Join us  

सावधान, तुम्ही ऑनलाइन ट्रॅपमध्ये अडकताय? ओटीपी कुणाला देताय, कुठला QR कोड स्कॅन करताय, पहा तरी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2021 11:00 AM

ऑनलाइन सतत स्क्रोल करुन शॉपिंग करत सुटता, त्यात काही ट्रॅपमध्ये पाय अडकला तर? या दिवाळीत धनाची आणि लक्ष्मीची पूजा करताना ऑनलाइन आर्थिक साक्षरही होऊ..

ठळक मुद्देबँक डेबिट-क्रेडीट कार्डची माहिती कुणालाही द्यायची नाही. वाटतं हे बेसिकच, की माहिती आहे सगळ्यांना पण, फसगत तरी तिथेच होते.

प्रियदर्शिनी हिंगे

काल नमिताने उत्साहाने शॅापिंग केलं तेही ॲानलाईन. गेल्या वर्षी कोविडमुळे फार काही करता आलं नाही त्यामुळे यावर्षी तिने दिवाळी दणक्यात साजरी करायची ठरवली. आधी फेसबुकच्या वेगवेगळ्या ग्रुपवर वेगवेगळ्या गोष्टी बघायला सुरवात केली. अगदी साड्यांपासून घरातल्या हव्याशा अनेक वस्तूंपर्यंत. दिवसाकाठी हे पाहण्यातच बराच वेळ जायचा.मग, अचानक तिच्या फोनवर काही एसएमएस यायला सुरवात झाली. त्यात अनेक ॲाफर्स येऊ लागल्या.आधी तिनं दुर्लक्षच केलं. पण, मग काही काही ऑफर्स इतक्या टेम्पटिंग की दुर्लक्ष करताच येईना.त्यात एक मेसेज वारंवार येऊ लागला.एक नंबर पाठवा आणि फ्लॅट स्क्रिन टीव्ही मिळवा. मग, एकदा तिनं मेसेज वाचला व खाली दिलेल्या लिंकवर क्लिक केलं.एखादा शो किंवा काही प्रश्नमंजूषा असेल असं तिला वाटले मात्र साईटवर विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे ती देत गेली. तुम्हाला आलेला नंबर पाठवा या फोनवरच्या प्रश्नावरही तिने बँकेचा आलेला ओटीपी कधी दिला हे तिच्या लक्षातही आले नाही. पण, तो शेअर केला आणि काही सेकंदातच हळूहळू बँकेतून पैसे गेल्याचे मेसेज तिला यायला लागले.तेव्हा आपली फसवणूक झाल्याचं तिच्या लक्षात आलं.घाबरुन काही करेतो बँकेतून बरेच पैसे उडालेही होते. नवरा चिडला, पोलीस स्टेशन गाठलं. बरेच व्यापताप झाले. पण, पैसे उडाले ते उडालेच.शिकलीसवरलेली सूज्ञ नम्रता मोहाच्या एका क्षणी अशी अलगद सायबर फ्रॉडच्या जाळ्यात अडकली.असे अनुभव एकी दोघींचे नाही तर, आजकाल अनेकींचे.ऑनलाइन शॉपिंग करताना, कुणाला काही माहिती देताना सजग रहावं हे सगळ्यांना कळतं तरी फसगत होतेच, ती कशी?खरंतर घर कसं चालवावं, आर्थिक गणित कसं बसवावं हे बाईला जास्त कळतं असं म्हटलं जातं. पुरुष कमवतो मात्र आर्थिक संकटावेळी बायकोकडे कसे पैसे निघतात हे कोडं आजही अनेक पुरुषांना उलगडत नाही. मात्र आर्थिक साक्षरता आणि काही बेसिक नियम हे माहिती नसल्याने अनेकदा महिला सायबर घोटाळ्यांसह आर्थिक फसवणुकीला बळी पडतात.या दिवाळीत धनत्रयोदशीला धनाची आणि लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीची पूजा करताना आपण जरा नव्या काळातल्या काही गोष्टी पुन्हा पुन्हा स्वत:ला सांगू आणि आर्थिक सजगही होऊ, सावधही..

पैसा हातात? आपण सावध..

१. एकावर एक फ्री व एकदम फ्री किंवा खूप स्वस्त या भुलवणाऱ्या योजनांवर अधिकाधिक महिला फसताना दिसून येतात. क्रेडिट कार्डवर खरेदी केल्यास ही सवलत या सवलतीच्या मोहापायी गरज नसलेल्या वस्तूही अनेकदा खरेदी केल्या जातात. सायबर क्राईमसाठी अशाच भुलवणाऱ्या सवलती मोठं जाळं ठरतात.२. आता तर कोविडच्या काळात आपण ऑनलाइनवरच जवळ जवळ शिफ्टच झालो आहेत एका अर्थाने ते योग्य असलं तरी काही बेसिक नियम जर, आपण पाळले तर, खिशाला फार मोठं छिद्र पडत नाही, अट एकच, आधी यादी करा आपल्याला काय हवं, का हवं?३. कुठलीही खरेदी करतांना आपल्याला नक्की काय गोष्ट व किती तसेच काय बजेट मध्ये घ्यायची आहे ते ठरवून घ्यावे. यादीच करावी. व त्या बजेट व यादीच्या बाहेर जायचं नाही म्हणजे नाही.वस्तू घेताना त्या वस्तूचा उपयोग व गरज स्वतःसाठी किंवा घरच्यासाठी काय हा प्रश्न शंभरदा विचारावा.४. “ हाउ स्विट” म्हणून ‘कसलं गोड” असं घरात आलेल्या वस्तूचा उपयोगच नाही हे लक्षात येते. असा अनावश्यक खर्च टाळावा.५. कुठलीही वस्तू घेताना त्याची माहिती व माहिती पुस्तिका नीट वाचा, अनेकदा काही वाढीव खर्चही त्यात पुढे नाही ना, याची खात्री करावी. बरेचदा इलेक्ट्राॅनिक्स वस्तू खरेदी करतांना अशा फसव्या किमती कमी करुन सांगितल्या जातात. आपल्या गरजेचा प्राधान्यक्रमही ठरवून घ्या. जेणेकरुन काय घ्यायचे व काय वजा करायचे हे तुम्हाला कळायला सोपे जाईल.

६. कुठल्याही ऑफरवर विचार करतांना मुळात काहीही फ्री नसतं हे बोधवाक्य लक्षात ठेवून त्या ॲाफर मागचे नक्की काय जाणार आहे हे समजून घ्या. “तुमचे पैसे तिप्पट होणार” हे वाक्य जिथे कुठे वाचाल तेव्हा, दया कुच्छ गडबड है ! हा डायलाॅग नक्की आठवा.७. ऑनलाईन खरेदी करत असाल तर, कुठल्याही परिस्थितीत आपल्या बँकेच्या खात्या संबंधित कुठलीही माहिती देऊ नका. अशी विचारणा करणारे सर्व व्यवहार त्याचक्षणी रद्द करा.८. वाट्टेल ते झालं तरी आपला बँकेचा ओटीपी कुणालाही द्यायचा नाही.९. कुणी आपल्याला पैसे पाठवत असेल तर त्याचा क्यू आर कोड स्कॅन करायचा नाही.१०. बँक डेबिट-क्रेडीट कार्डची माहिती कुणालाही द्यायची नाही. वाटतं हे बेसिकच, की माहिती आहे सगळ्यांना पण, फसगत तरी तिथेच होते.

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)priya.dhole@gmail.com

टॅग्स :खरेदीऑनलाइन