Join us  

दिवाळीच्या निमित्ताने नवीन प्रेशर कुकर खरेदी करताय? न चुकता तपासा ४ गोष्टी, खरेदी होईल मनासारखी-टिकाऊ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2023 10:18 AM

Important Tips while buying new prassure Cooker : कुकरही दिसायला आकर्षक पण तितकाच गुणवत्तेने चांगला असायला हवा.

प्रेशर कुकर ही भारतीय किचनमधील एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. स्वयंपाक झटपट होण्यासाठी बऱ्याच वर्षांपासून या कुकरचा वापर करण्यात येत आहे. यात केवळ भात-वरण नाही तर भाजी, ढोकळा, केक किंवा इतरही अनेक पदार्थ करण्यासाठी घराघरांत नियमित प्रेशर कुकरचा वापर होतो. प्रेशर कुकर म्हणजे स्वयंपाकघरातील बॉम्ब असे आपण अनेकदा ऐकतो. असे का म्हटले जाते, तर प्रेशर कुकरमुळे होणारे अपघात हे अनेकदा जीवावर बेतणारे ठरु शकतात. त्यामुळे तो वापरताना योग्य ती काळजी घ्यायला हवी (Important Tips while buying new prassure Cooker). 

भारतात साधारणपणे दोन प्रकारचे प्रेशर कुकर वापरले जातात. एक आतल्या झाकणाचा आणि दुसरा बाहेरच्या झाकणाचा. बाजारात १ लीटरपासून १० ते १२ लीटरपर्यंत प्रेशर कुकर उपलब्ध असले तरी २, ३ आणि ५ लीटरचा कुकर दैनंदिन वापरासाठी खरेदी केला जातो. आपण घरातील इतर भांडी ज्याप्रमाणे दिसायला आकर्षक अशी घेतो त्याचप्रमाणे कुकरही दिसायला आकर्षक पण तितकाच गुणवत्तेने चांगला असायला हवा. म्हणूनच प्रेशर कुकर खरेदी करताना कोणत्या गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष द्यायला हवे याविषयी समजून घेणे महत्त्वाचे आहे. 

१. वॉल्व तपासणे सगळ्यात महत्त्वाचे 

कुकरमधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे वॉल्व. हा वॉल्व झाकणाच्या आतल्या बाजूला असतो. कुकरमधील तापमान १३० डिग्रीहून अधिक झाले तर या वॉल्वमधील रबरी भाग वितळतो आणि कुकर खराब होतो. मग हा वॉल्व बदलावा लागतो. अनेकदा आपण डाळ किंवा तत्सम पदार्थ थेट कुकरमध्ये शिजवण्यासाठी लावतो आणि या डाळीचे किंवा अन्य पदार्थांचे कण या वॉल्वमध्ये बसूनही हा वॉल्व खराब होतो. तेव्हा कुकर घेताना त्याचा वॉल्व घट्ट आणि चांगल्या प्रतीचा आहे ना हे पाहून कुकर खरेदी करावा. तसेच याची आणखी एक लहान चाचणी करता येऊ शकते. कुकरचे झाकण उलटे करुन त्यात पाणी घालावे. पाणी बाहेर आले नाही तर वॉल्व चांगला आहे असे आपण नक्की म्हणू शकतो. 

२. आकार आणि झाकणाचा प्रकार लक्षात घ्या

आपली गरज किती, आपण रोजच्या वापराला घेणार की कधी तर पाहुणे आल्यावर जास्तीचा स्वयंपाक करण्यासाठी मोठा कुकर घेणार ठरवून घ्या. त्यानुसार कुकर किती लीटरचा घ्यायचा, याचा अंदाज येतो. रोजच्या वापरासाठी घेणार असाल तर बाहेरचे झाकण असणारा घ्या. आतले झाकण असणारे कुकरचे डबे परफेक्ट मापाचे लागतात. कधी कधी रोजच्या गडबडीत भांड्यांची अदलाबदल होते. मग त्यात आत बसणारे डबे नसतील, तर पंचाईत होते. तशी अडचण बाहेरचे झाकण असणाऱ्या कुकरची होत नाही. त्यात वेगवेगळ्या आकाराचे डबे ॲडजस्ट होऊन जातात.

३. अशी तपासा शिट्टी 

 कुकरची शिट्टी ही झाकणात घट्ट बसत असली तरीही ती थोडी हलेल असे बघावे. ती योग्य पद्धतीने हलत असेल तरच कुकर लावलेला असताना त्यातील प्रेशर शिट्टीच्या माध्यमातून बाहेर येऊ शकेल. अन्यथा ही शिट्टी जास्त घट्ट असेल तर शिट्टी होणार नाही आणि आपल्याला कुकर होतो की नाही ते समजणार नाही. तसेच हवेचा दाब बाहेर पडला नाही तर अपघात घडू शकेल. त्यामुळे शिट्टी ज्यात घालतो ती नळी वरच्या बाजुला मोठी आणि खालच्या बाजूला निमूळती असेल असे पाहावे. 

(Image : Google )

४. कुकरचा बेस तपासून पाहा 

कुकरच्या खालच्या बाजूला अनेकदा एकप्रकारची जाळीसारखी डिझाइन असते. ही इंडक्शनसाठी असली तरीही या जाळीमुळे कुकर योग्य पद्धतीने तापण्यास मदत होते आणि कुकरचे मेटल कुकर कितीही वर्षे वापरला तरी वाकत नाही. ही जाळी कुकरच्या खालच्या बाजूला नसेल तर कालांतराने कुकरचा पृष्ठभाग वाकतो आणि अशाप्रकारे वाकलेला कुकर वापरणे योग्य नसते. त्यामुळे कुकर खरेदी करताना खाली हे जाळीसारखे डिझाइन आहे ना हे तपासावे.

टॅग्स :दिवाळी 2023खरेदी