Join us  

दिवाळीसाठी घराचा लूक बदलायचाय? ५ सोप्या गोष्टी; आपलंच घर दिसेल नवं-सुंदर आणि प्रसन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2022 4:55 PM

Home Decoration Idea's For Diwali Celebration : मनाला आनंदी, प्रसन्न वाटावे यासाठी आपण घराची सजावट करु शकतो.

ठळक मुद्देघराचा लूक बदलण्यासाठी आपली नजर चांगली हवी आणि आपल्यामध्ये थोडी कल्पकता हवी. बाजारात एखादा फेरफटका मारला तरी तुम्हाला पारंपरिक दिवे, भिंतीवर लटकवण्याचे दिवे असे काही ना काही नक्कीच मिळू शकेल.

दिवाळी हा दिव्यांचा आणि वर्षातील सर्वात मोठा सण. या निमित्ताने आपण घरासाठी, स्वत:साठी, नातेवाईकांसाठी काही ना काही मोठी खरेदी करतोच. दिवाळीच्या निमित्ताने आपण स्वत:चा आणि घराचाही लूक बदलण्याच्या विचारात असतो. रोज त्याच त्या घरात, एकाच वातावरणात राहून आपल्याला कंटाळा आलेला असतो. अशावेळी मनाला आनंदी, प्रसन्न वाटावे यासाठी आपण घराची सजावट करु शकतो. नेहमीचच घर थोडं फ्रेश आणि वेगळं वाटावं यासाठी काही ना काही करत असतो. पण यंदा घराचा लूक बदलण्याचा तुम्ही विचार करत असाल आणि नेमकं काय करावं हे तुम्हाला सुचत नसेल तर आम्ही ५ सोप्या आयडीया सांगणार आहोत. ज्यामुळे घराची सजावट करणे किंवा घराला थोडा वेगळा लूक देणे तुम्हाला सोपे जाईल (Home Decoration Idea's For Diwali Celebration).  

(Image : Google)

१. आपल्या घरात प्रत्येक खोल्यांमध्ये पडदे असतात. या पडद्यांचा रंग जरी बदलला तरी घराला एका नवा, फ्रेश लूक मिळू शकतो. त्यामुळे जर दिवाळीत काहीच खरेदी करणं जमलं नसेल, तर यावेळी नुसते पडदे बदलून बघा. याबरोबरच हॉलमध्ये असणाऱ्या सोफ्यांवर छानशा रंगीबेरंगी उशाही घेऊ शकता. त्यामुळे घराचा लूक बदलण्यास नक्कीच मदत होईल. 

२. अनेकदा आपल्याला घरातली लाईट सिस्टीम बदलावी असं वाटत असतं पण काही ना काही कारणानी ते राहून जातं. मात्र घराच्या एखाद्या कोपऱ्यात छानसा टांगता दिवा असेल. किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे शांत वाटतील असे नाईट लँप असतील तर नकळत आपल्यालाच  आहे त्या घरात फ्रेश वाटतं. त्यासाठी  बाजारात एखादा फेरफटका मारला तरी तुम्हाला पारंपरिक दिवे, भिंतीवर लटकवण्याचे दिवे असे काही ना काही नक्कीच मिळू शकेल.

 ३.  रोपं ही घर सजवण्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. घरात ठेवता येतील अशी अनेक शोभेची रोपे मिळतात. तुम्हाला झाडा-फुलांची आवड असेल तर रंगीबेरंगी पानांची आणि फुलांची वेगवेगळ्या आकारातील रोपे आपण दिवाळीच्या निमित्ताने घरात आणू शकतो. यासाठी छानशा कलाकुसर केलेल्या कुंड्याही आणता येतील. त्यामुळे घराचे कोपरे नकळत फ्रेश होऊन जातील.

(Image : Google)

४. फ्लॉवरपॉट किंवा फुलदाणी असेल तर त्यातली फुले दर काही काळाने बदलायला हवीत. तसेच ही फुले स्वच्छ राहतील याची काळजी घ्यायला हवी. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे पॉट किंवा शो पीस मिळतात. यातही आपण प्लास्टीकची फुले ठेवण्याऐवजी कागदी किंवा इतर प्रकारची शोभेची फुले ठेऊ शकतो. सणावाराच्या वेळी खरी फुलेही ठेवता येतात. 

५. कॉर्नर पीस किंवा वॉल हॅंगिंग अतिशय छान दिसतात, त्यामुळे घराचा कोपरा सजण्यास मदत होते. एखादवेळी घरच्या घरी टाकाऊपासून टिकाऊ असे केलेले किंवा बाजारात अगदी स्वस्तात मिळणारे शो पीस घराचा लूक बदलण्यास मदत करतात. यासाठी आपली नजर चांगली हवी आणि आपल्यामध्ये थोडी कल्पकता हवी. 

टॅग्स :खरेदीदिवाळी 2021