सणवार आले की आपल्या उत्साहाला उधाण येतं. नवरात्रात स्वत:साठी, घरासाठी खूप काय- काय खरेदी केली जाते. तरी बरं यंदा कोरोना कृपेने दांडिया नाहीत. नाहीतर दांडियासाठी ड्रेस, मेकअप, ज्वेलरी, सॅण्डल असं काय काय खरेदी केलं जातं. एकच एक ड्रेस आणि ज्वेलरी रिपिट तरी कशी करणार? म्हणून मग जेवढे दिवस दांडिया खेळायला जाण्याचं प्लॅनिंग असेल, तेवढ्या दिवसांसाठी वेगवेगळी खरेदी केली जाते. आता नवरात्रीत तर नवरंगांची फॅशनच झाली आहे. म्हणून मग बऱ्याचदा आपल्याकडे नवरात्रीतल्या ज्या रंगाचे कपडे नाहीत, त्या कपड्यांची खरेदीही केली जाते. कारण नवरात्रीत रंग स्ट्रिक्टली फॉलो करणारे खूप असतात. अशावेळी जर आपणच वेगळ्या रंगाचे कपडे घालून गेलो तर ते खूपच ऑड दिसतं.
ही झाली नवरात्रीची तयारी. याशिवाय ज्या सखी विवाहित आहेत, ज्यांना घट बसवायचे असतात, त्यांना आणखी वेगवेगळी तयारी करावी लागते. यात बरेच पैसे खर्च होऊन जातात. काही गरज म्हणून, काही आवड म्हणून तर पुष्कळ सारे केवळ आवडली वस्तू म्हणून घेतली एवढ्यासाठी खर्च होतात. दसऱ्यानंतर लगेचच येते ती दिवाळी. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे वेगळे ड्रेसिंग. याशिवाय घराचे डेकोरेशन, नातलग, मित्रमंडळी यांना गिफ्ट यातही खूप पैसे खर्च होतात. हौसेखातर तर आपण अशा अनेक वस्तू घेऊन ठेवतो, ज्या आपल्याला कधीच लागत नाहीत किंवा वर्षातून फार- फार तर एकदोनदा त्याचा उपयोग होतो.
ऑनलाईन शॉपिंग करताना तर आपल्याला अशा अनेक वस्तू दिसतात. ज्या वस्तू घेण्याचं आपल्या ध्यानीमनीही नसतं. पण समोरची वस्तू एवढी आकर्षक पद्धतीने मांडलेली असते की आपल्याला ती भारीच आवडून जाते आणि आपण ती वस्तू आपल्या गरजेची आहे की नाही, याचा विचारही न करता चक्क ती वस्तू घेऊनही टाकतो. तुमचंही असंच होत असेल आणि सणवार आले की बघता बघता सगळा पैसा खर्च होऊन जात असेल, तर थोडं थांबा. पैशांची बचत करून स्मार्ट शॉपिंग कशी करायची ते जाणून घ्या.
१. खर्च किती करायचा हे ठरवून घ्या
सणावाराला आपल्याला काय करायचे आहे आणि किती खरेदी करायची आहे, याचा व्यवस्थित हिशोब एकदा करून घ्या. प्रत्येक गोष्टीवर आपण किती पैसे खर्च करणार आहोत, हे एकदा लक्षात आले की आपली मग आपल्याकडे असलेल्या पैशांचा ताळमेळ ठरविता येतो. यामुळे आपोआपच आपल्या खरेदीला आळा बसतो. नियोजन केले होते, तेवढे पैसे संपले की खर्च थांबवायचे, याची पक्की खूणगाठ मनाशी बांधून ठेवा.
२. प्रत्यक्ष खर्च करताना....
कोणत्याही गोष्टीसाठी किती खर्च करायचे, हे आपण ठरवलेलं असतं. पण बऱ्याचदा असं होतं की प्रत्येक वस्तूमध्ये १००- १५० रूपयांची वाढ होत जाते. एखादी वस्तू घेताना त्याच्यातल्या बजेटमध्ये जर १००- १५० रूपये वाढले तर ठिक आहे, पण प्रत्येक वस्तूतच एवढे बजेट वाढत राहीले, तर सगळेच बजेट कोलमडून जाते. त्यामुळे प्रत्यक्ष खर्च करण्याची वेळ आली की आपण जे नियोजन केलं आहे ते स्ट्रिक्टली फॉलो करण्याचा प्रयत्न करा.
३. क्रेडिट कार्डवर खरेदी टाळा
क्रेडिट कार्ड ही खूप चांगली सोय आहे. पण यामुळे अनेकदा अनावश्यक खर्चांना निमंत्रण मिळते. क्रेडिट कार्डच्या भरवशावर मोठमोठाली खरेदी केली जाते, पण त्यानंतर मात्र दर महिन्याला पैशांची परतफेड करताना चांगलेच नाकीनऊ येतात. त्यामुळे शक्यतो क्रेडिट कार्डवर खरेदी करणे टाळा.
४. डिस्काउंटच्या मोहात पडू नका
एकावर एक फ्री किंवा फ्लॅट ५० टक्के, ४० टक्के ऑफ या मोहात कधीच अडकू नका. कारण हे सगळे ग्राहकांना आकर्षित करण्याचे हनी ट्रॅप्स आहेत. बऱ्याचदा अशा मोहात पडून आपण गरज नसलेली वस्तू घेऊन टाकतो आणि अनावश्यक खर्च करून बसतो. असा डिस्काऊंट परत मिळणार नाही, असे आपल्याला वाटते. पण असे काही नसते. वर्षातून दोन- तीन वेळा असे डिस्काउंट असतातच. त्यामुळे डिस्काऊंटच्या मोहात अजिबात पडू नका.
५. जे घ्यायचे नाही, तिकडे बघू नकाच...
दिदी सिर्फ देख लो.... देखने मे क्या पैसे लगते क्या.... असं दुकानदार मोठ्या प्रेमाने म्हणतो आणि आपण त्या मोहात अडकतो. बघता बघता तो एखादी वस्तू कधी आपल्या गळ्यात मारतो, हे ही आपल्याला कळत नाही. असंच ऑनलाईन शॉपिंगचही असतं. जेव्हा आपण ऑनलाईन वस्तू बघतो, तेव्हा गरज नसताना अनेक वस्तू सातत्याने स्किनवर फ्लॅश होतात. शेवटी आपल्याला या वस्तू बघण्याचा मोह होतो आणि आपण त्या विंडोवर क्लिक करतो. बघता बघता अनेक वस्तूंचं भांडार आपल्यासमोर खुलं होतं आणि मग कधी यातल्या एक- दोन गोष्टी घेऊन टाकतो, हे देखील आपलं आपल्याला कळत नाही. म्हणूनच तर जे घ्यायचे नाही, तिकडे बघायचे पण नाही, हे तुमच्या मनाला वारंवार सांगा आणि त्याबद्दल एकदम कडक रहा.