साड्या आवडतात, पण पारंपरिक पोत. हातमाग, साड्यांची भारतीय परंपरा, त्यांचा इतिहास, त्यातलं सौंदर्य हे सारं विलक्षण सुंदर आहे. सणवार साजरे करताना हे सारं सोबत असावं आणि खरेदीत आणि सोहळ्यात या साड्यांना स्थान देताना त्या विणकरांचीही आठवण ठेवली पाहिजे. त्यासाठी आपण काय करु शकतो, असा विचार ‘व्होकल फॉर लोकल’ म्हणत निकायी फॅशन स्टुडियोच्या संचालक व फॅशन डिझायनर, मृण्मयी अवचट यांनी एक उपक्रम सुरु केला. हस्तकला उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी व मोठ्या समाजघटकांपर्यंत ते पोहोचण्यासाठी सेलिब्रिटीसह त्या सहयोगी फोटोशूट करत आहेत. हातमाग विणकर, हॅण्ड एम्ब्रॉयडरी कारागीर, हॅण्ड ब्लॉक प्रिंटर आणि इतर पारंपारिक कारागीरांना मदत करण्यासाठी हा उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे.
नवरात्री स्पेशल ९ लुक्स, ९ सेलिब्रीटी, ९ वेगवेगळ्या पारंपरिक साड्या व त्यांच्या बद्दलची माहिती याद्वारे सर्वदूर पोहचवण्याचा त्यांचा प्रयत्न त्यांनी केला.
नवरात्रात सातवा दिवस होता, निळ्या रंगात उजळलेला.
हा दिवस साजरा करण्यासाठी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत खास राजस्थानी लूकच्या साडीत सजली.
गोटा पत्तीची एम्ब्रॉयडरी बॉर्डर असलेली लेहरिया साडी राजपुती थाटात खुलून आली.
लेहरिया डाईंग पद्धत ही राजस्थानाची खासीयत आहे.. वाळवंटातील लँडस्केप, वाळुचे पट्टे ही या रंगांची खास गोष्ट.
लेहरिया हे रंगीबेरंगी कर्ण किंवा शेवरॉन पट्टे असलेले नमुने आहेत जे रेझिस्ट डाईंगद्वारे तयार केले गेले आहेत.
प्रत्येक राजघराण्यावर त्याच्या स्वाक्षरीचे लेहरिया नमुने आणि रंग होते.
आठवा दिवस गुलाबी रंगाच्या नजाकतीने सजला.
आणि त्याला जोड दिली देशाच्या इशान्येत आसाममध्ये प्रसिध्द असलेल्या मेखला साडीने.
मेखला सादोर (ज्याला मेखला चादर असेही म्हटले जाते), साडीचा एक प्रकार आहे. ज्यामध्ये वरच्या आणि खालच्या बाजूस कापडाचे दोन तुकडे असतात. आसामी हातमाग, पारंपरिक वस्त्रकला यांचा अतिशय महत्वाचा आणि सुंदर भाग आहे ही मेखला परंपरा.
नववा दिवस जांभळ्या रंगाचा. जांभळ्या रंगात न्हाऊन आली एक खास मराठवाडी कला. हिमरु.
एक विण म्हणजे हिमरू. औरंगाबादजवळ दौलताबाद इथे विणले जाणारी ही कला जवळजवळ विसरलेले एक विणकामांरैकी एक आहे..
' हिमरू'. हा शब्द फारसी शब्द हम-रुह वरून आला आहे ज्याचा अर्थ 'एक समान' आहे. हिमरू हे किंखवाबाची कापडाची प्रतिकृती आहे.
जुन्या काळात राजघराण्यांसाठी हे विणलेले कापड वापरे जायचे. हिमरू मध्ये फारसी डिझाईन्स चा ठसा आहे आणि दिसायला अतिशय सुबक अशी ही विण आहे ... या साऱ्या साड्यांचं हे सेलिब्रेशन. ग्लोबलही लोकलही.