आंबा हे वर्षातून एकदाच मिळणारे सगळ्यांच्या आवडीचे फळ. आता उन्हाळा संपत आला आणि पावसाचे वेध लागायला सुरुवात झाली की मनभरुन आंबा खाऊन घेतला जातो. पुन्हा पुढच्या वर्षी येणारा हा आंबा भरपूर खरेदी केला जातो. फळांच्या या राजाचे भावही आता काही प्रमाणात उतरले आहेत. आमरस, आंब्याच्या फोडी, चोखून खाल्ला जाणारा आंबा अशा वेगवेगळ्या रुपात आपण हा आंबा खात असतो. भरपूर पैसे देऊन खरेदी केले जाणारे हे फळ नैसर्गिकरित्या पिकवले आहे की रसायनांचा वापर करुन हे कसे ओळखायचे असा प्रश्न अनेकदा आपल्या सगळ्यांसमोर असतो (Mango Buying Tips). कधी आपण आंबा खरेदी करताना फसवलेही जातो. मात्र आपली अशी फसवणूक होऊ नये यासाठी आपल्याला काही गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. आंबा पिकवायला रसायनांचा वापर केला आहे हे कसे ओळखायचे पाहूया...
१. आपले आंबे जास्त प्रमाणात विकले जावेत यासाठी आंबा विक्रेते कच्च्या आंब्यांवर रसायने मारतात आणि ते पिकवून जास्त पैसे मिळवतात. आंब्यावर पांढऱ्या किंवा निळ्या रंगाचा डाग असेल तर असा आंबा अजिबात खरेदी करु नये. कारण हे डाग रसायनांचे असू शकतात, त्यामुळे आंबा खरेदी करताना बारकाईने आंबे तपासून घ्या. नाहीतर ही रसायने आंब्याच्या माध्यमातून आपल्या पोटात जाऊन आपले आरोग्य खराब होऊ शकते. तर अशाप्रकारे आपली फसवणूकही केली जाऊ शकते.
२. आंब्यामध्ये रसायने आहेत की नाही हे तपासायची आणखी एक सोपी पद्धत म्हणजे पाण्याचा वापर करुन आंब्यांची चाचणी करणे. यामुळे आंबे जबरदस्ती पिकविण्यात आले आहेत की नाही हे समजेल. यासाठी एका मोठ्या भांड्यात पाणी घ्यायचे, त्यामध्ये आंबे ठेवायचे. हे आंबे पाण्यावर तरंगले तर ते केमिकल्सचा वापर करुन पिकवण्यात आले आहेत हे ओळखावे. असे आंबे तब्येतीसाठी अजिबात चांगले नसतात हे लक्षात घ्यायला हवे.
३. आंबे खरेदी करताना तो थोडासा दाबून पाहायला हवा. म्हणजे तो पिकलेला आहे की कच्चा हे आपल्याला ओळखता येते. हल्ली आपण बाजारातून कच्चे आंबे घरी आणतो. घरी नेल्यावर ४ ते ६ दिवसांत हे आंबे पिकतील असे आपल्याला सांगण्यात येते. मात्र १० दिवस उलटून गेले तरी हा आंबा काही केल्या पिकत नाही. त्यामुळे आपली फसगत होऊ शकते. त्यामुळे आंबे खरेदी करताना ते खूप जास्त बिलबिले नसतील आणि प्रमाणाबाहेर कडक नसतील याची काळजी घ्यायला हवी.