प्रियांका जोशी
ऑफिस मधून संध्याकाळी घरी परतताना, अरुणानी पटकन गाडी थांबवली आणि रस्ता ओलांडून भाजीवाल्यांकडून भाजी विकत घेतली आणि "अहो दादा! एक कॅरी बॅग द्याना" असे ओरडली. भाजीवाला म्हणाला, "अहो ताई, प्लास्टिक ची पिशवी ठेवण्याची परवानगी नाही आम्हाला आणि जाड पिशवी परवडत नाही, तुम्ही शिकले सवरलेली माणसं ना? जेव्हा तुम्हीच नियम पाळत नाही तर मग प्लास्टिक प्रदूषणाच्या नावाने का ओरडता?" अरुणा सारखेच आपल्या समाजात कित्येक लोक आहेत जे जाणुन बुजून प्लास्टिकचा वापर करतात. फक्त १०-१५ वर्ष पूर्वी जर आपण अपल्या आयुच्यात डोकावून पाहिलं तर प्लास्टिकचे प्रमाण किती कमी होते. परंतु आज प्लास्टिक आपल्या आयुष्याचा एक भाग बनला आहे. जिथे नजर फिरेल तेथे प्लास्टिक दिसेल. रस्त्यावर, डोंगरांवर, पाण्यात, दुकानात आणि अगदी भरभरून आपल्या घरातही. मग अपण हे प्लॅस्टिक कसं कमी करु शकतो ह्याची थोडी काळजी घेतली पाहिजे. आज ३ जुलै, आंतरराष्ट्रीय प्लास्टिक कॅरी बॅग फ्री दिवस आहे. आज आपण सर्वांनीच घरातला प्लास्टिक वापर कमी करण्यासाठी काही गोष्टी शिकून कृतीत उतरवल्या पाहिजेत. (International Plastic Bag Free Day 2023).
जगभरात दर वर्षी 5 लाख कोटी प्लास्टिक कॅरी बॅग वापरण्यात येतात. प्लास्टिक एक गरज नसून एक सवय झाली आहे आणि ही सवय सोयीच्या नावाखाली आपल्यावर लादली गेली आहे. प्लास्टिक गेल्या दोन दशकांत एक मोठी आरोग्य व पर्यावरण समस्या बनली आहे. प्लास्टिक हे जीवाश्म इंधनापासून बनते व त्याच्या उत्पादन प्रक्रियेत खूप मोठ्या प्रमाणात जल व वायू प्रदूषण होते. प्लास्टिक नॉन बायोडेग्रेडेबल असल्यामुळे कुजत नाही व जमिनीतील सुपीकता नष्ट करते. प्लास्टिक बनविण्याच्या प्रक्रियेत हजारो हानीकारक रसायने वापरली जातात जेणे करून कॅन्सर, नपुंसकता, डायबिटीस, थायरॉईडसारखे आजार होण्याची शक्यता वाढते.
प्लास्टिक आपण आपल्या आयुष्यात कसं कमी करू शकतो?
१. सर्वात प्रथम हा प्रण घेऊ की बाहेर जाताना आपण कायम कापडी पिशवी सोबत ठेवलीच पाहिजे. आपण नियमितपणे आपल्या स्कूटर किवा गाडीच्या डीक्कीतही कापडी पिशवी ठेऊ शकतो.
२. घरातील काही प्लास्टिकच्या वस्तू ज्या आपल्याला त्वरीत कमी करता येतील त्या म्हणजे आपले प्लास्टिकचे टूथब्रश व कंगवे, याऐवजी आपण लाकडी वस्तू वापरू शकतो.
३. बाहेर जाताना नेहमी स्वतःची पाण्याची बाटली सोबत घेऊन आपण आपले पैसे व प्लास्टिकचा कचरा दोन्ही वाचवू शकतो. स्वयंपाक घरात स्टील, काच किंवा मातीच्या बरण्यांचा वापर केल्यास ते आकर्षक ही वाटते व त्यात धान्य /अन्न जास्त निरोगी राहण्यास मदत होते.
