सोनं ही आपल्याकडे आजही प्रतिष्ठा आणि श्रीमंती दर्शवणारी एक महत्त्वाची गोष्ट आहे. मौल्यवान असलेल्या या धातूचे अनेकांना आकर्षण असते. अमुक व्यक्तीकडे किती सोनं आहे किंवा लग्नात मुलाला आणि मुलीला किती सोनं घातलं यावर आजही त्या कुटुंबाची श्रीमंती ठरते. संपत्ती म्हणून आपण सोनं साठवून ठेवतोच पण महिला वर्गात दागिन्यांची आवड म्हणून सोन्याची खरेदी केली जाते. थोडे पैसे साचले की आपण गुंतवणूकीचा चांगला पर्याय म्हणून शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करुन ठेवतो. त्यासाठी आपण अनेकदा चांगले मुहूर्त पाहतो आणि सराफांच्या दुकानांसमोर रांगा लावतो. मात्र आता तसे करण्याची आवश्यकता राहणार नाही (Gold ATM in India Gold will Come Out From ATM).
कारण एटीएममधून ज्याप्रमाणे आपण पैसे काढू शकतो त्याचप्रमाणे आता एटीएमच्या माध्यमातून सोने खरेदी करता येणार आहे. दिवसेंदिवस तंत्रज्ञानाचा विकास होत असल्याने आपल्या दैनंदिन आयुष्यातील असंख्य गोष्टी सोप्या झाल्या आहेत. पूर्वी पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये रांग लावावी लागायची. मात्र एटीएमची सुविधा आल्यानंतर बँकेत असलेले पैसे काढण्यासाठी रांग लावण्याची आवश्यकता राहीली नाही. त्याचप्रमाणे सोने खरेदी करायचे असेल तर आता सराफांकडे न जाता थेट एटीएमच्या माध्यमातून सोने खरेदी करता येणार आहे. विशेष म्हणजे या सुविधेमुळे दिवसाच्या कोणत्याही वेळेला आपण सहज सोने खरेदी करु शकतो.
कसे काढता येणार एटीएममधून सोनं?
डेबिट किंवा क्रेडीट कार्डचा वापर करुन एटीएममधून सोन्याची खरेदी करता येणार आहे. यामध्ये अर्धा तोळा ते १० तोळे सोने खरेदी करता येऊ शकते. तेलंगणाची राजधानी हैद्राबाद येथे अशाप्रकारचे एटीएम सुरू झाले असून सामान्य एटीएमप्रमाणेच यामध्ये सोन्याची खरेदी करता येणार आहे. हे एटीएम गोल्डसिक्का या कंपनीचे असून ओपनक्यूब टेक्नॉलॉजी या कंपनीने त्याची तांत्रिक बाजू सांभाळली आहे. आता हैद्राबाद येथे या एटीएमची संख्या वाढवण्यात येणार असून येत्या काळात भारतातील विविध राज्यातील शहरांमध्ये अशाप्रकारची ३००० एटीएम सुरू करण्याचा कंपनीचा मानस आहे. ही सर्व प्रक्रिया कॅशलेस असल्याने ग्राहकांचा वेळ आणि श्रम वाचणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. यापूर्वी देशात धान्याचे एटीएम काही ठिकाणी सुरू करण्यात आले होते. पण या सोन्याच्या एटीएमची कल्पना नक्कीच भन्नाट म्हणावी लागेल.