Join us  

Makar Sankranti: संक्रांतीला वाण काय द्यायचं, प्रश्न पडलाय? ५० रुपयांहून कमी किंमतीत एकसे एक पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2022 4:45 PM

दर वर्षी संक्रांत सणाला काय लुटायचे असा प्रश्न असेल तर हे पर्याय नक्की वाचा....

ठळक मुद्देथोडे डोके लढवले तर तुम्हालाही सुचू शकतात भन्नाट आयडीयाउपयोगी आणि तरीही चांगले दिसेल असे काय देता येईल याचा विचार करा

थंडी संपून उन्हाळा सुरू होण्याची चाहूल म्हणजे मकरसंक्रांतीचा सण. हा सण जवळ आला की तिळाचे लाडू, वड्या, गुळाच्या पोळ्या, पतंग उडवणे यांची जशी लगबग सुरू असते तशी महिला वर्गात आणखी एक गडबड असते ती म्हणजे संक्रांतीला हळदीकुंकवाला बोलावलेल्या महिलांना वाण काय द्यायचं? महिलांना दरवर्षी संक्रांतीला काय लुटायचे असा प्रश्न साहजिकच पडतो. मग डोके लढवून कोणी रोजच्या वापरातील एखादी छानशी वस्तू देतात. तर कोणी चक्क किराण्यातील एखादा पदार्थ. इतकेच नाही तर हल्ली एकाहून एक शक्कल लढवून रोजच्या वापरात उपयोगी असे काहीतरी दिले जाते. मात्र तुम्हाला या संक्रांतीला काय वाण द्यायचे असा प्रश्न पडला असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही खास पर्याय घेऊन आलो आहोत, तेही अगदी कमीत कमी किंमतीत मिळतील असे. पाहूया हे कोणते पर्याय आहेत जे तुम्ही समवयस्क महिलांना नक्की देऊ शकता.

(Image : Google)

१. झाडाचे रोप - एखाद्या झाडाचे रोप दिल्याने पर्यावरणास हातभार लागायला मदत होते आणि समोरच्या व्यक्तीकडे कायम तुमची आठवण राहते. यामध्ये तुम्ही गुलाब, मोगरा, शेवंती अशी फुलझाडांची रोपे देऊ शकता. किंवा अगदी तुळशीचेही रोप देऊ शकता. ३० ते ५० रुपयांपर्यंत नर्सरीमध्ये ही रोपे नक्की मिळतात. त्यामुळे वाण म्हणून देण्यासाठी हा उत्तम उपाय ठरु शकतो. 

२. मास्क - मास्क ही सध्या अतिशय गरजेची गोष्ट झालेली आहे. बाहेर कुठेही जाताना आपल्याला सर्वात आधी लागणारे मास्क महिलांना असतील तेवढे कमीच असतात. वेगवेगळ्या साड्यांवर, ड्रेसवर जातील असे मास्क वापरणे महिलांना आवडते. त्यामुळे छानशी एम्ब्रॉडरी केलेले किंवा अगदी साधे कापडाचे मास्क तुम्ही महिलांना नक्की देऊ शकता. मास्कमुळे महिला खूशही होतील आणि तुमचा वाणाचा प्रश्नही सुटेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गरजेची गोष्ट असल्याने हे मास्क आवर्जून वापरले जाईल. 

३. फळे - फळे हा आहारातील अतिशय महत्त्वाचा घटक असतो. पण अनेकदा घाईगडबडीत महिलांकडून फळे खाल्ली जात नाहीत. त्यामुळे तुम्ही महिलांना ताजी फळे देऊन ती आवर्जून खाण्यास सांगू शकता. या महिलांच्या कुटुंबातील लोकही फळे खातील. त्यामुळे सुवासिनींच्या आरोग्याचाही तुम्ही विचार करत आहात असा संदेश तुम्हाला यातून निश्चितच देता येईल.

४. बॉडी लोशन - थंडीच्या दिवसांत त्वचा फुटण्याचे प्रमाण जास्त असते. त्वचा कोरडी पडली की ती तडतडते आणि त्याचे पापुद्रेही निघतात. त्यामुळे जवळपास प्रत्येक महिलेला बॉडी लोशन किंवा मॉइश्चरायझर या काळात आवर्जून लागतेच. अशावेळी सगळ्यांना आवडेल असे एखाद्या चांगल्या ब्रँडचे लहान बॉडी लोशन किंवा मॉइश्चरायझर दिल्यास महिलांना हे वाण आवडेल.

(Image : Google)

५. गाळणे किंवा लहान किसणी - चहाचे गाळणे किंवा आलं-लसूण आणि ड्रायफ्रूट किसायची लहान आकाराची किसणी या स्वयंपाकघरातील अत्यावश्यक गोष्टी असतात. सध्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारची गाळणी आणि किसण्या उपलब्ध असतात. या गोष्टी तुम्ही जास्त प्रमाणात घेतल्यास तुम्हाला त्यावर सवलतही मिळू शकते. तसेच घरात या वस्तू असतील तरीही काही काळाने त्या नव्याने आणाव्याच लागतात. त्यामुळे या दोन्ही वस्तूंपैकी एक वस्तू तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. या गोष्टी बजेटमध्ये बसणाऱ्या असल्याने तुम्हाला फारसा अर्थिक भारही येत नाही.  

टॅग्स :सोशल व्हायरलमकर संक्रांतीमहिला