दिवाळी म्हटली की फराळाचे पदार्थ, साफसफाई, सजावट यांच्याबरोबरच येते ती म्हणजे खरेदी. दिवाळीच्या निमित्ताने आपण घरातील सजावटीच्या वस्तू, किचनमधील काही गोष्टी आणि त्यासोबतच महत्त्वाचे म्हणजे कपड्यांची खरेदी करतो. घरातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच दिवाळीच्या निमित्ताने कपडे, दागिने यांची खरेदी करतात. बहुतांशवेळा ही खरेदी करण्यामध्ये स्त्रिया अग्रस्थानी असतात. अनेकींना तर खरेदीची इतकी आवड असते की त्या पूर्ण दुकानच घेऊन येतील की काय असेही आपल्याला वाटते. पण खरेदीला गेलो की गोंधळ होऊ नये, खूप वेळ आणि प्रमाणाबाहेर पैसे जाऊ नयेत यासाठी थोडं नियोजन करायला हवं. म्हणजे नेमकं काय करायचं याबाबत (Important tips for Diwali shopping)...
१. कपड्यांचा रंग ठरवताना
बरेचदा आपण दुकानात साडी किंवा ड्रेस बघायला सुरुवात करतो. आपल्या आवडीचा रंग किंवा डिझाईन असलेले कपडे बाजूला काढतो. त्यातून एखादा घ्यायचा नक्की करतो. पण घरी आल्यावर मात्र आपल्याकडे सेम तसाच रंग असल्याचे आपल्या लक्षात येते. असे होऊ नये तर खरेदीला जाताना आपल्याकडे कोणते रंग आहेत याचा एक आढाव घेऊन जायला हवा. काही वेळा वरच्या बाजूला ठेवलेले कपडे, साड्या लक्षात येत नाहीत पण नंतर लक्षात येते आणि नव्याने घेतलेला ड्रेस किंवा साडी परत बदलायला जावे लागते.
२. नेमकी यादी असावी
आपण खरेदी करायला गेलो एक आणि घेतलं दुसरंच असं बरेचदा होतं. यामध्ये आपलं बजेट तर कोलमडतंच पण मुख्य जी खरेदी करायची असते ती बाजूला राहते आणि मग आपण इतरच काहीतरी घेत राहतो. पण असं होऊ नये तर घरातील प्रत्येकाला काय काय घ्यायचं आहे याची एक यादी केली आणि मगच बाजारात गेलो तर आपल्याला ज्या हव्या आहेत त्या गोष्टी आपण झटपट घेऊ शकतो. यामुळे वेळही वाचतो आणि पैसेही वाचतात.
३. आधी बजेट ठरवावं
अनेकदा आपण बाजारात जातो आणि खरेदी करायला सुरुवात करतो. पण आपल्या डोक्यात प्रत्येक गोष्टीसाठी बजेट ठरलेलं असतंच असं नाही. किंवा दुकानदाराने दाखवलेली दुसरी गोष्ट आपल्याला जास्त आवडते जी जास्त किमतीची असण्याची शक्यता असते. मग आपलं एकूण दिवाळीसाठी असणारं सगळंच बजेट कोलमडतं. कारण आपल्याला बहिण-भावंडं, आई-वडील, लहान मुलं अशांना द्यायलाही काही ना काही घ्यायचं असतं. पण सुरुवातीलाच बजेटच्या बाहेर गोष्टी गेल्याने पुढच्या खरेदीसाठी पुरेसे बजेट राहत नाही.