४. घरी पाहुणे आल्यास किंव्हा पार्टी व काही इतर कार्यक्रम असल्यास युझ अँड थ्रो प्लेट, वाट्या, चमचे वापरण्यापेक्षा स्टील किंव्हा काचेचे पुन्हा वापरण्यायोग्य भांडी वापरल्यास प्लास्टिकचा कचरा आपण टाळू शकतो. कागदाचे आणि लाकडाचे पर्याय वापरणे हे पर्याप्त उपाय होऊ शकत नाहीत कारण या प्रक्रियेत असंख्य झाडे कापली जातात. त्यामुळे पुन्हा वापरण्यायोग्य वस्तूच एकमात्र उत्तर आहे.
५. प्लास्टिकचे डब्बे (टिफीन), हे सर्वात जास्त आरोग्याची हानी करतात, कारण गरम जेवण प्लास्टिकच्या संपर्कात येताच जेवणात अतिशय हानिकारक रसायन सोडले जातात, जेणेकरून कर्करोग व इतर जीवघेणे अजार होऊ शकतात. त्यामुळे आपल्या मुलांचे शाळेचे टिफीन आपल्या ऑफिसचे डब्बे स्टील किंवा काचेचे वापरणे अधिक योग्य आहे.
६. तसेच बाजारात पॅकेटमधले धान्य घेण्याऐवजी जर खुले धान्य घेतले तर ते स्वस्त आणि पौष्टिकही असतात व त्याचप्रमाणे प्लास्टिक पॅकेटचा कचराही कमी होऊ शकतो.
७. ओला व सुका कचरा टाकण्या करीता आपण कायम दोन प्लास्टिक पिशव्या रोज फकुन देतो. इथे सुक्या कचऱ्याकरीता जर जुने वर्तमानपत्र वापरले तर लगेच अर्धा प्लास्टिकचा कचरा कमी होईल.
८. स्वयंपाक घरापासून आता आपण टॉयलेट कडे वळूयात. फिनायल व एसिडच्या बाटल्यांमुळे दर महिन्याअखेरीस प्लास्टिकचा ढीग उभा होतो. आज काल बऱ्याच कंपन्यानी पुन्हा वापरण्यायोग्य सिस्टीम सुरू केली आहे. जेथे सबस्क्रिप्शन पद्धतीने काम केले जाते. जेणे करून दर महिन्याला वापरलेले बाटल्या न्यायच्या आणि त्यात पुन्हा सामान भरून तुम्हाला आणून देतात.
९. साबण घेताना नेहमी प्लास्टिक कव्हर नसलेला साबण आपण निवडू शकतो व शाम्पू बाटलीच्या ऐवजी शाम्पू बार चा उपयोग करू शकतो. टूथपेस्टच्या ट्यूबऐवजी आपण डेंटल टॅबलेट सुद्धा वापरून पाहू शकतो.
१०. याशिवाय दररोज करोडो सॅनिटरी पॅड प्लास्टिक प्रदूषणास कारणीभूत ठरतात, शिवाय या पॅडमध्ये स्त्री आरोग्यास हानिकारक असलेल्या रसायनांचा उपयोग केला जातो. याऐवजी आपण इकोफ्रेंडली पॅड किंव्हा मेंस्ट्रुअल कप वापरून, कमीत कमी कचरा व आरोग्याची सुरक्षा करु शकतो.
वरील सवयी जर जोपासाल, तर आपल्या घरात प्लास्टिक काही प्रमाणात नक्कीच कमी करू शकाल, पण मूळ मुद्दा आहे, ह्याने प्लास्टिक प्रदूषण कमी होईल का? आज बाजारात गेल्यास प्रत्येक वस्तू प्लास्टिक पॅकेटमध्येच उपलब्ध असते, आपण जरी प्लॅस्टिकचा वापर कमी केला तर ह्या मोठ्या कंपन्या त्याचा वापर कमी करणार का? शिवाय जर प्लॅस्टिकचे उत्पादनच कमी केले तर मूळ प्लास्टिक प्रदूषणची समास्याच आपोआप कमी होईल.
(लेखिका परिसर या सामाजिक संस्थेमध्ये प्रोग्राम असोसिएट)
वेबसाइट - https://parisar.org/