Join us  

दिवाळीत मेकअप प्रॉडक्ट्स विकत घेताय? ही घ्या चेकलिस्ट, चुकीचं घेणं टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2021 4:39 PM

मेकअप करायचा तर चांगली प्रॉडक्ट पण हवीत. ही खरेदी करताना योग्य ती काळजी घ्यायला हवी, नाहीतर फसवणूक होण्याची शक्यताच जास्त...

ठळक मुद्देपुरेशी माहिती नसल्याने होऊ शकते फसवणूकमेकअप प्रॉडक्ट खरेदी करताना योग्य ती काळजी घ्यायला हवी

दिवाळी आली की खरेदीची धामधूम आणि नटूनथटून सगळीकडे मिरवण्याची लगबग. दिव्यांचा हा सण आयुष्यात आनंद घेऊन येतो. हा आनंद लुटण्यासाठी आणि एकमेकांमध्ये वाटण्यासाठी आपण छान दिसायला हवे ना. तुम्ही आतून सुंदर असलात की ती सुंदरता तुमच्या चेहऱ्यावर दिसते किंवा तुमचे एक हास्य तुमच्या चेहऱ्यावरील सर्वात मोठा मेकअप असतो हे सगळे जरी ठिक असले तरी बाहेर चारचौघात जाताना आपण थोडे का होईना आवरतोच. सौंदर्यप्रसाधने आपल्या मूळ सौंदर्यात अधिकच भर घालतात. बॉडी केअर, स्कीन केअर, हेअर केअर अशा अनेक गोष्टींसाठी विविध सौंदर्यप्रसाधनं आपण खरेदी करत असतो. ज्यामुळे आपलं डेली स्कीन केअर रूटीन पाळणं नक्कीच सोपं आणि सहज होतं. आपण प्रेझेंटेबल दिसायला हवं यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे क्रिम, लेप, पावडर, मॉइश्चरायझर, मस्कारा, लिपस्टिक अशा सर्व गोष्टी खरेदी करताना त्याबाबत जागरुक असायला हवं. मागच्या २ वर्षापासून आपण कोविडमुळे फारसे बाहेर पडलो नसलो तरी आता आपण बाहेर पडायला सुरुवात झाली आहे. दिवाळीच्या खरेदीच्या निमित्ताने तुम्ही मेकअप करण्याचे साहित्यही खरेदी करणार असाल तर काही गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायला हवी. आता ही सौंदर्यप्रसाधने खरेदी करताना कोणत्या गोष्टींकडे आवर्डून लक्ष द्यायचे याविषयी... 

( Image : Google)

१. त्वचेचा प्रकार आणि रंग लक्षात घ्या - आपल्या त्वचेचा रंग आणि प्रकार लक्षात घेऊन ब्यूटी प्रॉडक्टस खरेदी करा. अनेकांची त्वचा खूप कोरडी असते तर काहींची तेलकट असते त्यानुसार तुम्ही ब्यूटी प्रॉडक्ट खरेदी करायला हवीत. तसेच आपल्या त्वचेच्या रंगानुसार फाऊंडेशन, लिपस्टीक यांसारख्या गोष्टींचा रंग निवडायला हवा. 

२. ब्रँड पाहून घ्या - आपल्या मैत्रीणी किंवा बहीणी अमुक एक ब्रँडची प्रॉडक्ट वापतात म्हणून आपणही तोच ब्रँड वापरणे यापेक्षा आपल्याला कोणता ब्रँड चांगला वाटतो ते बघा आणि आपली प्रॉडक्टसची पसंती करा. प्रत्येक ब्रँडची एक खासियत असते, त्यानुसार योग्य ती माहिती घ्या आणि खरेदी करा. 

३. प्रॉडक्टवरची माहिती नीट वाचा - आपण खरेदी करत असलेल्या प्रॉडक्टसवर त्यातील घटक, त्यांचे प्रमाण यासंदर्भातील माहिती दिलेली असते. ती माहिती शांतपणे वाचा. त्याबद्दल आपल्याला काही शंका असेल तर संबंधित दुकानदारांना त्याबद्दल विचारा. त्यांना योग्य ते उत्तर देता येत नसेल तर हातातल्या मोबाइलवर त्याबद्दल सर्च करा आणि मगच विशिष्ट प्रॉडक्ट घ्यायचे की नाही ते ठरवा.

४. एक्सपायरी तपासून घ्या - तुम्ही खूप नियमित मेकअप करत नसाल तर तुम्हाला ब्यूटी प्रॉडक्ट खरेदी करताना ही काळजी घ्यायला हवी. या प्रॉडक्टमधील घटक हे ठराविक काळानंतर एक्सपायर होणारे असू शकतात. त्यामुळे तुम्ही कमी मेकअप करत असाल तर प्रॉडक्टची एक्सपायरी डेट आवर्जून बघा.

( Image : Google)

५. प्रॉडक्ट कोड - तुम्ही सुरुवातीपासून एखादी लिपस्टीक किंवा आणखी काही वापरत असाल आणि त्याची शेड तुम्हाला सूट होणारी असेल तर त्या प्रॉडक्टचा एक विशिष्ट क्रमांक असतो. हा क्रमांक तुम्ही आवर्जून लक्षात ठेवायला हवा. त्यामुळे ऐनवेळी तुमचा वेळ वाचू शकेल. 

६. विनाकारण खर्च टाळा - अँटी- एंजिग प्रोडक्टमध्ये रेटिनोइड्स आणि अल्फा-हायड्रॉक्सी एसिड हे घटक असतात. या घटकांमुळे शरीरात कोलेजन तयार होऊन पिगमेंटेशनची समस्या दूर होते, पण त्वचेसाठी हे घटक कितपत चांगले असतात याबाबत माहिती घ्यायला हवी. म्हणूनच फॅशनेलबल अँटी एजिंग प्रोडक्टवर खर्च करणे टाळा.

७. ऑफरला भुलू नका - बाजारात अनेक लहान ब्रँड असतात जे आपली उत्पादने विक्री व्हावीत यासाठी बरीच ऑफर देतात. यामध्ये एकावर एक फ्री. इतक्या रुपयांची खरेदी केली तर अमुक रुपयांची उत्पादने मोफत अशा ऑफर्स असतात. पण हे ब्रँड खात्रीलायक आहेत की नाही हे तपासणे आवश्यक असते. ही उत्पादने कमी दर्जाची असतील तर डोळे, त्वचा यांना हानी पोहोचण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे ऑफर्सना भुलू नका. 

८. वापर लक्षात घ्या - बाजारात गेलो की अनेकदा आपल्याला दिसेल ते सगळे घ्यायची इच्छा होते. मग आपण हेही घेऊन बघू, ते वापरुन बघू असे करत जास्त गोष्टी घेऊन ठेवतो. पण आपण मेकअपला तितके रुळलेले नसलो तर आपण यातील गोष्टी वापरत नाही आणि नेहमीच्या ठराविकच गोष्टी वापरतो. अशावेळी आपण हौसेने घेतलेल्या इतर गोष्टी पडून राहतात आणि कालांतराने त्या खराब होतात. त्यामुळे विनाकारण पैसेही वाया जातात. तेव्हा आपण खरंच ते वापरणार आहोत का याचा पुन्हा विचार करा आणि मगच खरेदी करा.  

टॅग्स :ब्यूटी टिप्समेकअप टिप्सखरेदीदिवाळी 2021