आपली छाती मोठी आहे म्हणून अनेक तरुणी किंवा महिला सतत ढगळे कपडे वापरणे पसंत करतात. किंवा छाती दिसू नये म्हणून सतत ओढणी, स्टोल घेऊन हा भाग झाकतात. पण त्यामुळे तुम्ही आऊटडेटेड तर दिसताच पण अजागळही दिसू शकता. जाड असूनही तुम्हाला सगळ्यांसारखे फॅशनेबल राहायचे असेल तर त्यासाठी काही सोपे उपाय करायला हवेत. यामुळे तुम्ही मस्त बारीक दिसता आणि तुम्हाला आपल्या शरीराची लाजही वाटत नाही. त्यामुळे कपडे निवडताना आणि घालताना काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात ज्यामुळे तुमची छाती मोठी दिसणार नाही.
१. शर्ट घालताना - अनेकदा आपण ऑफीसला किंवा बाहेर फिरायला जातानाही पुढे बटणे असलेला शर्ट घालतो. हा शर्ट घातल्यानंतर आपली छाती मोठी असेल तर तो पोटाच्या बाजुने तरंगतो. अशावेळी थेट शर्ट न घालता आत एखादी बनियन टाइप स्लीप घालावी. त्यावरुन हा शर्ट घालावा आणि त्याची बटणे उघडी ठेवावीत. त्यामुळे छाती तर झाकली जातेच पण ती मोठीही दिसत नाही.
२. पोलो नेक टीशर्ट - तुमचा छातीचा भाग थोडा मोठा असेल, उंची कमी असेल तर तुम्ही पोलो नेक टीशर्ट मध्ये जास्त जाड दिसू शकता. साधारणपणे थंडीच्या दिवसांत आपण अशाप्रकारचे पूर्ण झाकले जाणारे कपडे घालतो ज्यामुळे थंडी वाजणार नाही. मात्र या कपड्यांमध्ये आपण अधिक जाड दिसत असल्याने ते घालणे टाळावे. त्याऐवजी मोठा गळा असलेले कपडे घातल्यास तुमची छाती म्हणावी तितकी मोठी दिसणार नाही. यामध्ये तुम्ही व्ही नेक, ओव्हल नेक असे ट्राय करु शकता.
३. स्ट्रीप टॉप - अनेकदा आपण विकेंडला फिरायला जाताना किंवा एरवीही थोडे हटके कपडे घालतो. यावेळी आपण अगदी लहान स्ट्रीप असलेले कपडे घालतो. मात्र त्यामुळे तुमच्या शरीराचा जास्त भाग दिसतो आणि तुम्ही आहात त्यापेक्षा जाड दिसता. त्यामुळे कुर्ता, ब्लाऊज हे घालताना तुमचा छातीचा भाग मोठा असेल तर विशेष काळजी घ्यायला हवी आणि अशाप्रकारची फॅशन शक्यतो टाळायला हवी. त्यामुळे तुम्ही शक्यतो थ्री फोर्थ बाह्या असलेले कपडे घाला.
४. चमकदार कपडे टाळा - अनेकदा आपण सिल्क, सॅटीन किंवा मलमलचे कापड असलेले टॉप किंवा कुर्ते घालतो. या चमकदार कापडामुळे तुमच्या शरीराचा जो भाग प्रामुख्याने दिसतो त्याकडे पाहणाऱ्याचे आधी लक्ष जाते. त्यामुळे कपडे खरेदी करताना अशाप्रकारचे कापड घेणे शक्यतो टाळा. त्याऐवजी कॉटन, शिफॉन असे कापड कधीही चांगले.
५. अॅक्सेसरीज वापरा - तुम्ही जाड आहात त्यामुळे अजागळ दिसता असे तुम्हाला वाटत असेल आणि तुमचा लूक स्टायलिश व्हावा असे वाटते असेल तर शक्य तितक्या अॅक्सेसरीजचा वापर करा. यामध्ये तुम्ही कंबरेला एखादा बेल्ट लावू शकता, गळ्यात एखादा छानसा ट्रेंडी स्कार्फ घेऊ शकता. तसेच मोठे सॉक्स आणि हटके शूज घातल्यानेही तुमचा लूक हटके होण्यास मदत होईल.
६. कुर्ता घालताना - छाती मोठी असेल तर शक्यतो अंगरखा स्टाईल कुर्ता घालावा. यामध्ये सध्या अनारकली, रॅपर राऊंड असे अनेक प्रकार बाजारात मिळतात. त्यामुळे तुमच्या शरीराचे भाग विभागलेले दिसतात आणि तुम्ही जास्त जाड दिसत नाही.
७. जॅकेट, कोट वापरा - तुम्हाला बारीक दिसायचे असेल आणि तुम्ही उंचीला थोडे कमी आणि जाड असाल तर तुम्ही आतमध्ये एखादा घट्ट टॉप घालून त्यावर एखादे हाफ जॅकेट किंवा एखादा फूल कोट घातला तर तो मस्त दिसतो. यामुळे तुमची जाडी दोन कपड्यांमुळे झाकली जाते आणि छातीचा भागही फार मोठा आहे असे वाटत नाही. वेस्टर्न आणि पारंपरिक कपड्यांतही हल्ली बरेच जॅकेटचे पर्याय उपलब्ध असतात. यामधेय लाँग जॅकेटसही मिळतात.