कोरोना, लॉकडाऊन यानंतर घरच्याघरी व्यायाम करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जीममध्ये जाणं सध्यादेखील कोरोनामुळे अनेकांना धोकादायक वाटतं.. त्यामुळे घरच्या घरी आपल्या सोयीनुसार योगा करणारे खूप जणं आहेत. अनेक जणांनी ऑनलाईन योगा क्लास लावला आहे. त्यामुळे त्यांना योगा मॅटची गरज नेहमीच भासते. योगा मॅट काही आपण वारंवार खरेदी करत नाही. त्यामुळे नेमकी ती कशी असावी, योगा मॅट खरेदी करताना कोणत्या गोष्टी तपासाव्या, हे अनेक जणांना नेमकं समजत नाही. त्यामुळे मग मॅटची निवड चुकीची होते आणि मग ती योगासाठी निरूपयोगी ठरते. असं होऊ नये, म्हणून योगा मॅट खरेदी करताना या काही गोष्टी तपासून घ्या.
योगा मॅट खरेदी करताना या काही गोष्टी तपासून घ्या...
१. मॅटची लांबी- योगा मॅट खूप लांबही नको आणि खूप शाॅर्टही नको. सहा- साडेसहा फूट लांबीची योगा मॅट घेण्यास प्राधान्य द्यावे.
२. योगामॅटची जाडी- योगा मॅटचा थिकनेस म्हणजेच तिची जाडी किती आहे, हे तपासणे आवश्यक आहे. काही योगा मॅट खूप जास्त पातळ असतात. पण अशा योगा मॅटमध्ये शॉक ॲबसॉर्बंट नसल्याने जॉईंट्ससाठी त्या अजिबातच आरामदायी नसतात. अशा खूप पातळ मॅट वापरून गुडघेदुखी किंवा इतर काही जाॅईंट्स दुखण्याचा त्रासही होऊ शकतो.
३. सटकणारी मॅट नकाे
योगा मॅट खरेदी करताना तिची ग्रीप कशी आहे, हे चांगले तपासून घ्या. कारण व्यायाम करताना मॅट जमिनीवरून सटकली किंवा पाय मॅटवरून घसरला तर अपघात होऊन दुखापत होण्याची भीती असते. त्यामुळे योगा मॅट सटकणारी नको. तिला व्यवस्थित ग्रीप असायला पाहिजे.
४. घाम शोषून घेणारी
योगा करताना, व्यायाम करताना निश्चितच घाम येणार. त्यामुळे आपली योगा मॅटही काही प्रमाणात स्वेट ॲबसॉर्बंट असायला हवी.
५. इकोफ्रेंडली मॅट
आता पर्यावरणाच्या वाढत्या समस्या पाहता प्रत्येक गोष्ट पर्यावरण पुरक असण्याची गरज आहे. त्यामुळे योगा मॅट खरेदी करताना ती देखील पर्यावरणपुरक असणे गरजेचे आहे. पर्यावरण पुरक योगा मॅटमध्ये खूप जास्त केमिकल्स नसतात. त्यामुळे त्या आपल्या आरोग्यासाठीही उत्तम असतात.
योगा मॅटचे प्रकार
१. पीव्हीसी म्हणजेच पॉली व्हिनाईल क्लोराईड मॅट. या प्रकारच्या मॅट स्वस्त असतात. पण या मॅट बऱ्याच विषारी केमिकलने बनलेल्या असतात. त्यामुळे त्या अजिबातच आरोग्यदायी नसतात. त्यात वापरलेल्या केमिक्लसमुळे रॅश येणे किंवा इतर त्वचा विकार होऊ शकतात. शिवाय या मॅट खूप पातळ असतात. त्यामुळे ग्रीप चांगली असूनही त्या जॉईंट्ससाठी चांगल्या नाहीत. शिवाय विषारी केमिकल्समुळे या मॅट अजिबातच इकोफ्रेंडली नाहीत.
२. पॉलीमर एन्व्हायर्मेंटल फ्रेंडली रेझिन मॅट हा आणखी एक प्रकार योगा मॅटमध्ये आढळून येतो. या मॅट पर्यावरणपुरक आहेत. त्यामुळे त्या आरोग्यासाठ देखील चांगल्या आहेत. पण थिकनेस आणि ग्रीप या दोन गोष्टीत या मॅट थोड्या कमी पडतात.
३. थर्मोप्लॅस्टिक इलॅस्टिमर मॅट या फोमपासून बनलेल्या आहेत. त्यामुळे त्या फोम मॅट म्हणूनही ओळखल्या जातात. या मॅटचा थिकनेस जवळपास १० एमएम म्हणजे खूपच चांगला आहे. त्यामुळे जॉईंट्ससाठी या मॅटवर व्यायाम करणे अधिक आरामदायी वाटते. या मॅट इकोफ्रेंडली आहेत. या मॅट रोल करणे आणि त्या कॅरी करणे जरा अवघड आहे. पण घरच्याघरीच व्यायाम करणार असाल किंवा ही मॅट तुमच्या योगा क्लासमध्येच ठेवणार असाल, तर काही अडचण नाही. शिवाय या मॅट टिकाऊ असून २ ते ३ वर्ष सहज चालतात. १५००- २००० रूपये या दरम्यान या मॅट मिळतात.
या मॅटचाही विचार करू शकता...
ज्यूट, कॉटन, ज्यूट ॲण्ड रबर, मायक्रो फायबर या प्रकारांतही योगा मॅट उपलब्ध आहेत. या मॅटची किंमत २ ते ५ हजार रूपये किंवा यापेक्षाही जास्त आहे.