सोन्याचे दागिने कितीही अंगावर चढवले तरी मोत्यांची शान वेगळीच असते. त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या गर्दीतही मोत्याचे सौंदर्य उठून दिसते. शिवाय पारंपरिक काठपदर साडी जेव्हा नेसली जाते तेव्हा गळ्यात एक सोन्याचे लांब मंगळसूत्र आणि गळ्याला चिटकून असलेली मोत्याची चिंचपेटी किंवा एखादी मोत्याची वज्रटीक असे एवढेच दागिने घातले तरी पुरेसे असतात. याला जाेडून जर मोत्याची ठसठशीत नथ असेल, तर मग मराठमोळा हा साज अधिकच खुलून जातो. यावर्षी दिवाळीला जर अशी काही माेत्याच्या दागदागिन्यांची खरेदी करण्याचा विचार असेल, तर जरूर करा. कारण यावर्षी दिवाळीत पारंपरिक काठपदर साडी आणि मोत्याचे दागिने यांचा खूपच जबरदस्त ट्रेण्ड आहे.
मोत्याचे दागिने खरेदी करताना ......
- मोत्याचे दागिने खरेदी करण्याआधी आपल्याला मोत्याची थोडी फार माहिती असणे गरजेचे आहे. थोडी माहिती असली की मोती खरेदी करताना फसगत होण्याची शक्यता खूप कमी होते. पिवळा आणि पांढरा असे दोन प्रकारचे मोती असतात. यामध्ये कल्चर्ड मोती, बसरा मोती, साऊथ सी, माबे मोती, व्हेनेझुला मोती, फ्रेश वॉटर मोती असे अनेक मोती आढळून येतात.
- रिअल कल्चर्ड मोत्यांपासून जवळपास सगळ्याच प्रकारचे दागदागिने बनविण्यात येतात. या मोत्यांचा आकार गोलाकार असतो आणि रंग चमकदार पांढरा, ऑफव्हाईट किंवा गुलाबी छटा असणारा असतो. या मोत्यांची चमक जास्त काळ टिकून राहते. त्यामुळे आपल्याकडे तयार होणारे बहुतांश मोत्याचे दागिने हे रिअल कल्चर्ड मोत्यांपासून तयार झालेले असतात.
- हाफ पर्ल मोती हे देखील चमकदार मोतिया रंगाचे असतात. एका बाजूने फुगीर आणि दुसऱ्या बाजूने सपाट असा काहीसा यांचा आकार असतो. त्यामुळे अशा प्रकारचे मोती हे अंगठी, नथ, ब्रेसलेट यांच्या घडणावळीत अधिक प्रमाणात वापरले जातात.
- फ्रेश वॉटर पर्ल प्रकारचा मोती हा गोड्या पाण्यात तयार झालेला असतो. या मोत्यांचा आकार गोलाकार असतो. पण हे मोती दिर्घकाळ टिकत नाहीत. त्यामुळे हे मोती कोणत्याही सोने असलेल्या दागिन्यांमध्ये वापरले जात नाहीत. साध्या मोत्यांच्या माळा तयार करण्यासाठी या मोत्यांचा वापर केला जातो.
खरा मोती आणि नकली मोत्यातला फरक
- खरा मोती वजनदार असतो आणि खोटा मोती तुलनेने हलका असतो. जर मोती हवेत फेकला आणि कॅच पकडताना जर त्याचे वजन जाणवले तर तो खरा समजावा, अगदीच हलका वाटला तर खोटा असतो, अशी एक मोती परीक्षा जाणकार मंडळी सांगतात.
- खरा मोती पाण्यावर तरंगत नाही. नकली मोती पाण्यावर तरंगतात आणि त्यांचा रंगही लवकर जातो.
- खरे मोती मॅट फिनिशिंग असल्यासारखे वाटतात, पण त्यांच्यावर एक वेगळीच चमक असते. तर खोटे मोती अतिशय ग्लॉसी आणि चकचकीत दिसतात.
मोत्याच्या दागिन्यांचे प्रकार
१. चिंचपेटी
हा एक अतिशय पारंपरिक आणि ठसठशीत दिसणारा मोत्याचा दागिना. ज्याप्रमाणे सोन्याची ठुशी गळ्यालगत असते, त्याचप्रमाणे चिंचपेटीदेखील गळ्यालगत घालतात. पेशवेकालीन किंवा शिवरायांच्या काळावर आधारित कोणतेही चित्रपट पाहिले, तर त्यामध्ये स्त्रियांच्या अंगावर हा दागिना हमखास दिसणारच. एक मोठे मंगळसूत्र आणि गळ्यात चिंचपेटी असे एवढेच दागिने घातले तरी तुम्ही चारचौघात नक्कीच उठून दिसाल.
२. नथ
महाराष्ट्रीयन पारंपरिक वेशभुषा नथीशिवाय अपूर्णच. आजकाल सोन्याचे मणी असणारी नथ देखील बाजारात मिळते. पण मोत्यांची नथ मात्र नेहमीच भाव खाऊन जाणारी ठरते. नथीचा तोराच असा भारी असतो की हा एकच दागिना गळ्यातल्या कित्येक दागिन्यांवर भारी पडतो.
३. तन्मणी
पेशवाई दागिना म्हणून तन्मणीला ओळखले जाते. मोत्यांमध्ये गुंफलेला हा दागिना गळ्यात घालायचा असतो. दोन्ही बाजूला मोत्यांची दोन, तीन किंवा चार पदरी सर आणि मध्यभागी पदक अशी तन्मणीची रचना असते. तन्मणीच्या पदकाला तन्मणीचं खोड म्हणून ओळखलं जातं. या पदकाला वेगवेगळ्या रंगाचे पाच खडे, पाच मोती लावून त्यांची विशिष्ट रचना केलेली असते. चिंचपेटीच्या खाली तन्मणी घातला जातो.
४. बुगडी
नथीप्रमाणेच बुगडी हा दागिनादेखील महाराष्ट्राची ओळख आहे. आजकार वेगवेगळ्या खड्यांच्या, सोन्याच्या बुगड्या मिळत असल्या तरी पारंपरिक बुगडी ही सोन्यात घडवलेल्या मोत्यांपासूनच तयार करण्यात येते. कानात सगळ्यात वरच्या बाजूला बुगडी घालण्यात येते. सध्या बुगड्यांची खूपच फॅशन आली आहे.
५. चोकर
तन्मणी, चिंचपेटी, मोत्याची सर या मोत्यांच्या पारंपरिक दागिन्यांव्यतिरिक्त मोत्याच्या चोकरचे वेगवेगळे प्रकार सध्या बाजारात उपलब्ध आहेत. मोत्यांचे दागिने बऱ्याचदा पारंपरिक वेशभुषा केल्यावरच घालता येतात. पण मोत्याच्या चोकरची रचना अशा पद्धतीची असते, की ते वेस्टर्न ड्रेसवरही अगदी सहजपणे मॅच होऊन जातात. त्यामुळे चोकरचीही सध्या खूपच क्रेझ दिसून येते.