Join us  

दिवाळीत कमीतकमी पैशात सजवा घर, द्या एकदम जबरदस्त लूक; त्यासाठी 10 आयडिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2021 12:55 PM

दिवाळीत घर कसं सजवायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर हे वाचाच. आपलं घर प्रसन्न आणि प्रकाशमय करायचे असेल तर या आयडीया तुम्हाला नक्की मदत करु शकतील

ठळक मुद्देघर सजवण्याच्या काही सोप्या टिप्स दिवाळीत घारालाही द्या हटके लूकतुमच्यासोबत घरही सजवा झकास

दिवाळीची आपण सगळेच आतुरतेने वाट बघतो. अभ्यंगस्नान, फटाक्यांची आतषबाजी, फराळाचे पदार्थ यांबरोबरच आपण नवनवीन कपणे घालून सजतो. आपणच नाही तर आपले घरही या काळात छान प्रकाशमान दिसावे म्हणून आकाशकंदील, लाईटच्या माळा आणि पणत्यांनी आपण त्याला सजवतो. दिव्यांच्या या सणाला आपले घर देखणे दिसावे यासाठी आपण कितीतरी नियोजन करत असतो. घराला रंग देण्यापासून ते काही वस्तू नवीन आणण्यापर्यंत आपण एक ना अनेक गोष्टी मन लावून करत असतो. घरी येणारे नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यासमोर हे घर सुंदर दिसायचे असेल तर ते थोडे तरी सजवायला हवे ना. घराची सजावट करताना कोणत्या गोष्टींचा वापर केला तर तुम्हाला प्रसन्न वाटू शकते, कोणत्या गोष्टींमुळे तुमच्या घराचा लूक बदलू शकतो पाहूया...

१. बाजारात वेगवेगळ्या आकाराचे आणि प्रकारचे दिवे मिळतात. हे दिवे तुम्ही घरातील वेगवेगळ्या कोपऱ्यात लावू शकता. यामध्ये पाण्यावरील दिवे, इलेक्ट्रीकचे दिवे आणि पारंपरिक पणत्या असे बरेच प्रकार पाहायला मिळतात. मातीच्या दिव्यांमध्येही लहान पणत्यांपासून ते एकाच साच्यात जास्त दिवे असलेले प्रकार घरातील कॉर्नरमध्ये लावल्यास घराचा लूक बदलू शकतो. 

२. तुमच्याकडे काचेच्या बाटल्या किंवा बरण्या असतील तर त्यात लायटींगच्या लहान आकाराच्या माळा सोडल्यास ते अतिशय छान दिसते. या बरण्या वेगवेगळ्या रंगाच्या आणि आकाराच्या असतील तरीही या बाटल्यांधून पडणारा प्रकाश संध्याकाळच्या वेळी एकदम मस्ट दिसतो. तुमच्याकडे अशा बाटल्या किंवा बरण्या नसतील तर बाजारात अगदी कमी किमतीत त्या सहज मिळू शकतात. 

३. तुमच्या घरात फुलझाडाची रोपं असतील तर ती दिवाळीपुरती घरात आणा. हॉलमध्ये किंवा बेडरुममध्येही मोकळ्या जागेत किंवा कोपऱ्यात या कुंड्या ठेवल्या तर त्या घराचा लूक बदलू शकतील. या कुंड्यांना काव लावली तर त्या नव्यासारख्या दिसतील. तसंच या कुंड्यांच्या बाजुने तुम्ही फुलांचे किंवा पणत्यांचे डेकोरेशन करु शकता. 

४. आपल्याकडे काचेचे मोठे किंवा लहान बाऊल असतात. या बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यावर फुलांचे डेकोरेशन केल्यास मस्त दिसते. याशिवाय एखादे तांब्याचे किंवा पितळ्याचे बाऊल असेल तर आणखी छान परंपरिक लूक येऊ शकतो, कोणी पाहुणे येणार असतील तर त्यांना आल्या आल्या हे पाहून नक्कीच आनंद होईल. यामध्येही तुम्ही बाजारात मिळणाऱ्या अगदी लहान आकाराच्या लाईटच्या माळा सोडू शकता. ताटाभोवती ठेवायची मोत्याची रांगोळी किंवा महिरप या बाऊलच्या भोवती मांडल्यास आणखी छान दिसते. 

( Image : Google)

५. तुमच्याकडे पारंपरिक समई, मोठा दिवा किंवा लटकता दिवा असे काही असेल तर ते या दिवसांत तुम्ही आवर्जून वापरु शकता. यामुळे घरात प्रसन्न तर वाटतेच आणि आपल्या आजी-आईने दिलेल्या दिवा लावल्यामुळे त्यांचाही भास आपल्याला घरात होत राहतो. 

६. झेंडूच्या फुलांपासून तुम्ही असंख्य गोष्टी करु शकता. या फुलांच्या माळा घराला तोरण म्हणून तसेच गॅलरी असल्यास गॅलरीच्या ग्रीलला लावा. यामुळे तुम्हाला सणाचा फिल येईल आणि प्रसन्न वाटेल. तसेच या फुलांची दारात आणि गॅलरीत रांगोळीही काढू शकता. 

७. घराच्या खिडक्यांना गॅलरीमध्ये आवर्जून लहान आकाशकंदील लावा. तसेच हल्ली बाजारात सजावटीच्या बऱ्याच गोष्टी मिळतात, तुमच्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या माळा खिडकीच्या ग्रिलला लावल्यास सणाचे वातावरण निर्माण होऊन पाहायला छान वाटते. 

८. हल्ली बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या मेणबत्या मिळतात. त्यांचे आकार आणि वास अतिशय मोहक असतात. अशा काही मेणबत्त्या आणून त्या तुम्ही घरात काही ठिकाणी ठेवल्यास त्याचा मंद प्रकाश आणि वास घरात वेगळे वातावरण निर्माण करेल. 

९. रांगोळी ही तर पारंपरिक गोष्ट असून दारासमोर, गॅलरीमध्ये मस्त रांगोळी काढू शकता. तुम्हाला रांगोळी काढता येत नसेल तरी हरकत नाही, हल्ली बाजारात रांगोळी काढायची बरीच साधने मिळतात. तसेच छापही मिळतात. शिवाय इंटरनेटवर रांगोळीच्या सोप्या ट्रीक्स दिलेले व्हिडियो पाहूनही तुम्ही रांगोळी काढू शकता. 

१०. टेरेस किंवा गॅलरीमध्ये वरच्या बाजूला लटकणारे दिवे अतिशय सुंदर दिसतात. याठिकाणी लटकत्या कुंड्या  असल्या तर त्या कुंड्यांमध्ये तुम्ही हे दिवे सोडू शकता. इलेक्ट्रीकचे बरेच दिवे सध्या बाजारात मिळतात. या दिव्यांचा तुम्ही नक्की वापर करु शकता. किंवा लाइटची एखादी छानशी माळ वरच्या बाजूने सो़डल्यास तिही छान दिसते. 

टॅग्स :खरेदीदिवाळी 2021सुंदर गृहनियोजन