पी. व्ही. सुब्रमण्यम
उद्या गुढीपाडवा. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. गुढीपाडव्याला मुहूर्ताचं सोनं अनेकजण खरेदी करतात. सध्या सोन्याचा भाव चढा असला आणि आर्थिक पातळीवर अनेकांची ओढाताण होत असली तरी शास्त्र म्हणूनही काहीजण अर्धा ग्रॅॅम तरी सोने खरेदी करतात. महिला अनेकदा सोने खरेदीचा आग्रह करतात. मात्र, केवळ शास्त्र आणि रीत म्हणून आजच्या काळात सोने खरेदी करावी का? आणि सोने खरेदी म्हणजे सोन्याचे वळे विकत घेणे योग्य की दागिने? मुळात दागिने खरेदी करणं म्हणजे गुंतवणूक की खर्च?असे अनेक प्रश्न आहेत.
हाती पैसा असेल तर हौस म्हणून केलेल्या खरेदीची गोष्ट वेगळी. मात्र, शास्त्र म्हणून रीत म्हणून किंवा भविष्यातली गुंतवणूक म्हणून अर्धा ग्रॅमपासून किरकोळ खरेदी करणाऱ्यांनी काय लक्षात ठेवायला हवं.
१. आजच्या काळातही सोने ही एक उपयुक्त वस्तू आहे. ती युनिव्हर्सल करन्सी आहे.
२. सोने तारण ठेवणे, त्यावर कर्ज घेणे हे आजच्या काळातही तुलनेने सोपे आहे. गरजेच्या वेळी पैसा उभा करता येतो.
३. भारतीय लोक सोने खरेदी करतच राहतात. सोन्यावर भारतीय लोकांचा परंपरेने विश्वास आहे, ते सोने खरेदी करतातच. बहुधा जगभरच्या माणसांना जे सोन्याविषयी माहिती नाही ते भारतीयांना माहिती असावं.
४. सोन्याच्या किमतीही कमी-जास्त होतात. बाकी चलनाच्या किमतींत चढ-उतार झाला की, सोन्याच्या किमतीतही चढ-उतार दिसतात.
५. तुमच्या बाकी मालमत्तेच्या तुलनेत, बाकी गुंतवणुकीच्या तुलनेत, अर्थव्यवस्थेत होणाऱ्या बदलांच्या तुलनेत सोने किती टक्के फायदा मिळवून देईल हे प्रश्न म्हणजे केवळ चर्चा, लोक भरवशाने सोने खरेदी करतातच.
६. महागाईचा दर आणि सोने हे गणित फायद्याचे ठरू शकते, पण तरी धोक्याचा इशारा, कधीकधी पायाखालची जमीनही सरकू शकते.
(लेखक आर्थिक सल्लागार आहेत.)