दिवाळी म्हणजे दिव्यांचा झगमगाट. काही ठिकाणी लाईटींगचा झगमग प्रकाश तर काही ठिकाणी मंद मंद उजळणाऱ्या पणत्या. दोन्हींचा प्रकाश जेव्हा एकत्र येतो, तेव्हा दिवाळीचा सण अधिकच खुलतो. पणत्या, लाईटिंग या गोष्टी दिवाळीत सगळीकडेच असतात आणि निश्चितच त्यांच्या असण्याने दिवाळीचा प्रकाश आणखीनच तेजोमय होतो. पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट मात्र प्रचंड भाव खाऊन जाते. ती गोष्ट म्हणजे घरोघरी मोठ्या मानाने, दिमाखात आणि सगळ्यात उच्चस्थानी विराजमान झालेला आकाशदिवा. प्रत्येक घरी असलेला आकाशदिवा वेगळाच भासतो. दिवाळीच्या दिवसांमध्ये तर घरोघरी कसे आकाशदिवे लावले आहेत, हे पाहण्याचा छंदही अनेकांना असतो.
म्हणूनच तर दिवाळीला बहुतांश घरांमध्ये नवा कोरा आकाशदिवा विकत आणून लावला जातो. पण प्रत्येकवर्षी आकाश दिव्याची खरेदी कशाला करायची. कधीतरी घरी बनविलेला आकाशदिवा अंगणात लावून बघूया की. आपण केलेल्या आकाशदिव्यातून पाझरणारा प्रकाश निश्चितच आपला दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारा ठरेल. आकाशदिवा बनविण्यासाठी खूप काही दिव्य करण्याची किंवा खूप सामान आणून खूप तयारी करण्याची अजिबातच गरज नाही.
अगदी घरात सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्याचा वापर करून आपण दिवाळीत आकर्षक आकाशदिवे तयार करू शकतो. शिवाय कोरोनाकृपेने या वर्षीही मुलांच्या शाळा सुरू नाहीत. त्यामुळे मुलांनाच मदतीला घ्या आणि मस्त आकाशदिवा घरीच तयार केला. आकाश दिवा बनविण्याची ही ॲक्टीव्हिटी मुलांना प्रचंड आनंद देणारी ठरेल. शिवाय आजूबाजूच्या घरांमध्ये दिसणाऱ्या त्याच त्या पॅटर्नच्या आकाशदिव्यांपेक्षा आपला आकाशदिवा हटके आणि सगळ्यांपेक्षा वेगळा दिसेल हे नक्की.
फुगा आणि दोऱ्याचा आकाशदिवा
या पद्धतीने आकाशदिवा बनविणे अतिशय सोपे आहे. असा आकाशदिवा बनविण्यासाठी आपल्याला फुगा, दोरा किंवा लोकर, फेव्हिकॉल, पाणी एवढ्या बेसिक गोष्टी लागणार आहेत. सगळ्यात आधी फुगा फुगवून घ्या. फुग्याची जेवढी फुगण्याची क्षमता असेल, तेवढा तो फुगवा. असे केले नाही, तर आकाशदिवा जरा ढिला पडू शकतो.
त्यानंतर एका बाऊलमध्ये एक फेव्हिकॉलची छोटी बॉटल पुर्णपणे रिकामी करा. जेवढा फेव्हिकॉल घेतला तेवढेच पाणी आता त्या बाऊलमध्ये टाका. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करा. तुम्हाला ज्या रंगाचा आकाशदिवा तयार करायचा आहे त्या रंगाचा दाेरा घ्या. आपण कपडे शिवण्यासाठी जो दोरा वापरतो, तो दोरा तुम्ही यासाठी वापरू शकता.
दोऱ्याऐवजी लोकर, सुतळी अशा गोष्टी देखील वापरता येतात. यानंतर आता ज्या बाऊलमध्ये फेव्हिकॉल आणि पाणी हे मिश्रण एकत्र केले आहे, त्या बाऊलमध्ये एक दोऱ्याचे रीळ टाका. दोऱ्याचे एक टोक मात्र वर ठेवा. यानंतर फुग्याला ज्या ठिकाणी गाठ बांधली आहे, त्याचा आजूबाजूचा भाग सोडा आणि त्यानंतर दाेरा गुंडाळायला सुरुवात करा. जो भाग आपण रिकामा सोडला आहे, त्या भागातून आपण आकाशदिव्यात जो लाईट सोडणार आहोत, त्याची वायर टाकणार आहोत.
यानंर गोलाकार दिशेने किंवा वेडेवाकडे कसेही दोरा गुंडाळत जा. दोऱ्याचे रिळ संपले तर दुसरे रिळ वापरा. तसेच जर फेव्हिकॉलचे मिश्रण संपले तर पुन्हा फेव्हिकॉल आणि पाणी समप्रमाणात टाकून नवे मिश्रण तयार करा. जोपर्यंत सर्व बाजूने फुगा कव्हर होत नाही, तोपर्यंत दोरा गुंडाळत रहावा. यानंतर हा फुगा दोन दिवस सुकू द्या. फुग्यावरचा दोरा सुकला की अतिशय कडक होतो. दोरा कडक झाला की आतला फुगा टाचणीने फोडून टाका. फुगा फुटला तरी आता आपण गुंडाळलेल्या दोऱ्यानेच फुग्याचा आकार घेतल्याचे दिसून येते. फुटलेल्या फुग्याचे रबर आकाशदिव्याच्या बाहेर काढून घ्या आणि एक मस्त लाईट टाकून हा आकाशदिवा घराबाहेर टांगा. तुम्ही तुम्हाला पाहिजेत, तसे भरपूर आकाशदिवे या पद्धतीने बनवू शकता.
आकाशदिव्याची सजावट
आता हा आकाश दिवा तयार केल्यानंतर तुम्ही त्याला वेगवेगळे ग्लिटर कलर लावून चमकवू शकता. किंवा वेगवेगळे स्टोन, मोती लावून आकाश दिव्याची सजावट करू शकतो. लोकरीचे गोंडे तयार करून ते या आकाशदिव्याच्या खालच्या भागात लटकविले, तरी आकादिवा अधिक आकर्षक दिसतो.