घर सजवण्यासाठी हल्ली इनडोअर प्लांटसचा प्रामुख्याने विचार केला जातो. घरात ऑक्सिजनचे प्रमाण चांगले राहावे, बाहेरुन आले की फ्रेश वाटावे आणि घराचा नॅचरल लूक जपला जावा यासाठी अशाप्रकारचे प्लांटस घरोघरी लावले जातात. आता इनडोअर प्लांटस म्हटल्यावर ते लावण्यासाठीच्या कुंड्या किंवा पॉट्सही तसेच डिझायनर आणि थोडे हटके असतील तर घराचा लूक बदलून जाण्यास मदत होते. यामध्ये प्लास्टीकपासून ते मातीचे, सिरॅमिकचे, काचेचे असे बरेच प्रकार बाजारात आणि ऑनलाईनही उपलब्ध असतात. इनडोअर रोपं ही आकाराने लहान, दिसायला आकर्षक आणि घराची शोभा वाढवणारी असतात. त्यासाठी तशाच पद्धतीचे थोडे वेगळ्या पॅटर्नचे, नक्षीचे पॉट्स असतील तर हॉल किंवा बेडरुमचा लूक बदलण्यास मदत होते. दुकानांमध्ये तर असे पॉट्स मिळतातच पण ऑनलाईनही अगदी रिझनेबल किंमतीत हे पॉटस सहज उपलब्ध असतात. त्यामुळे तुम्हीही घराचा लूक थोडा बदलण्याचा विचार करत असाल तर पाहा पॉट खरेदीचे एक से एक पर्याय (Indoor Plant pots shopping tips)...
१. प्लेन रंगबिरंगी पॉट्स
विशेष डिझाईन नसलेले पण आकर्षक रंगांचे बरणीसारखे असे हे पॉट्स घरातील कोणत्याही खोलीत फार छान दिसतात. यामध्ये इनडोअर प्लांटस लावली की घर एकदम जिवंत असल्यासारखे वाटायला लागते. त्यामुळे खूप डिझायनर काही करायचे नसेल तर असे सिंपल पण सोबर आणि मध्यम आकाराचे पॉट्स तुम्ही खरेदी करु शकता.
२. प्राणी किंवा स्टॅच्यूचे पॉट्स
हत्ती, घोडा किंवा अगदी बुद्ध यांच्या आकारातील हे पांढऱ्या रंगातील पॉट्सही घरात फार छान दिसतात. या पांढऱ्या रंगाच्या पॉटमध्ये हिरवीगार रोपं अगदी खुलून दिसतात आणि घराचा लूकच बदलून जातो. अगदी २०० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत अशाप्रकारचे विविध आकाराचे पॉट्स ऑनलाईन उपलब्ध आहेत.
३. डिझायनर शो पिस पॉट
आपण शो पिस आणि पॉट असे दोन्ही मिळून एकच काहीतरी पाहत असू तर वेगवेगळ्या थिमच्या पॉटचा सेटच ऑनलाईन मिळतो. यामध्ये जंगल थीम, बाहुलीची थिम, प्राण्यांची थिम अशा विविध थिम उपलब्ध असल्याने आपल्या आवडीनुसार आपण लहान लहान आकाराचे हे ४ पॉट्स एकत्रच घेऊ शकतो.
४. नक्षीकाम केलेला पॉट
थोड्या मोठ्या आकाराचा पण नक्षीकाम केलेला असा काचेचा पॉट इनडोअर प्लांटसाठी फारच सुरेख दिसतो. यामुळे घराची शोभा वाढण्यास निश्चितच मदत होते. हॉलमधील कॉर्नर सजवण्यासाठी आपण अशाप्रकारचे पॉट नक्की खरेदी करु शकतो.