आपल्या घराचा एखादा कोपरा आपला खूप खास असतो. याठिकाणी बसलो की आपल्याला अगदी रिलॅक्स वाटते. तर कधी एकटे वाटत असेल, मूड ठिक नसेल तरीही आपण या कोपऱ्यात जाऊन बसतो. नकळत काही वेळानी आपला मूड बदलतो. या कोपऱ्यासोबत आपल्या अनेक आठवणी जोडलेल्या असतात. अगदी शाळेत असताना कोपऱ्यात जाऊन रुसून बसण्यापासून ते स्वत:शी गप्पा मारण्यापर्यंत हा कोपरा आपली साथ देत असतो. अगदी लग्न झालं तरीही माहेरच्या घरातील कोपरा आपल्याला राहून राहून आठवतो. घरात असे अनेक कोपरे आपापले उभे असतात खरे, पण हे कोपरे आपल्या मनासारखे सुंदर आणि नीटनेटके करता आले तर? दिवाळीच्या निमित्ताने घराची आवराआवरी करताना घरातील कोपऱ्यांना तुमच्या हटके अंदाजात सजवल्यास ते कोपरे तुमच्या जगण्याचा भाग होऊन जातील. पाहूयात घराच्या वेगवेगळ्या खोल्यांमधील कोपरे देखणे करण्यासाठीच्या काही खास टिप्स...
१. हॉलमधील कोपरा सजवायचा असेल तर तुम्ही एखादे छानसे वॉलहँगिंग आणू शकता. यामध्ये हँगिंग बेल्स, मातीची हंडी किंवा साऊंड ऑफ म्युझिकपासून ते वेगवेगळ्या प्रकारच्या दिव्यांपर्यंत असंख्य पर्याय बाजारात उपलब्ध असतात. भिंतीवरुन टांगलेल्या या गोष्टी कोपऱ्याची शोभा नक्कीच वाढवतात. याखाली बसायला एखादी खुर्ची किंवा छोटा स्टूल असेल तर तुम्ही वाचनासाठी किंवा निवांत चहा-कॉफी घेण्यासाठी या कोपऱ्यात आवर्जून बसू शकता.
२. एखादया कोपऱ्यात शो-पिस किंवा काही फोटो ठेवण्यासाठीची रॅक असेल त्याठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीच्या वस्तू किंवा तुम्हाला जवळच्या व्यक्तीकडून भेट दिलेल्या वस्तू नक्की ठेऊ शकता. यामुळे तुम्ही त्या कोपऱ्यात पाहिल्यानंतर तुमच्या आठवणी जाग्या होतील आणि तुमचा मूड खराब असेल तर नकळत तो बदलायला मदत होईल.
३. कोपऱ्यात फ्लॉवरपॉट किंवा फुलदाणी असेल तर त्यातली फुले दर काही काळाने बदलायला हवीत. तसेच ही फुले स्वच्छ राहतील याची काळजी घ्यायला हवी. यातही प्लास्टीकची फुले ठेवण्याऐवजी कागदी किंवा इतर प्रकारची शोभेची फुले ठेऊ शकता. प्लास्टीकपेक्षा या फुलांमुळे शोभा तर वाढतेच आणि एक वेगळा लूक येऊ शकतो.
४. सध्या बाजारात घरात ठेवता येतील अशी अनेक शोभेची झाडे मिळतात. तुम्हाला झाडांची आवड असेल तर रंगीबेरंगी पानांची आणि फुलांची वेगवेगळ्या आकारातील झाडे छानशा कलाकुसर केलेल्या कुंडीत तुम्ही ठेऊ शकता. त्यामुळे तुमचा कोपरा नकळत फ्रेश होऊन जाईल. मात्र या झाडांना पाणी देणे त्यांची देखभाल करणे गरजेचे असते.
५. हल्ली बाजारात तांब्याचे, पितळ्याचे आणि ऑक्सिडाइजचे अनेक शो पिस मिळतात. मोठ्या आकाराचे प्राणी, पक्षी किंवा हंडीच्या आकाराचे हे धातूचे शो पिस दिसायला एकदम रॉयल कर दिसतातच पण कोपरा मस्त सजवून जातात. यामध्ये तुम्ही दिवा लावू शकलात तर रात्रीच्या वेळी त्याचा लँपसारखाही वापर करता येऊ शकतो.
६. तुम्हाला किंवा तुमच्या मित्रमंडळींमध्ये कोणाला पेंटींगची आवड असेल तर घराचा एखादा कोपरा तुम्ही स्वत: किंवा मित्र-मंडळींच्या मदतीने छान पद्धतीने रंगवू शकता. यामध्ये वारली पेटींगपासून ते म्यूरल्सपर्यंत अनेक गोष्टी करता येतात. याबरोबरच या रंगवलेल्या भिंतीवर एखादा दिवा लावल्यास तो कोपरा आणखी उठून दिसू शकतो.
७. घरातील टाकाऊ वस्तूंपासून काही मस्त शो-पिस बनवून तुम्ही या कोपऱ्यात ठेऊ शकता. यामध्ये पेन स्टंड, की होल्डर असे काही असेल तर तुम्हाला जागेचा चांगला वापरही करता येऊ शकतो. तसेच तुमची कला तुमच्या घराची शोभा वाढविण्यात हातभार लावते. मुलांना सुटीच्या काळात या गोष्टी शिकवून त्यांच्याकडून करुन घेऊन तुम्ही हा कोपरा सजवू शकता.
८. तुमचे किंवा तुमच्या मुलांचे लहानपणीचे फोटो, तुमचे फॅमिली फोटो हे थोडे वेगळ्या पद्धतीने तुम्ही या कोपऱ्यामध्ये लावू शकता. यासाठीचे फोटो होल्डर एखाद्या सुट्टीमध्ये मुलांकडून हाताने करुन घेतल्यास तुम्हाला त्याचा आनंदही मिळू शकतो.
९. बेडरुमधील कोपरा सजवताना तुमची आवड, जागेची उपलब्धता, गरज यांनुसार तुम्ही कोपरे सजवू शकता. यामध्ये तुम्ही दागिने लटकवता येतील असे हँगर किंवा होल्डर करुन ते कोपऱ्यात लावल्यास घाईच्या वेळी तुम्हाला पटकन गोष्टी मिळण्यास मदत होते.
१०. एखादी शांत बुद्धाची मूर्ती किंवा देवाची एखादी मूर्ती कोपऱ्यात ठेवल्यास तुम्ही दमून घरी आल्यावर शांत होण्यास निश्चितच मदत होऊ शकेल.