दिवाळी म्हणजे घरोघरी खरेदीची धुम. घराच्या सजावटीच्या वस्तू, उटणे, पणत्या, आकाशदिवे, फराळाची तयारी असं सगळं होत असतंच, पण त्यासोबतच एक मोठी खरेदीही करायची असते, ती म्हणजे घरातल्या प्रत्येकासाठी कपडे खरेदी. हे खरोखरंच खूप अवघड काम असतं. कारण प्रत्येकाच्या चॉईसनुसार कपडे घेताना खरोखरीच दमछाक होते. एकवेळ मोठ्या मंडळींची खरेदी होऊनही जाईल, पण छोट्यांचे कपडे घेणं म्हणजे महाकठीण काम आहे, अशी भावना अनेक जणींची आहे.
मुलांना कितीही भारी आणि कितीही छान कपडे घेतले तरी ते टोचतात, असं म्हणत मुलं कपडे घालायला चक्क नकार देतात. त्यामुळे मग ऐन सणावाराच्या दिवसांमध्ये मुलांवर चिडचिड होते आणि एवढे पैसे घालवून घेतलेले कपडे मुलांनी अर्धातासही अंगावर ठेवले नाहीत, म्हणून खूप वाईट वाटते. हे असं सगळं तुमच्या बाबतीत होत असेल, तर या दिवाळीत मुलांची खरेदी थोडी स्मार्ट पद्धतीने करा. मुलांवर चिडण्यापेक्षा त्यांची अडचण समजून घ्या आणि त्यांचे म्हणणे काय आहे ते शांतपणे ऐका. जेणेकरून मुलांचा कपडे घालताना नेमका काय प्रॉब्लेम होतो आहे, हे तुम्हाला समजेल.
मुलांसाठी कपडे घेताना या गोष्टी तपासून घ्या.....
मुलांची त्वचा अतिशय नाजूक असते. आपल्याला भरजरी साड्यांची खूप सवय नसते. पण सणासुदीला आपण अशा साड्या नेसतो. कार्यक्रम झाल्यावर जेव्हा आपण साडी सोडून आपले नेहमीचे कपडे घालतो, तेव्हा आपणही हुश्श..... म्हणत रिलॅक्स होतो. असंच काहीसं मुलांचं असतं. पण वय कमी आणि त्वचा खूपच नाजूक असल्याने त्यांना टोचके कपडे सहन होत नाहीत. म्हणूनच मुलांसाठी कपडे घेताना या काही गोष्टींची काळजी घ्या.
१. मुलांसाठी कपडे घेताना फॅब्रिक्सच्या बाबतीत हयगय करू नका. मऊ, तलम कपडे मुलांसाठी निवडा.
२. कॉटन आणि सिल्क हे दोन मुलांच्या कपड्यांसाठीचे उत्तम पर्याय आहेत. हे कपडे टोचत नाहीत आणि वजनाने अतिशय हलके असतात. त्यामुळे मुलांसाठी कॉटन आणि सिल्कचे कपडे घेण्यास प्राधान्य द्या.
३. मुलांचे कपडे घेताना त्या कपड्यांची शिवण आतल्या बाजूने कशी आहे, हे नक्की तपासून बघा. अनेकदा कपड्यांना काही टोचक्या लेस लावलेल्या असतात. आपल्याला वाटते या लेस बाहेरच्या बाजूने आहेत, त्यामुळे त्या टोचणार नाहीत. पण ही लेस जेव्हा शिवली जाते, तेव्हा त्याचा काही भाग कपड्यांच्या आतून देखील असतो आणि तो मुलांना टोचतो. यामुळे मग मुलांची चिडचिड होते आणि नेमके काय टोचते हेच त्यांना समजत नाही.
४. कपड्याची शिवण आतल्या बाजूने मऊ, गुळगुळीत असल्याची खात्री करा. अन्यथा कपडे टोचू शकतात.
५. त्वचेला त्रास होईल, अशा डिझाईन्सची किंवा असे धागे असलेले कपडे टाळा. कारण हे कपडे त्वचेवर घासतात.
६. मुलांसाठी खूप जड, वजनदार कपडे घेऊ नका. कारण त्याचा मुलांना त्रास होतो. कपडा अतिशय मऊ आणि वजनाने हलका असावा.
७. दिवाळीत घरभर दिवे असतात, खूप फटाके फुटत असतात, त्यामुळे विशेषत: मुलींना कपडे घेताना ते जास्त घेरदार, पायघोळ घेऊ नका. अन्यथा त्यांना ते सांभाळणे खूप कठीण जाईल.
८. दिवाळीत थंडी असणार हे गृहित धरून मुलांना अगदीच लेस असणारे, खूपच कमी बाह्यांचे कपडे घेऊ नये. अंग झाकणारे आणि थंडीपासून थोडा बचाव करू शकणारे कपडे मुलांसाठी योग्य ठरतील.
९. ड्रेसला जर मागच्या बाजूने चेन किंवा हुक असेल, तर ते मुलांच्या पाठीवर कायम घासत राहते आणि नंतर दुखू लागते. त्यामुळेही मुले कपडे घालण्यास नकार देतात. त्यामुळे चेन, हूक आतील बाजूने कसे झाकले आहे, हे तपासून घ्यायला विसरू नका.
१०. कपड्यांच्या मागच्या बाजूने आतील भागात सगळ्यात वर कपड्याचे लेबल असते. हे लेबल आधी काढून टाका. कारण ते घासल्यानेही अनेक मुलांना त्रास होतो.