मिळते. तुम्ही जर एखाद्या मोठ्या शो रूम मधून किंवा हायवे जवळून किंवा तर ऑनलाईन ही भांडी विकत घेतली तर नक्कीच महाग मिळतील. पण तुमच्या जवळच्या कुंभारवाड्यात जाऊन घेतली तर स्वस्त दरात तुम्हाला हवी तशी आणि नीट तपासून ती घेता येतील. मातीच्या भांड्यांमध्ये काही भेसळ तर नाही ना, किंवा त्यात पीओपी- प्लास्टर ऑफ पेरिस तर मिसळलेलं नाही ना हे तुम्ही नीट तपासून पाहू शकता. मातीच्या भांड्यामध्ये फक्त माठ नाही तर पाण्याची बाटली, कढई, तवा, दिवे, ग्लास, कप, असे खूप प्रकार पाहायला मिळतात. तुम्हाला सुद्धा जर तुमच्या किचनमध्ये जास्त टिकाऊ आणि स्वस्त भांडी हवी असतील तर मातीची भांडी तुम्ही नक्कीच घेऊ शकता.
(Image : google)
मातीची भांडी वापरण्याचे फायदे
१. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराला साधारण 18 पोषक तत्वांची गरज असते. मातीच्या भांड्यातून ही सर्व पोषक तत्व मिळतात. त्यापैकी कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, सिलिकॉन, कोबाल्ट आणि अशी अनेक पोषक तत्व मिळतात.
२. मातीच्या भांड्यातील पदार्थ हे जास्त चविष्ट बनतात.
३. नवीन भांडी आणल्यानंतर आधी पाण्यात किमान २ दिवस भिजत ठेवायचे. आणि सुरुवातीचे काही दिवस केवळ पदार्थ उकळवण्यासाठी त्याचा वापर करावा. म्हणजे त्या भांड्याला क्रॅक जात नाही आणि जास्त काळ ते भांडं टिकून राहणायची क्षमता वाढते.
४. आठवड्याभरानंतर तुम्ही त्यात हवं ते बनवू शकता.
५. इतर भांडी साफ करताना आपण साबण, पावडर किंवा डिश वॉशिंग लिक्विडचा वापर करतो. पण मातीची भांडी स्वच्छ करणं अतिशय सोपं आहे. त्यासाठी तुम्हाला या सगळ्याचा वापर करावा लागत नाही. तुम्ही फक्त गरम पाण्याने ही भांडी साफ करू शकता. कोणत्याही केमिकलयुक्त साबणाची त्यासाठी गरज भासत नाही. अगदीच ही मातीची भांडी जर तेलकट झाली असतील तर तुम्ही गरम पाण्यामध्ये लिंबू पिळून घ्या आणि जरा वेळ तसेच ठेवून द्या. मग नीट पाण्याने धुवून घ्या. असं केल्यानंतर ही भांडी पुन्हा पहिल्यासारखी होतील. शिवाय फक्त हाताने सुद्धा हे स्वच्छ करू शकता.
६. जास्त टिकाऊ असतात. लवकर खराब होत नाही. कमी खर्चात तुम्ही सुंदर मातीची भांडी घेऊन छान जेवण शिजवून आरोग्य ही सांभाळू शकता.
अजून सविस्तर माहिती हवी असेल तर आमचा व्हिडिओ नक्की पहा..