Join us  

दिवाळी : धडाधड ऑनलाइन शॉपिंग करताय पण लक्षात ठेवा ४ गोष्टी, दिवाळीत डोक्याला ताप नको..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2024 2:58 PM

How to take care while online Diwali shopping : खरेदीचा आनंद होण्याऐवजी डोक्याला ताप होऊ नये म्हणून..

दिवाळी जवळ आली की आपल्याला वेध लागतात ते खरेदीचे. स्वत:साठी, कुटुंबातील सगळ्यांसाठी आणि द्यायला-घ्यायलाही आपण कपड्यांची खरेदी करतो. आता बाजारात जाऊन कपडे खरेदी करणे काही प्रमाणात मागे पडले आणि बहुतांश लोक ऑनलाइन खरेदी करण्याला प्राधान्य द्यायला लागले.  कोरोनापासून तर बाजारात जाऊन खरेदी करणे कमी झाले. घरबसल्या एका क्लिकवर आपल्या आवडीच्या वस्तू सहज आपल्या घरी येतात. अशावेळी बाजारात जाऊन एनर्जी खर्च करायची कशाला ही मानसिकता वाढली  (How to take care while online Diwali shopping). 

दिवाळीसारख्या सणाला तर आपल्यामागे खूप कामं असतात. एकीकडे घराची साफसफाई, फराळाची गडबड, येणार-जाणार, एखादी ट्रिप या सगळ्यात आपल्याला खरेदी करायला वेळ मिळतोच असे नाही. अशावेळी झटपट ऑनलाइन खरेदी केली तर आपलं काम नक्कीच सोपं होतं. पण ऑनलाइन खरेदी करताना काही गोष्टी अवश्य लक्षात घ्यायला हव्यात. नाहीतर खरेदीचा आनंद होण्याऐवजी डोक्याला ताप होण्याचीच शक्यता जास्त असते. या गोष्टी कोणत्या ते पाहूया...

(Image : Google)

१. रिटर्न पॉलिसी

आपण एखादा ड्रेस, साडी किंवा कोणतेही कपडे विकत घेतो तेव्हा त्याची रिटर्न पॉलिसी काय आहे हे नीट तपासायला हवे. कारण बरेचदा कपडे आल्यानंतर त्याचा रंग, साईज, डिझाईन ही चित्रात दाखवल्यापेक्षा वेगळी असण्याची शक्यता असते. अशावेळी आपल्याला खरेदी केलेली गोष्ट परत पाठवावी लागू शकते. हा कालावधी किमान ३ ते ५ दिवसांचा असावा. जेणेकरुन आपण हे कपडे पाहून, ट्राय करुन मग रिटर्न रिक्वेस्ट देऊ शकतो. त्यामुळे आपल्याही हातात बऱ्यापैकी वेळ राहतो आणि कंपनीचेही नुकसान होत नाही. 

२. कापडाचा पोत

अनेकदा आपण वेगवेगळ्या साईटसवरुन कपड्यांची खरेदी करतो. घाईघाईत आपण कपड्यांची डीझाईन पाहतो पण त्याचे कापड नेमके कोणते आहे हे वाचायला विसरतो. आपल्याला कॉटन हवे असेल आणि सिल्क किंवा रेऑन कापडाचे कपडे आले तर मात्र आपली चिडचिड व्हायची शक्यता असते. पण वेळीच आपण घेत असलेल्या कपड्यांचे कापड कोणते आहे हे नीट वाचले असेल तर मात्र कपडे घरी आल्यावर आपल्याला तितकी अडचण येत नाही.

(Image : Google)

३. साईट ऑथेंटीक असावी 

आपण सगळेच हल्ली इन्स्टाग्राम, फेसबुक किंवा अन्यही सोशल मीडिया माध्यमांवर असतो. याठिकाणी खरेदीसाठी सतत काही ना काही जाहिराती येत असतात. आपणही सोशल मीडिया स्क्रोल करण्याच्या नादात पटकन काहीतरी खरेदी करतो. मात्र घरी आल्यावर त्याची गुणवत्ता चांगली नसल्याचे आपल्या लक्षात येते. खरेदी केलेली गोष्ट परत पाठवण्यासाठी आपण पुन्हा ती वेबसाइट किंवा डिलरचा शोध घेतो मात्र आपल्याला ते सापडत नाही. असे होऊ नये म्हणून आपण खरेदी करत असलेली गोष्ट कोणत्या साईटवरुन, कोणत्या डिलरकडून खरेदी करतो ते तपासून पाहायला हवे. 

४. व्यवहार काळजीपूर्वक करायला हवा  

आपण अनेकदा पैसे आधीच ऑनलाइन पे करतो. ते करणे सोपे असल्याने आपण फारसा विचार न करता पेमेंट करुन टाकतो. पण शक्यतो पार्सल घरी आल्यावर पैसे दिलेले जास्त चांगले. हल्ली रोखीने व्यवहार करण्याची आवश्यकता नसते. डिलिव्हरी करणाऱ्यांकडेही पेमेंटसाठीचा कोड उपलब्ध असतो त्यावरुन आपण सहज पेमेंट करु शकतो. कारण पेमेंट केले आणि डिलिव्हरीला खूपच वेळ लागला. डिलिव्हरीशी निगडीत आणखी काही प्रॉब्लेम झाला असं काही ना काही होऊ शकतं. म्हणून व्यवहार करताना काळजी घ्यायला हवी.  

टॅग्स :खरेदीऑनलाइनदिवाळी 2023